एक उनाड दिवस ….

बुधवार, २१ जुलै, २०१०

असाच एक उनाड शनिवार….
सौभाग्यवती गुरूवारीच सोलापूरी, माहेरी गेलेल्या होत्या. त्यामुळे यावेळच्या विकांताचे आमचे प्लानिंग सॉलीड ठरवले होते. म्हणजे शनिवारी पहाटे १० वाजता उठायचे. मग चहा करुन घ्यायचा. त्याप्रमाणे उठलो. चहाचा (करायचा) कंटाळा आल्याने नुसतेच थंडगार दुध घशाखाली उतरवले.
नाष्ट्याला काय बनवावे बरे?
पोहे, उप्पीटाचा कंटाळा आलाय. मॅगी नावाच्या शेवया मला आवडत नाहीत. घरातली पास्त्याची पाकीटे संपलेली. आधी विचार आला की पनीर पकोडे वगैरे काहीतरी मस्त चमचमीत करुन खावे. पण फ्रीज उचकला तेव्हा लक्षात आले की फ्रीज मध्ये पनीरच काय, साध्या हिरव्या मिरच्याही नाहीत. ;-)   . मग शेवटी वैतागुन टोमॅटो ऑम्लेट (मिरचीशिवाय) आणि ब्रेड फ्राय वर भागवले. आधीच ठरवले होते की हा शनिवार दाढी करणे, आंघोळ करणे असल्या किचकट आणि घाणेरड्या कामांना सुट्टी द्यायची. (शिव्या घालायला घरमालकिण नव्हती ना! ;-) . मग चहा- नाष्टा झाल्यावर शांतपणे दात घासायला म्हणुन ब्रशवर पेस्ट घेतली. (केवढे उपकार कोलगेट वाल्यांवर), दात घासत घासत खिडकीपाशी आलो आणि खिडकीबाहेर लक्ष गेले. रस्त्यावर साचलेल्या पाण्याच्या डबक्यात कबुतरांची मस्त आंघोळ चाललेली होती.

सामुदायिक स्नान सोहळा 
कबुतरांची आंघोळ

ते बघितले आणि माझी मलाच लाज वाटली. म्हटले लाजेकाजेस्तव का होइना दोन तांबे अंगावर ओतुन घेणं मस्ट आहे आता. ती कबुतरे बघुन मला आमच्या घरातल्या नुकत्याच बाळंत झालेल्या माहेरवाशीणीची आठवण झाली. मग तिचे हाल हवाल विचारण्यासाठी हलकेच तिच्या खोलीत डोकावलो. बाईसाहेब शांतपणे बाळोबांच्या आगमनाची वाट पाहात बसल्या होत्या.

कधी येशील रे बाळराजा? 
कधी येशील रे बाळराजा?

आमच्या स्वयंपाकघराच्या मागच्या बंद बाल्कनी कम अडगळीच्या जागेत, अगदी दाराच्या मागेच या बाईसाहेबांच्या मिस्टरांनी आपले घर बांधलेले आहे. त्यामुळे गेले जवळ जवळ एक महिना माझे – आमचे त्या खोलीत / बाल्कनीत जाणे बंदच आहे. कारण दारच उघडता येत नाही.

बाप्पांना मात्र आज आंघोळीला सक्तीची सुट्टी दिली. खारघरमध्ये आजकाल केवढी थंडी पडतेय. म्हटले उगाच रोज रोज स्नान करुन सर्दी व्हायची बाप्पाला. तो सगळ्या विश्वाची काळजी वाहतो. त्याची कोण वाहणार? आपणच ते करायला हवे? एवीतेवी अंगावर दोन तांबे ओतुन घेतलेच होते, मग नुसताच बाप्पापुढे दिवा लावुन घराबाहेर पडलो.

जय बाप्पा ! 

आता निरुद्देश्य भटकंती. गळ्यात माझा नेहमीचा सोबती कॅनन A550 (7.1 mp) अडकवला. त्याच्या पाउचमध्ये एक छोटीशीच पाण्याची बाटली टाकली आणि घराबाहेर पडलो. कुठे जायचे ते ठरवले नव्हतेच. खाली उतरलो आणि बाईकला चावी लावली. नेमका तेव्हाच विचार आला,  आज “बैकपोळा” साजरा करायला काय हरकत आहे? बिचारी दररोज मुकेपणाने सेवा करते आपली, चलो आज उसको भी छुट्टी !

माझ्या बायकोची सवत ! 


आजची भटकंती सार्वजनिक वाहनाने. बिल्डिंगच्या बाहेर येवुन खारघर स्टेशनला जाणारी बस पकडली …

एन.एम.एम.टी. जिंदाबाद ! 

खारघर स्टेशनला आलो , तिकीट काढले आणि प्लॅटफॉर्मवर येवुन एका बाकड्यावर टेकलो. तेवढ्यात भ्रमणध्वनी बोंबलला, नेहमीप्रमाणेच मी कुणाचा आहे ते न चेकता रिसिव्ह केला आणि मग स्वत:लाच लाखोली वाहीली. पलिकडे सौ. होत्या….., पहिलाच प्रश्न ….
“निघालात का उंडगायला?”
“माझ्या प्लानबद्दल तिला कसे कळले?” हा आणि असले मुर्ख, वेडगळ प्रश्न मला आजकाल पडत नाहीत. गेल्या पाच वर्षाच्या अनुभवाने मला पक्की खात्री पटली आहे की एकतर ती सर्वसाक्षी आहे किंवा तिला एका वेळी अनेक ठिकानी गुप्तपणे हजर असण्याची विद्या तरी अवगत आहे. त्यामुळे नकार देण्याचा मुर्खपणा न करता मी होकार दिला आणि मग गॅस बंद केलास ना नीट? लाईट्स ऑफ केल्या? दाराला नीट कुलूप लावलेस? झाडांना पाणी घातलेय ना? देवापुढे दिवा लावलाय ना? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देताना “चहा घेतलास का? नाष्टा केलास का ?” अशा अनावष्यक आणि फालतु प्रश्नांना तिने पद्धतशीरपने फाटा दिलाय हे लक्षातच आले नाही. (ती ओळखुन आहे तिच्या नवर्‍याला, खाण्यापिण्याच्या बाबतीत हयगय करत नाही आपण. ;-)
“एक्स्क्युज मी सर, यहा पर लेडीज डिब्बा आता है! “
“च्यायला हिचा आवाज एवढा गोड कसा काय झाला? ” मी नकळत जरा जोराने बोललो आणि ते नेमेके सौ.ने ऐकले.
“मी नाहीय ती ! तु नेहमीप्रमाणे वेंधळ्यासारखा लेडीज ड्ब्ब्यासमोर उभा असशील, कुणीतरी समोरुन सांगतेय. पुढे बघ…..”  फोनमधून आवाज आला आणि मी विलक्षण आनंदलो.
नाही, नाही चुकून का होइना लेडीज ड्ब्ब्यासमोर उभा राहीलो/बसलो म्हणुन नाही आनंदलो , तर आमच्या सौ.ने “मुद्दाम साळसुदासारखा” हा शब्द न वापरता “वेंधळ्यासारखा” हा शब्द वापरला म्हणुन सुखावलो. विशालराव, प्रगती आहे;  तुमची प्रतिमा सुधारतेय हळु हळू !
“बरं…बरं मी नंतर करतो फोन म्हणत मी बाकड्यावरुन उठलो आणि समोरच्या शोडषेला सॉरी म्हणत तिच्या नजरेच्या अनुरोधाने बघायला लागलो. तिच्या चेहर्‍यावर हास्य आणि डोळ्यात मात्र ….” मेल्यांना बोर्ड वाचायला नको, पण निदान दिसतही नाही का? ” असे होते आणि नजर मात्र डोक्यावर टांगलेल्या एका बोर्डकडे लागलेली होती. मी ओशाळल्या नजरेने त्या बोर्डकडे पाहीले त्यावरील मजकुर वाचला आणि खि खि करुन हसलो….. . बोर्ड बनवणार्‍याने मराठी आणि हिंदी दोन्हीची वाट लावलेली होती.

भाषेच्या आयचा घो !

डोक्याला हात लावून आलेली लोकल पकडली.  तिकीट वाशीपर्यंतचे होते. म्हणलं बघु वाशीला, काहीतरी अजुन पोटपुजा करु आणि मग पुढे निघू. वाशी स्टेशनच्या बाहेरील एका फुड जॉईंटवर छोले भटुर्‍यांवर हात साफ केले (अक्षरशः साफ करताना नाकी नऊ आले, इतके तेल होते भटुर्‍यांना ;-) आणि वाशी डेपोकडे निघालो. डेपोच्या शेजारचा महाराजांचा रुबाबदार अवतार बघून आपसुकच हात जोडले गेले. पण त्यांच्या मागचा गर्वे (?) फडकणारा भगवा मात्र फारच केविलवाणा दिसत होता. त्याला तिथे अडकवल्यापासुन बहुदा कधी काढून स्वच्छ धुतलेच नव्हते.  वाईट वाटले….

छत्रपती शिवाजी महाराज की जय ! 

कधीकाळी नवीन असताना तेजस्वी भासणारा त्याचा रंग आजमात्र  धुळकट, मळकट वाटत होता.

केविलवाणा भासणारा भगवा ! 

मनोमन त्याला म्हणालो…
“वृथा खंत करु नकोस बाबा. अगदी महाराजांना सुद्धा वर्षातुन एक दोन वेळाच स्नान करायला मिळते, शिवजयंती आणि निवडणुका जवळ आल्या की. तेव्हा पुढच्या निवडणुकीच्या वेळी तुझ्याकडे पण त्यांचे लक्ष जाईल अशी आशा बाळग. अखेर आशेवर तर जग कायम आहे. :-(
वाशी डेपोहून बस पकडून कुर्ला गाठले, तिथुन लोकल ट्रेनने छत्रपती शिवाजी टर्मिनस ! कॅननच्या (पावभाजी) दिशेने बाहेर पडलो…. , पोटपुजा करुन (पुन्हा… (?) ) आझाद मैदानाच्या कडे कडेने रमत गमत निघालो. विद्यापिठाच्या इमारतीसमोरुन जाताना रोडच्या बाजुला एका लहानगीची पोटापाण्यासाठी नशिबाशी चालु असलेली झुंझ दृष्टीपथात आली अन राहावले नाही. मग थोडा वेळ तिथेच थांबलो. मनात विचार आला, आपण खरेच किती नशिबवान आहोत. निदान हे सगळे तरी आपल्या वाट्याला आले नाही. तुलनात्मक रित्या यापेक्षा कितीतरी चांगले आणि सहज सोपे आयुष्य आपन जगतो, तरीही येता जाता नशिबाला नाहीतर गेला बाजार सरकारला लाखोल्या वाहातच असतो. खिशात हात घातला, दहाची नोट हातात आली, ती त्या लेकराच्या हातात टेकवली आणि पुढे निघालो.  (नंतर राहून राहून वाटत राहीलं की आपण यापेक्षाही मोठी नोट तीला देवू शकलो असतो. पण दहाच्या नोटेवर भागवलं :-( . आपल्या स्वभावातली ही कृपणता कधी जाणार? )

पापी पेट का सवाल है बाबा ! 

तसाच फिरत फिरत हुतात्मा चौकात आलो. जहांगीरला एक तासभर वेळ काढला. (इथे मी आर्ट गॅलरीच्या आत फार कमी वेळा जातो. गॅलरीच्या बाहेर रोडवर जे कलाकार बसलेले असतात ना;  ते ही तेवढेच सरस असतात.) त्यानंतर वस्तु संग्रहालयाला भेट देण्याचा मोह आवरून गेट वे कडे निघालो. इथे चालता बोलता जिवंत वर्तमानकाळ खुणावत असताना त्या भुतकाळाच्या पुरातन थडग्यात कुणाला स्वारस्य होते. सी.पी. ऑफीससमोरुन गेट वे कडे वळताना, माझ्याकडे पाठ करुन उभ्या असलेल्या पु. शास्त्रीजींच्या पुतळ्याकडे लक्ष गेले आणि क्षणभर स्थिरावलो…. ते दृष्य बघुन हसावे की खंत करावी तेच कळेना. हे इतके पुतळे जर जपता येत नसतील तर का उभे करतात लोक?

देवदुर्विलास – १ ! 
अगदी हीच अवस्था गेट वे वरच्या महाराजांची पण होती.

देवदुर्विलास – २ ! 

इथे मात्र शास्त्रीजींच्या पुतळ्यापाशी केलेली चुक सुधारायचे मी ठरवले. पुढे होवून , जोर जोरात ओरडून त्या कावळ्यांना उठवायचा प्रयत्न केला. परत मनात आले, त्याचा काय दोष? तो बिचारा थोडावेळ आराम करु पाहतोय, तर त्याच्या आरामात विघ्न आणणारा मी कोण? मग शेवटी तो प्रयत्न सोडून दिला. बहुदा त्याला पण माझी भावना कळली की काय कोण जाणे , पण नंतर बराच वेळ तो कावळा पुतळ्याकडे आलाच नाही.




बोटीत बसायची हुक्की आली म्हणुन तिकीट काढले आणि समुद्रावर चक्कर मारायला निघालो. साले पाऊण तास म्हणतात आणि २० मिनीटात फिरवून परत आणतात. तेवढ्यासाठी पन्नास रुपये पाण्यात ….. नव्हे बोटीत. आजुबाजुंचं सौंदर्य पाहात (सृष्टीसौंदर्य… उअगाच गैरसमज नकोत ;-) ) एकदाचा गेट वे कडे परतलो. समुद्रातुन गेट वे आणि शेजारचा ताज मोठे सुंदर दिसत होते.

 ताज आणि गेट वे ऒफ़ इंडीया
ताज आणि गेट वे ऒफ़ इंडीया

ताजकडे बघताना साहजिकच २६-११ ची आठवण झाली. सगळे घाव पचवून पुन्हा ठामपणे उभ्या असलेल्या ताज कडे बघताना पुन्हा एकदा मनोमन मुंबईकरांच्या झुंझार, लढाऊ वृत्तीला आणि जिद्दीला मुजरा केला. ताजचा तो घुमट जणु जगातील समस्त खलप्रवृत्तींना आव्हान देत होता… ….!
“या कितीही वेळा आणि कितीही जण, पण भिंती पाडून घरे तोडता येत नाहीत आणि चार मुडदे पाडुन आमची हिंमत आमचा आत्मविश्वास तोडता येणार नाही.”

मी मुंबईकर ! 
मी मुंबईकर !

तिथुन रस्त्याच्या कडेकडेने चालत नरिमन पॉईंटहून रमत गमत मरीन ड्राईव्हला पोहोचलो. दुपारचे चार वाजुन गेले होते. समुद्र आणि रस्ता यांच्यात अंतराय निर्माण करणार्‍या त्या नतद्रष्ट पॅरापेटवरुन चालत चालत गिरगाव चौपाटीकडे निघालो. नेहमीप्रमाणेच गर्दी होतीच. पण त्या तसल्या गर्दीत, रस्त्यावरच्या वाहनांच्या त्या कलकलाटातही एक आजोबा अगदी तल्लीन होऊन वर्तमानपत्र वाचत बसले होते. मला त्यांच्या एकाग्रतेचा हेवा वाटला. कसं जमत असेल हे?

संध्याकाळ – आयुष्याची ? 
 
 
पण नंतर मनात एक वेगळाच विचार आला की कदाचीत परिस्थिती काही वेगळीही असु शकेल. निवृत्तीनंतर ज्या वयात घरात आरामात दिवस काढायचे, फार फार तर सायंकाळी उन्हे उतरल्यानंतर  फिरायला म्हणुन समुद्रावर यायचे त्या वयात हे असं भर उन्हात समुद्रावर येवुन बसायची वेळ का यावी या आजोंबावर? मनातल्या मनात तो त्यांच्या स्वेच्छेचा प्रश्न असावा अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करतच मी गिरगाव चौपाटीला पोचलो. मला या अशा गर्दीच्या जागा खुप आवडतात. शांतपणे , तटस्थपणे अगदी अलिप्त राहून माणसांची अनेक रुपे अनुभवता येतात, अभ्यासता येतात. या ठिकाणी माणुस आपले वय विसरून जातो. आता हेच बघाना… या लहानग्याचे आत्तापासुनच घर बांधायचे प्रयत्न सुरू होते.
 
आई मी मोठा कधी होणार? 

तर हे सदगृहस्थ आपले वय विसरून पुन्हा आपले शैशव जगण्याचा, लहान होण्याचा प्रयत्न करत होते.

लहानपण देगा देवा ! 

इथेच अनेक कमनशिबी , आपले लहानपणच गमावून बसलेल्या, तरीही न डगमगता आयुष्याशी झगडणार्‍या काही लहानग्यांची भेट झाली. त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांच्याकडून काही फुगेही विकत घेतले आणि नंतर तिथल्याच बाल गोपाळात वाटून टाकले.
“क्या करे साब ! अल्लाने ऐसेइच भेजा है इधर, तो ऐसेइच जीनेका ! पर जीना हे तो काम तो करना पडेंगाच ना !” त्या दहा-बारा वर्षाच्या लेकराच्या तोंडुन जगण्याचं हे तत्वज्ञान ऐकुन सुन्न झालो. तेवढ्यात तो पोरगा…. “ए पाच रुपैय्या…पाच रुपैय्या करत तिथुन आपल्या कामावर निघाला….

पोटासाठी दाही दिशा ! 

त्याच्या जगण्याच्या धडपडीला मनोमन सलाम करत मी समुद्राकडे वळलो. सुर्यास्ताची वेळ झाली होती. भास्करबुवा घरी परतायच्या तयारीत होते, म्हणलं ते पळुन जायच्या आधी त्यांना एकदा भेटून घ्यावं. संध्याकाळच्या तांबुस छटा क्षितीजावर पसरायला लागल्या होत्या. सगळं आकाश हळु हळु लालसर, सोनेरी व्हायला लागलं होतं. समुद्रकिनार्‍यावर संध्याछाया रेंगाळायला लागल्या होत्या. मी पुन्हा एकदा कॅमेरा सरसावला….

मावळत्या दिनकरा …. १

मावळत्या दिनकरा ....१

मावळत्या सुर्याला प्रणाम करुन पुन्हा एकदा घरच्या रस्त्याला लागलो. आता इथुन दादरपर्यंत बसने, मग दादर ते कुर्ला पुन्हा लोकल ट्रेन….. ! कुर्ला ते खारघर……. बघू जशी इच्छा होइल तसे पुढचा प्रवास. बॅक टू पॅव्हेलियन.


उद्या रवीवार….., किमान बारा वाजेपर्यंत लोळत पडायचे. उठल्यावर ठरवू काय करायचे दिवसभर ते ! शुभ रात्री ! :-)
विशाल कुलकर्णी

0 प्रतिसाद:

टिप्पणी पोस्ट करा

उल्लेखनीय ब्लॉग्स...

Kay Vatel te!sahajachBhunga- the social insect!Mazi Sahyabhramanti!Maratha Histoy Calendar!
Man Udhan Varyache!मोगरा फुललाNetbhet.comsaurabh