पुन्हा भटकंती...

गुरुवार, २८ जुलै, २०११

काही दिवसांपूर्वी आमच्या यंदाच्या पावसाळी सहलीचे काही फोटो टाकले होते इथे. कण वर्षेचा क्षण रेंगाळे !
त्याच सहलीतले काही फोटो टाकायचे राहून गेले होते ते आता टाकतोय....

केतकावळ्याच्या श्री बालाजी मंदीरापाशी टिपलेली ही तुळस..केतकावळ्याहुन पुढे पुरंदरच्या वाटेवर जाताना वेड लावणारी हिरवाई आणि ओलेते रस्ते...

केतकावळ्यापाशीच नकळत गवसलेलं एक देखणं लँडस्केपबनेश्वरच्या जंगलात....

तिथुन परत हायवेला निघून सातार्‍याच्या दिशेने निघालो. सातारा आणि कराडच्या मध्ये कुठेतरी भेटलेली (बहुदा) कृष्णामाई...कोल्हापुर जवळ आल्यावर भरल्या मनाने स्वागत करणारी पंचगंगा...परतीच्या वाटेवर सज्जनगडावरून टिपलेल्या मागच्या मनोहारी जलाशयाचे सौंदर्य...


परत येताना रात्री ९.३० च्या दरम्यान कैलासमध्ये पोटोबा....
(गरमा गरम ज्वारीच्या भाकरी, वांग्याची झणझणीत भाजी, पिठलं, थंडगार मठ्ठा आणि तोंडाला सुटलेलं पाणी...आणि शेवटी अर्थातच फ़ोटोग्राफ़र...विशाल....

कण वर्षेचा क्षण रेंगाळे...

सोमवार, १८ जुलै, २०११

पावसाची साथ कुणाला नको असते? पण माणसाला हे क्षण जपून ठेवावेसे वाटतात. नभातून कोसळणारा पाऊस, चोहोबाजुला पसरलेली हिरवाई आणि "थांब, मी या पावसाला कैदच करून टाकते!" म्हणणारी चिंब प्रिया...
स्वर्ग-स्वर्ग तो अजून काय असतो?

प्रचि १


मेघांचे उत्सव रिमझिमणारे
जलदांचे अन सुरेल चिंतन
समीर बावरा निरंतर गातो
आषाढातील जलदाच्या वेणा...

निळे सावळे घन थरथरणारे
दंव्-बिंदूचे अन हळवे स्पंदन
विहग स्वरांचे सुखे मिरवती
शुभ्र क्षणांचा सुरेल मेणा...

गीत अधरीचे ते हूळहूळणारे
थिजलेल्या अन मौनाचे मंथन
मेघही वळले होवून आतूर
अन जलधारांची अक्षयवीणा...

ते मुग्ध इशारे प्रतिबिंबांचे
रुजलो अन होवून हिरवे पाते
लंघुन सार्‍या सीमा शब्दांच्या
एकटा कोरतो मौनाच्या लेण्या...

प्रचि २


प्रचि ३


प्रचि ४


पाऊस आणि फ़ुले सर्वांनाच आवडतात. मग ते एकमेकांनाही आवडले तर नवल काय? पावसाळा सुरू झाला की जलधारात सचैल भिजलेली फ़ुले आणि फ़ुल-पाकळ्यांवर हट्टाने रेंगाळलेले जलधारांचे नाजुक थेंब सगळीकडे बघायला मिळतात. मग आपल्यालाही कधी ते इवलेसे फ़ुल तर कधी तो नाजुक पाण्याचा थेंब व्हावेसे वाटते.

पांघरुनी पाऊसधारा
लाजरे मी फ़ुल बनावे
क्षणभंगुर जलथेंबाचे
हलकेच तोल सावरावे

प्रचि ५


प्रचि ६


प्रचि ७


प्रचि ८


प्रचि ९


प्रचि १०


प्रचि ११


प्रचि १२


प्रचि १३


प्रचि १४


प्रचि १५


प्रचि १६


प्रचि १७


प्रचि १८


प्रचि १९


प्रचि २०


प्रचि २१


प्रचि २२


प्रचि २३


प्रचि २४


प्रचि २५


प्रचि २६


प्रचि २७


प्रचि २८


प्रचि २९


विशाल...

स्पर्श प्रेमाचा, विश्वासाचा आणि मुहुर्तमेढ एका शुभकार्याची : "मैत्र जिवांचे" सामाजिक संस्था.

मंगळवार, १२ जुलै, २०११

दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती !

जो जे वांछिल तो ते लाहो ! संत ज्ञानेश्वरांनी परमेश्वराजवळ सकळ चराचरासाठी असे व्यापक पसायदान मागितले होते. जगात आजुबाजुला पसरलेली विषमता, गरीबी पाहून कधी कधी असे वाटायला लागते की ज्ञानदेवांची मागणी त्या सर्वव्यापक परमेशाजवळ पोहोचलीच नाही की काय कोण जाणे? पण जसजसे आपण समाजाच्या अधिकाधिक जवळ जायला लागतो, त्याच्याशी एकरुप व्हायचा प्रयत्न करतो तसतसे त्या परमेशाची कारगुजारी लक्षात यायला लागते आणि मग लक्षात येते की नाही..., तो जागाच आहे आणि आपल्या लेकरांवर लक्ष ठेवून आहे. आत्ता सगळीकडे एकाच वेळी असणे त्यालाही कार्यबाहुल्यामुळे जड जात असेल कदाचित ;)

मग तो आपला अंश आपल्या प्रतिनिधींच्या रुपाने या पृथ्वीवर पाठवतो. मग आपल्याला ओळख होते ते मदर टेरेसा, मार्टीन ल्युथर किंग, स्वामी विवेकानंद, हेलन केलर, बाबा आमटे आणि त्यांचे कुटूंबीय, बंग दंपती, आपली सर्वांची सिंधुमाई, अवचटसर अशा जगावेगळ्या महामानवांची. पण याही पलिकडे कित्येक जण गुपचुप, कसलाही गाजावाजा न करता परमेशाने मांडून दिलेले आपले काम अगदी अव्याहतपणे करत असतात. आजुबाजुच्या समाजाची मदत झाली तर त्यालाही सोबत घेत नाहीतर ’एकला चलो रे’ म्हणत त्यांची सेवा सदोदीत चालु असते. "आलात तर तुमच्यासवे, नाही आलात तर तुमच्याशिवाय" या वृत्तीने त्यांचे कार्य कितीही विघ्ने आली तरी त्यांच्याशी दोन हात करत कायम चालु असते.

"मैत्र जिवांचे" या आपल्या सामाजिक संस्थेचे उद्घाटन करायचे ठरल्यावर अशाच एका जगावेगळ्या माणसाची गाठ पडली आणि आमचा सगळा ताठाच उतरुन गेला. "मैत्र जिवांचे" या माध्यमातून आम्ही काहीतरी सामाजिक कार्य करणार आहोत, करतो आहोत असा एक वेगळाच अहंभाव मनात घेवून वावरत असलेले आम्ही सगळे जेव्हा "स्पर्श बालग्राम' संस्थेच्या 'श्री. महेशभैय्या यादव' यांना भेटलो. तेव्हा त्यांचा साधेपणा, त्यांचं सरळ सोपं पण प्रत्यक्षात खुप मोठं असलेलं व्यक्तिमत्व पाहून, अनुभवून एका क्षणात आम्ही सगळेच जमीनीवर आलो.सातार्‍यातल्या एका छोट्याश्या खेडेगावात राहणार्‍या महेशभैय्यानी २००५ साली अनाथ असलेल्या सुजाताशी विवाह केला. तेव्हा त्यांना कल्पनाही नसेल की पुढे जाऊन आपण इतक्या मुलांचे मातृत्व भुषवणार आहोत. सौ. सुजाता वहिनींचे आई-वडील दोघेही एडस मुळे मरण पावलेले असल्याने, वहिनींनाही एडस झालेला असणार आणि त्यांच्यामुळे तो महेशभैय्यांनाही झाला असेल या गैरसमजाने आणि तो गावात पसरू नये या भीतीने गावातील आंधळ्या समाजाने त्यांना गावातुन बहिष्कृत करून टाकले. खरेतर या अशा घटनेनंतर एखादा संतापून गेला असता. एच्.आय.व्ही. बद्दल त्याच्या मनात तीव्र घृणा निर्माण झाली असती. पण एडसबद्दल असलेले हे गैरसमज पाहून त्याबद्दल जागृती निर्माण करण्याचे महेशभैय्यांनी ठरवले. या दांपत्याने घाबरून न जाता या रोगाविरुद्धच लढायचे ठरवले. त्यांनंतर महेशभैय्या सोलापूरातील 'स्नेहालय' या संस्थेच्या माध्यमातुन सामाजिक कार्य करु लागले. तिथे त्याची पुण्याच्या 'रॉयल रोज फाऊंडेशन'च्या मुख्य श्रीमती इसाबेला मस्कारेन्हास यांच्याशी ओळख झाली. त्या दरम्यान त्यांच्या मनात एच्.आय्.व्ही. बाधित मुलांसाठी काम करण्याचा, त्यांचे पुर्णपणे पुनर्वसन म्हणजे शिक्षणापासून ते थेट त्यांना रोजगार मिळवुन देइपर्यंत सर्व जबाबदारी उचलण्याचा भैय्या आणि वहिनींनी निश्चय केला. आणि त्यातूनच मग श्री. मस्कारेन्हास यांच्या मदतीने "स्पर्श बालग्राम" ही एच.आय.व्ही. ग्रस्त अनाथ बालकांसाठी काम करणारी संस्था जन्माला आली. आज महेशभैय्यांकडे अशी १३ मुले आहेत. अजुनही सरकारची फारशी मदत नसल्याने महेशभैय्यांना म्हणजेच पर्यायाने "स्पर्श"च्या या सर्व परिवाराला मदतीची प्रचंड प्रमाणात गरज आहे. 'स्पर्श' बद्दल संपुर्ण माहिती इथे मिळू शकेल. http://www.sparshbalgram.com/
मैत्र जिवांचे....! एका नव्या पर्वाची सुरूवात !!

२ जुन २०११ रोजी मायबोलीकर मित्र आणि 'मैत्र जिवांचे' या संस्थेचे अध्यक्ष श्री. हबा यांचा मोबाईलवर मेसेज आला. "नुकतेच आपल्या संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र आपल्याला मिळाले आहे आणि येत्या दोन वर्षात "मैत्र जिवांचे" ही संस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य आणि खरोखर काम करणारी संस्था म्हणून गणली जाईल याबद्दल मला अजिबात संशय नाही." इतर कुणाकडुन हा संदेश आला असता तर ओव्हर कॉन्फिडन्स म्हणून मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले असते. पण हा 'हबा' होता!

तशी आमची मैत्री गेल्या ५-६ महिन्यांचीच. पण या थोडक्या कालावधीतदेखील हबाच्या दृढनिश्चयी स्वभावाची पुरेपूर ओळख झाली असल्याने माझा त्याच्या त्या संदेशावर लगेचच विश्वास बसला. गेले काही महिने आम्ही सगळेच , खासकरून हबा, 'मैत्र जिवांचे' या संकल्पनेने पछाडून गेलो होतो. त्यातही संस्थेसाठी सभासदांचे कागदपत्र गोळा करून संस्थेची नोंदणी करेपर्यंत सगळ्या कामात हबाचा सिंहाचा वाटा आहे. त्यानंतर आम्ही सगळेच कामाला लागलो.संस्थेचे उद्घाटन कसे करायचे? उद्घाटनासाठी कुणाला बोलवायचे? संस्थेचा लोगो काय असेल? आपले घोषवाक्य काय असेल? अशा अनेक विषयावर चर्चा झाली.

अनेक वेगवेगळ्या घोषवाक्यांवर विचार झाल्यावर शेवटी साधेच पण आमचे तत्त्व नेमकेपणाने मांडणारे एक वाक्य घोषवाक्य म्हणुन निवडण्यात आले.

"निर्धार निस्वार्थ सेवेचा!"

उद्घाटन करायचे असल्याने संस्थेचा एक तात्पुरता लोगोही ठरवण्यात आला.संस्थेची सुरूवातच असल्याने फंडींग नव्हतेच, तेव्हा सुरुवातीचा सगळा खर्च कार्यकारी मंडळाने आपल्या खिशातूनच करायचा. सभासद नोंदणी व्यतिरीक्त प्रत्येकाने शक्य तेवढी रक्कम कार्यासाठी द्यायची असे एक मत मांडण्यात आले आणि ते सगळ्यांनी उचलुनही धरले. सुरुवातीच्या कार्यक्रमासाठी आवश्यक ती रक्कम हा हा म्हणता गोळा झाली. कित्येक मायबोलीकरांनीही फोन करून, काहींनी प्रत्यक्ष भेटून प्रत्यक्ष्-अप्रत्यक्ष मदतीची खात्री दिली. या सगळ्या प्रोत्साहनाने आमचा उत्साह वाढतच होता. मग उद्घाटनासाठी बर्‍याच गोष्टींचा विचार झाला. अगदी सिंधुमाई सपकाळ तसेच अवचटसरांच्या कार्यालयाशीदेखील बोलून झाले. त्यांनीही तयारी दाखवली पण त्यांना लगेच वेळ नव्हता आणि आम्ही तर १० जुलै २०११ ही तारीख पक्की केली होती. तेव्हा कुठल्याही कारणाने ठरवलेल्या वेळापत्रकात बदल करायचा नाही असा निर्णय घेवुन आम्ही दुसरा एक पर्याय निवडला.

आम्ही आंतरजालावरून काही अशा संस्थांची माहिती मिळवली की ज्या आकाराने छोट्या आहेत, ज्यांना सरकारकडून पुरेशी मदत मिळत नाही पण मदतीची गरज तर आहे. अशा संस्था शोधताना आंतरजालावर आम्हाला "स्पर्श बालग्राम" ची माहिती मिळाली. एक दांपत्य कुठलीही सरकारी मदत नसताना स्वबळावर जवळ्-जवळ १३ अनाथ बालकांचे पालन पोषण करताहेत ही गोष्ट आदराने नतमस्तक व्हायला लावणारीच होती. त्यातही धक्कादायक गोष्ट म्हणजे ही सर्वच्या सर्व बालके एच.आय.व्ही.बाधित आहेत हे कळल्यावर तर आम्ही हादरलोच. तिथेच पक्के झाले की उद्घाटनाचे इतर सर्व प्लान्स कॅन्सल! त्याऐवजी ती रक्कम आपण "स्पर्श"ला देवू आणि तिथेच अनौपचारिकरित्या "मैत्र जिवांचे" या आपल्या संस्थेचे उद्घाटनही करू. "स्पर्श"च्या महेशभैय्यांनी लगेच आनंदाने या गोष्टीला मान्यता दिली.

त्यांच्याच बोलण्यातून असे समजले की बर्‍याच दिवसात ही लेकरं फारशी कुठेही बाहेर पडलेली नाहीत. फक्त दररोज इथल्याच एका कार्पोरेशनच्या शाळेत जायचे एवढेच काय ते त्यांचे आउटींग. तत्क्षणी हबाने आम्हाला संदेश पाठवला की या सर्व मुलांना आपल्याला कुठेतरी छान सहलीला नेता येइल का? सगळेच सभासद आनंदाने तय्यार झाले आणि सिंहगड किंवा पानशेत असा प्लान ठरला. सकाळी लवकर उद्घाटनाचा कार्यक्रम आटोपून घ्यायचा आणि त्यानंतर सर्व मुलांना बरोबर घेवून सिंहगड किंवा पानशेतची सहल करायची असे ठरले. अर्थात मुलांना काही त्रास होणार नाही याची महेशभैय्यांनी ग्वाही दिल्यावरच. आणि अर्थातच 'मैत्र जिवांचे'चे उपाध्यक्ष डॉ. कैलासदादा गायकवाड सर्व तयारीनिशी बरोबर असणारच होते. त्यामुळे गरज पडल्यास वैद्यकीय मदतही हाताशी होतीच.

आता प्रश्न होता गाड्यांचा. आपले सर्व सभासद तसेच येणारे पाहुणे आणि श्री व सौ महेशभैय्यासहीत सर्व मुले यांना मिळुन मोठ्या तीन किंवा लहान चार्-पाच गाड्यातरी लागणार होत्या. पण तो प्रश्नही हा हा म्हणता सुटला. कैलासदादा, वहिनी आणि त्यांची छोटुली मुंबईवरून एक सुमो करुन येतो म्हणाले. मायबोलीकर श्री. मिलींद पाध्ये उर्फ भुंगा यांनीही आपली कार घेवून येण्याची खात्री दिली. हबाचे मित्र आणि संस्थेचे मार्गदर्शक श्री. दत्ता गायकवाड विट्यावरून त्यांची गाडी घेवून येणार होते त्यांनीही दिवसभर थांबण्याची ग्वाही दिली. एक उत्साही मायबोलीकर श्री. सुशांत मगर यांनीही आपली गाडी घेवून येण्याचे कबुल केले. आमचा प्रश्न चुटकीसरशी सुटला. परंतू नेमके त्या रात्री सुशांतच्या एका मित्राला अपघात झाल्याने त्यांचे येणे कॅन्सल झाले. एक गाडी अजुन हवी होती. काय करावे हा विचार करता करता एकदम मायबोलीकर मित्र श्री. उमेश कोठीकर यांचे नाव डोळ्यासमोर आले. त्यांना सहज एक मेसेज टाकला जमेल का म्हणुन, तर त्याचा फोनच आला. कधी हवीय? कुठे हवीय? छोटी हवी की मोठी कार हवी? चला ही समस्या देखील सुटली. तुम्ही मनापासून एखादे चांगले काम करत असाल तर कुठलेही संकट तुम्हाला त्यापासून परावृत्त करू शकत नाही यांचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आणि आम्ही उद्घाटनाच्या अनौपचारिक सोहळ्यासाठी सिद्ध झालो. उम्या, मन:पूर्वक धन्यवाद रे....

रवीवार दिनांक १०-०७-२०११ ला सकाळी १०.३० वाजेपर्यंत उद्घाटनासाठी म्हणून सर्वांनी दापोडी येथील 'स्पर्श'च्या मुक्कामी भेटायचे ठरले होते. तसे एकेकजण यायला सुरूवात झाली. विट्यावरून हबाचे मित्र आणि संस्थेचे मार्गदर्शक श्री. दत्ता गायकवाड हे आदल्या रात्रीच आपल्या दोन सहकार्‍यांसहीत हबाच्या घरी मुक्कामाला आले होते. दत्ताभाऊ हे विट्यातील एका महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी म्हणून काम पाहतात. पण त्याबरोबरच समाजसेवेच्या क्षेत्रातही ते चांगलेच कार्यरत आहेत. विटा, सातारा आणि कराड या भागातील "मैत्र जिवांचे" च्या सर्व कामाची जबाबदारी श्री दत्ता गायकवाड आणि त्यांच्या सहकार्‍यांनी स्विकारली आहे. रविवारी सकाळी दत्ताभाऊंच्या गाडीच्या पहिल्या फेरीत मी, हबा, दत्ताभाऊ आणि त्यांचे सहकारी स्पर्शला पोहोचलो. दुसर्‍या फेरीत प्रगो उर्फ संस्थेचे खजीनदार प्रसाद गोडबोले आणि हबाचे कुटुंबीय येवुन दाखल झाले. आम्हाला अनपेक्षित अशी एक पाहुणी 'मैत्र जिवांचे'च्या परिवारात सामील झाली होती. सौ. प्र.गो. उर्फ़ 'प्राची'. दरम्यान नाशिकहून आलेले श्री. विजय पाटील उर्फ कणखर, पुण्याहून आलेले भुंगा उर्फ मिलींद पाध्ये, तसेच चनस उर्फ अर्चना मजले आपल्या कुटुंबियासहीत आणि मी आर्या उर्फ नयना मोरे आपल्या चिरंजिवांसहीत 'स्पर्श'च्या निवासी कार्यालयात येवून दाखल झालेले होते.

खरेतर सकाळी सकाळी मी आणि हबा तिथे पोहोचलो तेव्हा मी थोडा विचारातच पडलो होतो. आपल्यापुढे दैवाने काय मांडून ठेवलय याची कल्पनाही नसलेल्या त्या छोट्या-छोट्या देवदुतांना मी कसा सामोरा जाणार होतो? त्यांच्याशी काय बोलायचे, कसे बोलायचे? या संभ्रमातच होतो. पण हबाने बेल वाजवली  समोरून एका छोट्याने दार उघडले आणि 'गुडमॉर्निंग भैय्या' म्हणत आपला चिमुकला तळहात शेकहँडसाठी पुढे केला. क्षणात अजुन कितीतरी चिमुकले हात 'गुडमॉर्निंग भैय्या' म्हणत पुढे आले आणि माझ्यातला सगळा मी कुठे गळून पडला मला कळलेच नाही. एका क्षणात मनातले सगळे किंतु, सगळे प्रश्न, सारा संभ्रम गळून पडला आणि त्या लेकरांनी माझा ताबाच घेतला. मी तिथेच नेहमीप्रमाणे वज्रासनात बैठक घातली आणि त्यांच्याशी गप्पा मारण्यात रंगून गेलो. त्यानंतर जेव्हा महेशभैय्यांनी सांगितले की बहुतेक मुले अजुन फर्स्ट स्टेजला आहेत त्यामुळे काळजी करण्यासारखे फारसे काही नाही. तेव्हा कुठे माझ्या आणि हबाच्याही जिवात जिव आला. असो...! पहिला विचार मनात आला तो म्हणजे त्यां लेकरांच्या देहाला जरूर काहीतरी विकार झालेला असेल पण त्यांची निरागस मने आणि जीवनाशी आहे त्या परिस्थीतीत सामोरे जाण्याची वृत्ती यांना मात्र मृत्युही मारु शकणार नाही. फिर एडस किस झाड की पत्ती?

आमचा मुळ कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी त्या मुलांनी मायबोलीकर चनस, मी आर्या तसेच चनसचे बंधु, तिच्या आई, सौ. हबा आणि प्राची यांचा ताबा घेवून टाकला होत्या. नव्या तायांना मग कुठे गाणं म्हणून दाखव, कुठे नाच करून दाखव असा आपला स्वतंत्रच कार्यक्रम त्यांनी सुरू केला होता.आमच्या कार्यक्रमाची सुरुवात त्या चिमण्यांच्या सुश्राव्य आणि खणखणीत प्रार्थनेने झाली. "ए मालिक तेरे बंदे हम.....!" म्हणत त्या परमेशाला साद घालत त्यांनी ’मैत्र जिवांचे’ या सामाजिक संस्थेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला एक देखणी आणि पवित्र सुरूवात करून दिली.

या प्रार्थनेची दृक-श्राव्य चित्रफितआधीच ठरवल्याप्रमाणे डॉ. कैलासजी आणि दत्ताभाऊ तसेच महेशभैय्या यांच्या हस्ते श्री. ज्ञानेश्वरमाऊलींच्या प्रतिमेचे पुजन करून संस्थेचे उद्घाटन झाल्याची अनौपचारिक घोषणा करण्यात आली.संस्थेचे नोंदणीप्रमाणपत्र सर्वांना दाखवून संस्था अधिकृतपणे कार्यरत झाल्याची श्री. हबा यांनी घोषणा केली. त्यानंतर हबाने हा विचार मनात येण्यामागची कारणे आणि भुतकाळातील काही हृदय हेलावणारे प्रसंग सांगुन 'मैत्र जिवांचे' च्या सभासदांच्या मनातली ही सामाजिक कार्याची प्रेरणा अजुनच पक्की केली.
हबाच्याही नकळत ’मैत्र जिवांचे’चा अजुन एक खंदा शिलेदार आकाराला येत होता. (हबाचा चिरंजिव शिवांशु)ठरल्याप्रमाणे डॉक्टर आणि दत्ताभाऊंच्या हस्ते महेशभैय्यांना 'मैत्र जिवांचे' तर्फे फुल ना फुलाची पाकळी म्हणून छोटीशी रक्कम भेट म्हणून देण्यात आली. तसेच एका शुभेच्छुक मायबोलीकराने आपले नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर 'स्पर्श'च्या मुलांसाठी म्हणून घेवून दिलेली सायकला त्या लेकरांच्या स्वाधीन करण्यात आली. ती छोटीशी सायकल बघून त्या पिल्लांच्या चेहर्‍यावर उमटलेले हसू आमची आतापर्यंतची सर्व मेहनत सार्थक करून गेले. मायबोलीकर 'चनस' आणि तो अज्ञात दाता यांनी आदल्यादिवशी भर पावसात पायपीट करून या लहानग्यांसाठी ती सायकल विकत घेतली होती. त्यांचे आभार कसे आणि किती मानणार?सायकल बघितल्यावर मात्र लेकरं सॉलीड खुश झाली.


इथेही एक गोष्ट त्या चिमण्या पिल्लांकडून शिकायला मिळाली. सायकल बघितल्यावर सुद्धा त्यांना पुढे बोलावेपर्यंत सर्वजण शांतपणे शिस्तीत बसुन होते. जेव्हा हबाने त्यांना 'वाट कसली बघता, तुमचीच आहे सायकल' म्हणून सांगितले..... त्यानंतर मग कल्ला सुरू झाला.

त्यानंतर डॉ. कैलासजी, दत्ताभाऊ आणि महेशभैय्या यांनी संस्थेचे सदस्य आणि उपस्थितांशी संवाद साधत मार्गदर्शन केले. डॉ. कैलासदादांनी साध्या-सरळ शब्दात एडसबद्दल थोडी माहिती देत संस्थेतर्फे हा कार्यक्रम इथे 'स्पर्श्'च्या कार्यालयात करण्याची परवानगी दिल्याबद्दल महेशभैय्यांचे आभार मानले. आणि आपल्यापरीने शक्य त्या सर्व प्रकारच्या आर्थिक, वैद्यकीय मदतीची हमी दिली.त्यानंतर श्री. दत्ता गायकवाड यांनी सुरू करतानाच मी बोलणार आहे पण माझे बोलणे आवश्यकतेपेक्षा जास्त वाढवून श्रोत्यांच्या मस्तकावरची शीर उडणार नाही यांची काळजी घेइन असे सांगत श्रोत्यांचा ताबा घेतला. दत्ताभाऊंशी हबाची ओळख अगदी त्याच्या स्पर्धाकाळापासुनची असल्याने त्यांच्यात असलेला स्नेह, परस्परांवरचा दृढ विश्वास दत्ताभाऊंच्या बोलण्यातुन क्षणोक्षणी जाणवत होता. अगदी थोडक्यात सामाजिक संस्थांचे काम कसे चालते याची माहिती देत शेवटी अचानकपणे दत्ताभाऊंनी संस्थेसाठी आपली जवळ जवळ २० गुंठे म्हणजे अर्धा एकर जमीन संस्थेच्या इमारतीच्या बांधकामासाठी देण्याची घोषना केली आणि आम्ही सगळेच चाट पडलो, भारावून गेलो. हा एक शुभ शकुनच होता संस्थेच्या भावी यशाची खात्री देणारा. त्याबरोबरच विटा, सातारा तसेच कराड या भागातील "मैत्र जिवांचे" च्या सर्व कार्याची जबाबदारी स्विकारून शक्य ती सर्व मदत करण्याचे दत्ताभाऊंनी वचन दिले. आपले मनःपूर्वक आभार दत्ताभाऊ !!यानंतर बोलायला उभे राहीले ते महेशभैय्या !आपण काही , खुप मोठं काम करतोय, काही जगावेगळं करतोय याची कसलीही खुण न दर्शवता, कुठलाही ताठा न मिरवता त्यांनी 'स्पर्श' बद्दल माहिती दिली. 'स्पर्श'चा जन्म कसा झाला हे सांगतानाच त्यांनी 'सामाजिक संस्था' कशा चालतात? कशा चालवायला हव्यात? याबद्दलही मोलाचे माहिती दिली. हे सर्व सांगताना त्यांनी एक अतिशय बहुमुल्य विचार मांडला.

"सामाजिक संस्था म्हणजे समाजाची, समाजाच्या हितासाठी काम करणारी संस्था. आपण फक्त त्या समाजाचे प्रतिनिधी म्हणुन काम करत असतो. आपले काम कुठल्याही फळाची अपेक्षा न धरता करत राहणे एवढेच आपले कर्तव्य."

त्यांच्याकडे, त्यांच्या 'स्पर्श'मधील लेकरांकडे बघताना हा विचार त्यांनी आणि त्यांच्या सौ.नी आपल्या तनमनात पुर्णपणे मुरवला आहे याची खात्री पटत होती. शेवटी 'स्पर्श बालग्राम' ला असलेल्या मदतीच्या गरजेची पुन्हा एकदा सर्वांना कल्पना देवुन शक्य होइल ती सर्व मदत करण्याची कळकळीची विनंती महेशभैय्यांनी उपस्थितांना केली. सहृदय मायबोलीकरांना एकच विनम्र विचारणा की आपल्याला या चिमण्यांसाठी अजुन काही करता येइल का?

खरेतर सर्वच आपले होते. एका विचाराने, समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी लक्षात घेवून एकत्र आलेले समविचारी लोक होते त्यामुळे कुणाचेही आभार वगैरे मानण्याची आवश्यकता नव्हती. तरीही एक औपचारिकता म्हणुन हबाने आभार प्रदर्शन उरकुन घेतले आणि अल्पोपहाराची घोषणा केली. मी आर्या यांनी मुलांचे वय लक्षात घेवून त्यांच्यासाठी केक आनि चिवडा असा अल्पोपहाराचा बेत आखला होता. इथे थोडेसे खाऊन घ्यायचे आणि बाहेर पडल्यावर एखाद्या हॉटेलात जेवण करायचे असा बेत होता. त्यामुळे मुलांनी पटापटा केक संपवले आणि सहलीसाठी तयार व्हायची तयारी, धावपळ सुरू झाली.

त्यानंतर काही मुले आणि मायबोलीकर डॉक्टरांच्या गाडीत, काही मुले आणि श्री व सौ. महेशभैय्या आणि चनसचे बंधुराज उमेशने पाठवलेल्या गाडीत, काहीजण मिलिंदच्या गाडीत तर उरलेले दत्ताभाऊंच्या गाडीत असे बसून आमची गँग सिंहगडाच्या स्वारीवर निघाली. खडकीहून निघून मजल दरमजल करत सिंहगडाच्या रस्त्याला लागल्यावर तिन्ही गाड्या एकामागोमाग चालल्या होत्या. कधी एकमेकांना ओव्हरटेक केला की सगळी मुलं जोरजोरात कल्ला करत होती, त्यामुळे गाडी चालवताना खूपच मज्जा येत होती.एव्हाना पावसाला सुरूवात झाली होती. आजुबाजुला असलेल्या हिरवाईचा आनंद घेत आम्ही सिंहगडाच्या मार्गाला लागलो.साधारण ३.१५ च्या सुमाराला सिंहगडाच्या पायथ्याशी पोचलो. खाली उतरणार्‍या आणि वर जाणार्‍या गाड्यांनी ट्रॅफिक जॅम झालेलं होतं. वरून येणार्‍या गाड्यांकडून कळलेल्या माहितीनुसार वरपासून लाईन पॅक आहे हे कळल्यावर मुलांच्या जेवणाचा आणि नाशिक मुंबईला परतणार्‍यांचा विचार करून आयत्यावेळी प्लॅन थोडा बदलावा लागला.

सिंहगडापासून १९ किमी असलेल्या पानशेत धरणावर जावे आणि वाटेत काही स्पॉट्स आहेत तिथे हॉल्ट घ्यायचा असे ठरवून सगळ्या गाड्या त्या दिशेने वळवल्या. वाटेतले छोटे धाबे हे बहुतेक ठिकाणी मद्यपान पुरवत असल्याने तिथे मुलांना नेणे शक्य नव्हते. मग काही किमी गेल्यावर एका सुंदर स्पॉटवर जिथे अथांग जलाशय आहे आणि मुलांना खेळायला हिरवळ आहे, लँडस्केपिंग केलेले आहे अश्या ठिकाणी आम्ही थांबलो. मुलांनी मनसोक्त पावसात भिजत खेळण्याचा आनंद लुटला. त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहून खुपच समाधान झाले. आपल्या सभासदांनी पण बहुदा हा स्पॉट पहिल्यांदाच पाहिला होता त्यामुळे यथेच्च फोटोसेशन करून आम्ही पानशेतच्या मार्गाने निघालो. तिथे नेमका नेहमी हजर असणारा भजीवाला आज नव्हता नाहीतर थोडी पोटपुजा तिथेच झाली असती.आता सर्वांनाच भुका लागल्या होत्या म्हणून मग गाड्या सुसाट मारून थेट पानशेतला पोचलो. पानशेतला जाताना प्रत्यक्ष आम्ही पोचलो ते वरसगाव धरणाच्या बोट क्लबवर.तिथे सर्वांची जेवणाची व्यवस्था होतेय हे पाहून आधी तो कार्यक्रम उरकायचं ठरलं....... मुलांनी आणि मोठ्यांनी सगळ्यांनीच भाकरी पिठल्यावर मस्त ताव मारला. सोबतीला हवी तितकी कांदाभजी होतीच....... रिमझिम पावसाच्या साथीने मस्त पोटोबा झाला. थोडेसे इकडे तिकडे बागडत मुलांनी खूपच धमाल केली.मुळात त्या मुलांना बाहेर फिरायला न्यायचा आणि तो आनंद द्यायचा हेतू चांगलाच सफल झाला होता. त्यांचा आनंद हीच त्याची पोचपावती होती.
या सहलीने खुश झालेला "स्पर्श बालग्रामचा' समाधानी परिवार.मनमुराद गप्पा, शेरोशायरी आणि हुदडून झाल्यावर सगळ्यांना परतीचे वेध लागले. चुकामुक झालेले महत्वाची मंडळी आता रेंजमधे आली होती. त्यामुळे संपर्कात राहून पुन्हा परतीच्या वाटेवर एकत्र जमलो.संध्याकाळ झाल्यावर पुन्हा सगळे 'स्पर्श' कडे , त्या चिमण्यांच्या घराकडे निघालो. प्रवासाच्या श्रमाने आता सगळीच पाखरं दमली होती. त्यातल्या एकाने तर गाडीच्या फ्रंटसीटवर माझ्या मांडीवर बसल्या बसल्याच निद्रादेवीची आराधना करायला सुरूवात केली. शेवटी स्पर्शच्या कार्यालयातच सर्व छोट्या दोस्तांसह 'मैत्र जिवांचे' परिवाराचा एक गृप फोटो घेवून दिवसाची सांगता केली.त्या चिमण्यांचा निरोप घेताना पुन्हा एकदा भेटण्याचे वचन देत जड मनाने आम्ही 'स्पर्श' चा निरोप घेतला. दिवसभर भरपूर फिरून, खुप खेळून दमलेली पण आनंदीत झालेली ही चिमणी पाखरं मात्र हसुन "थॅंक्यु भैय्या...., लवकर परत या" म्हणत आनंदाने निरोप देत होती.

"आज या कार्यक्रमांच्या निमीत्ताने त्या लेकरांकडून आयुष्यातील सर्व संकटांशी न घाबरता, न थांबता श्रद्धेने, विश्वासाने झगडण्याचा हा खुप मोठा धडा आम्ही सगळेच शिकलो होतो."

निघताना पुन्हा एकदा हबाने सर्वांना विश्वासाने सांगितले....

"मित्रहो ही तर फक्त सुरूवात आहे, आपल्याला खुप मोठं काम करायचय आणि आपण नक्कीच यशस्वी होवू! "

मला खात्री आहे हबा, आपण नक्कीच यशस्वी होवू. एक दिवस 'मैत्र जिवांचे' ही संस्था तिच्या सेवाभावी कार्यासाठी म्हणून सर्वत्र ओळखली जाईल.

धन्यवाद.

विशाल विजय कुलकर्णी
सचिव
'मैत्र जिवांचे सामाजिक संस्था'
भ्रमणध्वनि क्र.: ९९६७६६४९१९
विरोप पत्ता : maitrajivanche.ngo@gmail.com

उल्लेखनीय ब्लॉग्स...

Kay Vatel te!sahajachBhunga- the social insect!Mazi Sahyabhramanti!Maratha Histoy Calendar!
Man Udhan Varyache!मोगरा फुललाNetbhet.comsaurabh