मावळत्या दिनकरा ....

गुरुवार, २४ फेब्रुवारी, २०११

मी काढलेल्या छायाचित्रांपैकी मला प्रचंड आवडलेले हे छायाचित्र.......


विशाल....


नव्या युगाचे आम्ही शिलेदार....!

नव्या पिढीचे नायक आम्ही
आम्ही असु सरदार....
तिरंगा असे दैवत अमुचे
तिरंगाच तलवार ...

खांद्यावरती शस्त्र तिरंगा
हातामधले कलम तिरंगा
मान उंचावू तुझी तिरंग्या
नव्या युगाचे आम्ही शिलेदार....!

Who's next.....?

मंगळवार, २२ फेब्रुवारी, २०११

फोटोचे आकर्षण कुणाला नसते? मला ही आहे. कुणी फोटो काढतेय म्हटले की नकळत खिशातली फणी केसावरून फिरते. कपड्याची घडी नीट नेटकी केली जाते. मग ओरीसामधल्या बलियंतासारख्या एका छोट्याश्या खेड्यातल्या शेतकर्‍यांची ही मुलं कॅमेरा बघुन वेडावली नसती तर नवलच. पण तसल्या त्या मागासलेल्या खेड्यातील या लेकराचा अ‍ॅटीट्युड मात्र बघण्यासारखा होता.

पुढचा सुपरस्टार मीच...हम भी है जोशमें....विशाल....

विठ्ठल आवडी प्रेमभावो......

गुरुवार, १७ फेब्रुवारी, २०११

काही महिन्यापुर्वी सहज वाईला जायचा योग आला. खरेतर आमचा वाईला जायचा अजिबात मानस नव्हता. आम्ही मजा करायला महाबळेश्वरला गेलो होतो. दोन दिवस तिथे मस्त एंजॉय केले आणि तिसर्‍या दिवशी संध्याकाळच्या वेळी सातार्‍याला जाणारी एस.टी. पकडली. महाबळेश्वरला जाताना त्या धुंदीत मध्येच लागलेले वाई लक्षातच आले नव्हते. पण येताना गाडी वाईला थांबली आणि सौ. ने विचारले उतरायचे का? इथले श्री गणेशाचे दैवत जागृत आहे म्हणतात.

तसे बाप्पाकडे मागायचे काहीच नव्हते. न मागताच त्याने भरभरुन दिलेय, पण योगायोगाने डोक्यात आलेच आहे तर दर्शन घेवुन जावु या उद्देशाने उतरलो वाईला. तिर्थक्षेत्र म्हणले की मला तिथल्या रिक्षावाल्यांची जाम भीती वाटते. कायच्या काय दर सांगतात....! आणि वाई तर दक्षीण काशी म्हणून ओळखले जाते. त्यात तिथल्या बाप्पांनी आपल्या नावाचा डंका त्रिलोकात वाजवलेला. म्हणलं आता हा रिक्षावाला सांगणार १००-१५० रुपये. पहिला धक्का बसला तो म्हणजे तो मिटरने जायला तयार झाला आणि कळस म्हणजे मंदिरापर्यंत रिक्षाचे भाडे फक्त १४ रुपये. मी अवाक ! बाप्पा तू खरोखरच आहेस रे बाबा इथे ....

असो. पाल्हाळ पुरे. वाईचा श्री गजानन जागृत आहे, नवसाला पावतो म्हणुन कुलकर्णी बाईंना त्याचे दर्शन घ्यायचे होते. तिने नक्कीच त्याच्याकडे मागितले असेल...

"पुढचा जन्म असेल तर त्यात हा असला तिरसट नवरा नको रे बाबा !"

वाईच्या श्री गजाननाबद्दल किंवा वाईच्या एकंदर धार्मिक, भौगोलिक माहात्म्याबद्दल मी बोलणार नाहीये. कारण वाई मंदिरांचे गाव म्हणुन ओळखले जाते. मला आता नावेही आठवत नाहीत एवढी मंदिरे आहेत तिथे. तर त्या सर्व गोष्टी टाळुन या पोस्टच्या मुख्य उद्देश्याकडे वळुया.

तर कृष्णेकाठच्या श्री गजाननाचे दर्शन घेतल्यावर साहजिकच मोर्चा तिथे लागुनच असलेल्या श्री काशी विश्वेश्वराच्या मंदिराकडे वळवला. हेमाडपंथी बांधकाम असलेले हे पुरातन मंदीर विलक्षण देखणे आहे. कॅमेरा हातात होताच....गाभार्‍याच्या समोर उभ्या असलेल्या प्रचंड नंदीमहाराजांचे दर्शन घेवुन तिथेच बाजुला असलेली देखणी दिपमाळ कॅमेर्‍यात कैद केली आणि कॅमेरा खांद्याच्या झोळीत टाकला आणि गाभार्‍यात शिरलो.


एक मात्र खरे की श्री शंकराच्या कुठल्याही मंदिराच्या गाभार्‍यात जा. मन लगेच शांत होवुन जाते. सगळी अस्वस्थता, बेचैनी कुठल्याकुठे पळून जाते. इथेही मला तोच अनुभव आला. मी तिथेच एका कोपर्‍यात मस्त पद्मासन घातले आणि जवळ जवळ अर्धातास खणखणीत सुरात ओंकार जागवला. चित्तवृत्ती एकदम उल्हसित झाल्या होत्या. एकच चुक केली. मी पंढरीच्या विठुमाऊलीचा भक्त आहे. मनात विचार आला जसे या काशी विश्वेश्वराचे दर्शन झाले तसेच माझ्या विठुचेही झाले असते तर....!


दिवसभराचा थकवा कुठल्या कुठे पळून गेला होता. थोड्या वेळाने बाहेर आलो आणि पुन्हा कॅमेरा सरसावला. मंदीराचे काही फोटो काढल्यावर सहजच लक्ष कळसाकडे गेले आणि कळसाच्या मागे लालसर होवु लागलेले आकाश दिसले. त्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर काशी विश्वेश्वराच्या मंदिराच्या कळसाचा एक फोटो काढला. फोटो व्यवस्थित आलाय की नाही हे चेक करताना जाणवले.


आपण नेहमी म्हणतो ना परमेश्वर एकच आहे. रुपे वेगवेगळी, आपण त्यांना फक्त वेगवेगळी रुपे आणि नावे दिली आहेत. पण आहे तो एकच. चराचरात भरलेला दिनदयाळू परम परमेश्वर. असं म्हणतात ना तुमच्या मनात ज्याबद्दल श्रद्धा असते तो तुम्हाला जळी स्थली काष्ठी पाषाणी दिसतो. मला या गोष्टीचा त्यावेळी एक विलक्षण अनुभव आला. त्या काशी विश्वेश्वराचा तो कळस बघताना मला त्यात माझ्या विठुमाऊलीचा भास झाला. तूम्ही देखील बघा. तुम्हालाही जाणवेल.


मनात भाव असेल, श्रद्धा असेल तर तो सगळीकडे, अगदी कुठेही दर्शन देतोच.

विठ्ठल नामाचा रे टाहो....
विठ्ठल नामाचा रे टाहो..!
विठ्ठला आवडी...प्रेमभावो....!
विठ्ठल..,विठ्ठल..,विठ्ठल..,विठ्ठल..,विठ्ठल..!

विशाल.

देवभूमी ...., अहं केरळ नव्हे कोकण !

बुधवार, १६ फेब्रुवारी, २०११

दरवर्षीप्रमाणे मुंबईत दिवाळी न करता यावर्षी सोलापूरी घरी आई-आण्णांकडे दिवाळी करायची असा बायकोचा हुकूम होता. आई-आण्णा म्हणजे तिचे लाडके सासु-सासरे (आणि आता पार्टी बदलुन मुलाच्या पक्षातुन सुनेच्या पक्षात स्थलांतर केलेले माझे आई-वडील) एकंदरीत काय तर खिशाला भक्कम बांबु लागला, पण ते चार्-पाच दिवस एवढे सुरेख होते की विचारु नका. ८ तारखेला अचानक आईने तिच्या सुनेला म्हणजे आमच्या शत्रुपक्षाला विचारले...

"काय गं, तुम्ह्मी कोकणात जाणार होता ना?"

हा हन्त हन्त (असंच काहीतरी म्हणतात ना?)! खिशाला लागलेली गळती अजुन संपलेली नव्हती तर. परमपुज्य सासुबाईंची आज्ञा शिरोधार्य मानत सौ. नी आमच्याकडे एक प्रेमळ दृष्टीक्षेप टाकला, खरेतर अजुन चार दिवस घरीच तंगड्या पसरून आराम करण्याची खुप इच्छा होती, पण आईसाहेब आणि सौ. अशी घातक युती झाल्याने मला मान डोलवावीच लागली.

"हो का नाही जावु या ना."

"अरे पण आता इथुन हॉटेल बुकींग , तिकीटे मिळतील का?" इति आईसाहेब. माझ्या आशा पल्लवीत झाल्या.

"त्यात काय आहे, त्या तुझ्या सुन्याला फोन कर ना, तो करेल हॉटेल बुकींग. तो आंबोलीचाच आहे ना. आणि इथुन कोल्हापूरला जावु मिळेल ती गाडी पकडुन, मी लालडब्ब्याने पण यायला तयार आहे."

सौ. ने शेवटचा बाँबगोळा टाकला आणि अस्मादिकांनी शस्त्रे टाकली.

"ओक्के, बघतो, कसे जमते ते?"

तो नालायक सुन्या , माझा मित्र ! पण तो देखील शत्रुपक्षाला फितुर असल्यासारख्या लगेच चौकशी करुन अरे हॉटेल सायली मध्ये जागा आहेत, मी सांगुन ठेवतो त्यांना, म्हणुन मोकळा झाला. (बघुन घेइन साल्या तुला).

एकंदरीत काय तर 'होम स्वीट होम्'चा ५-६ दिवसाचा सुखद मुक्काम सोडून आम्ही कोकणाकडे प्रस्थान केलं.

१. माझं सोलापूरातील घर......२. सोलापूरात असताना मी जिथे कायम पसरलेला असतो ती माझी हक्काची, आवडती (छतावरची) बदामाच्या थंड सावलीतली जागा....९ नोव्हेंबरच्या रात्री १०.१५ वाजता गाडीने सोलापूर सोडले आणि बायकोने कचकचीत चिमटा काढला.

"नाही रे, बघतेय्...आपण खरेच कोकणात चाललोय की अजुनी मी स्वप्नच बघतेय!"

"अगं पण मग तुझा तुला काढुन बघ की चिमटा, मला कशाला त्याचा त्रास?" मी वैतागलो.

"तसं नाही रे, तुझी कातडी गेंड्याची आहे ना, म्हणुन तुझ्यावर आजमावुन बघितले."

"च्यामारी मला राजकारणात स्वारस्य आहे पण याचा अर्थ असा नाही की पण त्यांच्यासारखाच होइन आणि मुळातच स्वर्ग असलेल्या कोकणाला कॅलिफोर्निया बनवायचे आश्वासन देवुन मतांचा जोगवा मागत फिरेन. कै च्या कैच लॉजिक यार तुझं."

माझ्या कुरकुरीकडे सोयिस्कर आणि यशस्वी दुर्लक्ष करुन मॅडम झोपेची आराधना करायला लागल्या. दुसर्‍या दिवशी सकाळी (पहाटे) कोल्हापूर आणि तिथुन आंबोली असा प्रवास करत मुक्कामी येवुन पोहोचली. पहिला दिवस आंबोलीतच काढला. पहिल्या दिवसात काय काय दिवे लावले ते इथे पाहायला मिळेल.....

मला भावलेली आंबोली....

दुसर्‍या दिवशी सकाळी-सकाळीच अनिल, तिथला आमचा स्थानिक ड्रायव्हर कम गाईड आणि पुढे पक्का दोस्त गाडी घेवुन हजर राहीला. आज आमचा कार्यक्रम होता मालवण, सिंधुदुर्ग किल्ला, रॉक गार्डन, तारकर्ली, सावंतवाडी आणि देवबाग.....! देवबागला डॉल्फिन्स पाहायचे आणि वेळ मिळाल्यास तारकर्लीला स्नॉर्कलींग करायचे असा बेतही पक्का झाला. पण ऐनवेळी सिंधुदुर्ग किल्ला आम्ही यादीतुन रद्द केला. या आधीही एकदा पाहीला होता. मग रॉक गार्डन आणि जयंत साळगावकरांचे गणेश मंदीर बघून पुढे प्रस्थान करायचे असा बेत ठरला.

या बागेला रॉक गार्डन का म्हणतात कळले नाही. मान्य आहे बागेला तीन बाजुंनी समुद्री खडकांनी वेढले आहे, पण बागेतली नितांत सुंदर फुले पाहताना मला तरी त्या बागेला रॉक गार्डन म्हणणे अगदीच रुक्षपणाचे लक्षण वाटले.हे थोडं गुलमोहरासारखं दिसणारं फ़ुल नक्की कशाचं होतं कुणास ठाऊक?

पांढरा जास्वंद....कॉसमॉसची पिवळी फुले आणि त्यावर बागडणारी फुलपाखरे हे चित्र तर कोकणात नित्याचेच आहे. पण इथे मात्र हे बिचारं दमुन एका फुलाला चिकटून बसलं होतं.सिंधुदुर्ग येथील इतर ठिकाणांबरोबर श्री. जयंत साळगावकर (कालनिर्णयवाले) यांनी उभारलेल्या श्री गणेशाचे दर्शन घेतले. हे पांढरे शुभ्र मंदीर खुप सुंदर आहे, अगदी एखाद्या सुंदर चित्रासारखे. इथली श्री गणेशाची मुर्ती पंचधातुंची असुन त्यावर निखळ सोन्याचा मुलामा दिलेला आहे. आम्ही दर्शन घेतले आणि लगेचच नैवेद्यासाठी म्हणुन गाभारा बंद करण्यात आला त्यामुळे श्रीमुर्तीचा फोटो नाही घेता आला, मग मी मंदीराच्या बाह्य रुपावरच समाधान मानले.

मंदीराच्या अंगणातल्या छोट्याशा जलकुंडात फुललेले हे कमळ टिपायला मी विसरलो नाही.तिथुन निघालो ते थेट देवांच्या बागेत, देवबागमध्ये जाऊन धडकलो. भारतात खरेतर केरळप्रांताला देवभूमी म्हणुन संबोधले जाते. पण माझ्या मागच्या भेटीत ते बॅक वॉटरचे गढूळ, घाणेरडे पाणी पाहुन मी मनोमन त्याची कोकणातल्या निळ्याशार पाण्याशी आणि स्वच्छ पांढर्‍या रेतीच्या समुद्रकिनार्‍यांशी तुलना करुन बघितली होती. तेव्हाच मी माझ्यापुरते ठरवून टाकले होते....कोकण तो कोकणच. त्याची सर केरळच काय त्या तथाकथीत सुंदर कॅलिफोर्नियालासुद्धा येणार नाही. या जागेला देवबाग हे नाव का दिलं असेल माहीत नाही, पण मला विचाराल तर पुराण काळी ती खरोखर देवांचीच बाग असावी. (नाही म्हणायला आता मानवाच्या व्यवहारी वृत्तीचे ग्रहण लागलेय तिलाही, पण ते चालायचेच) सर्वप्रथम नजरेत भरतो तो दुरपर्यंत पसरलेला पांढर्‍या शुभ्र रेतीचा स्वच्छ समुद्र किनारा...

हिरवेगार उंचच उंच , आकाशाशी स्पर्धा करणारे माड आणि निळेशार आकाश...अनिलने आम्हाला एक बोट स्वस्तात ठरवून दिली. मजा वाटत होती, बाकी बोटीतून किमान १०-१५ माणसे आणि आमच्या बोटीत फक्त आम्ही दोघेच.....!

सगळ्यात पहिला कार्यक्रम होता तो म्हणजे डॉल्फिन्सचे दर्शन. पण बहुदा मासे न खाणार्‍या माझ्या शाकाहारी बायकोचा निषेध करायचा (याला म्हणतात सुड उगवणे!) असे ठरवून त्या दिवशी डॉल्फीन्स फिरकलेच नाहीत पाण्याच्या वरच्या पातळीवर.. अर्धा तास वाट पाहून आम्ही डॉल्फीन्सचा नाद सोडला.जाम कंटाळलो होतो....एक वेळ तर मला त्या ’अजुबा’ मधल्या बच्चनप्रमाणे जोरात "माँ SSSSSSS" म्हणुन साद घालायची अनावर इच्छा झाली. पण मोठ्या संयमाने मी मनाला आवर घातला आणि होडी वळवायला सांगितली.आजुबाजुला जिकडे नजर टाकाल तिकडे नारळीची झाडे, निळे आकाश आणि समुद्र....

बोट खाडीच्या पाण्यात मध्यावर गेली, आता तिथुन दिसणारा किनारा वेड लावत होता. डाव्या हाताला समुद्रात डोंगरातून बाहेर आल्यासारखे दिसणारे भोगवे बीच आणि ऐन समुद्रात लांबवर दिसणारे लाईट हाऊस मोठे मनोरम दिसत होते. हे लाईट हाऊस लांबुन पाण्यात मान खाली घालुन बसलेल्या गाईसारखेच दिसते.

भोगवे बीच....

सगळीकडे निळ्या समुद्राचे अफाट पसरलेले पाणी आणि अथांग आकाश! कशाचे फोटो घेवु, किती घेवु आणि कशाचे नको घेऊ असे झाले होते अगदी...

या देखण्या पाहुण्यांनाही सोडलं नाही. पण यांचा फोटो लांबुनच घ्यावा लागला, जरा जवळ गेलं की भुर्र उडुन जायचे. मग लांबुनच शक्य होइल तेवढा झुम करुन हा फोटो काढला, पण मुळातच कॅमेरा अगदीच साधा असल्याने तेवढासा नाही नीट आला.

इथे देवबागच्या समुद्रकिनार्‍यापासुन जवळव मध्येच एक छोटेसे वाळुचे बेट निर्माण झाले आहे. आम्ही होडकं तिकडे वळीवलं. थोडा वेळ पांढर्‍या शुभ्र रेतीत हुंदडल्यावर मग परत निघालो. निघण्यापुर्वी सागरलाटांनी रेतीशी मस्ती करत रेखाटलेल्या या रांगोळ्या टिपायला विसरलो नाही.त्याबरोबरच स्वतःचाच असा एक आगळा फोटोही काढण्याचा मोह काही आवरला नाही...देवबागहुन परत फिरताना पुन्हा तेच सोलापूरचे घर सोडुन निघतानाचे फिलींग. इथुन निघालो आणि जवळच असलेल्या तारकर्ली बीचवर येवुन ठेपलो. पण देवबागवर जो हरवलो होतो त्या नादात संध्याकाळ होत आलेली होती, त्यामुळे स्नॊर्कलींगचा विचार डोक्यातून काढुन टाकावा लागला.

तारकर्ली बीच मला फ़ारसा नाही आवडला. पण या बीचच्या जवळ असलेले बांबुचे बन मात्र मला खुप आवडले. (मला तरी ते बांबुचेच वाटले इथेच एम.टी.डि.सी.चे रिसोर्ट पण आहे)

परत फ़िरायची इच्छाच होत नव्हती. पण पुन्हा आंबोली घाटातला तो दरड कोसळलेला आणि अर्धाच राहीलेला रस्ता आठवला आणि जड अंत:करणाने तारकर्ली - देवबागचा निरोप घेवुन परत फ़िरलो. परत फ़िरताना सहज मागे वळुन पाहीले मागे दिसणारा हिरव्यागार माडांच्या सावलीतून जाणारा वळणावळणांचा रस्ता आठवण करुन देत होता एका आवडत्या गाण्याची.

हि वाट दूर जाते......, स्वप्नामधील गावा...................बा परमेश्वरा, पुढचा जन्म कोकणातच दे रे बाबा, मग तो कोकणातला एखादा माड म्हणुन असला तरी चालेल.

सद्ध्या इथेच एक अर्धविराम घेवु, बाकीची सफर नंतर..... :)

मीमराठी.नेट वर पुर्वप्रकाशित

विशाल

एक दुर्लक्षीत तिर्थक्षेत्र : मढे घाट

काही स्थळे, जागा मुळातच अतिशय देखण्या असतात, सुंदर असतात. निसर्गाने आपलं सारं वैभव उदारपणे त्यांच्यावर उधळलेलं असतं. तिथे फिरताना "देता किती घेशील दो कराने...!" अशी अवस्था होते मनाची. मुळातच सह्याद्री गेली कित्येक युगे आपल्यावर अशा अमाप वैभवाची उधळण करत आलेला आहे. मग त्यात श्री शिवाजीरांजांचे किल्ले येतात. महाबळेश्वर, आंबोली, माथेरान ई.सारखी हिल स्टेशन्स येतात. सह्याद्रीच्या कुशीतील दर्‍याखोर्‍या, सह्यशिखरं गेली कित्येक वर्षे ट्रेकर्सना आकर्षित करत आलेली आहेत.

पण काही स्थळांना त्यांच्या निसर्गसौंदर्याबरोबरच एक हळवी तरीही पवित्र अशी किनार लाभलेली असते. मढे घाट हे स्थळ त्यापैकीच एक......

पुण्यापासुन साधारण ६५ किमी अंतरावर असलेल्या वेल्हे येथुन मढेघाटाची वाटचाल सुरू होते. निसर्गाचे सारे वैभव लेवुन सुसज्ज असलेला दुर्गम मढेघाट ट्रेकर्ससाठी एक मस्त अनुभव असतो. पण इथे मी मढेघाटाच्या ट्रेकबद्दल लिहीणार नाहीये. मढेघाटाचा ट्रेक करणारे बरेच जण आहेत. इथले पाण्याचे धबधबे, दर्‍या, घाटातले दुर्गम रस्ते याबद्दल आजपर्यंत खुप काही लिहीले गेलेय. त्यामुळे मला पुन्हा त्याबद्दल लिहायचे नाहीये. मला आकर्षण आहे ते मढेघाटातील एका अतिशय पवित्र स्थळाचे....!

"आधी लगिन कोंढाण्याचे मग रायबाचे..!"

पोटच्या पोराच्या रायबाच्या, तोंडावर आलेल्या लग्नाचे आमंत्रण घेवुन आपल्या शिवबाकडे गेलेले सुभेदार आपल्या मुलाचे लग्न एका बाजुला ठेवुन आधी कोंढाणा स्वराज्यात आणण्याची जबाबदारी शिरावर घेवुन महालाबाहेर पडले तेव्हा श्री शिवाजीमहाराजांचे डोळे नक्कीच पाणावले असतील. क्षणभर त्यांना स्वतःच्याच भाग्याचा हेवा वाटला असेल. तो काळच तसा होता. कित्येक मराठा सरदार तेव्हा मुघलांच्या कच्छपी लागलेले. मुघलांनी फेकलेल्या वतनांच्या तुकड्यासाठी स्वत्व विकायला तयार असलेले. अशा काळात स्वतःच्या मुलाचे लग्न बाजुला ठेवुन स्वराज्याच्या कार्याला प्राधान्य देणारा सुभेदार तानाजी मालुसरेंसारखा निष्ठावंत सहकारी लाभणे ही भाग्याची परिसीमाच होती.

आपला शब्द सुभेदारांनी खरा केला. कोंढाणा जिंकून स्वराज्याला आणखी एक बलाढ्य दुर्ग मिळवून दिला. पण स्वराज्याचे दुर्दैव म्हणजे हा दुर्ग 'कोंढाणा' जिंकताना सुभेदार तानाजी मालुसरेंना आपले प्राण गमवावे लागले. मुलाचे लग्न तोंडावर आलेले आणि सुभेदार स्वराज्याच्या उत्कर्षासाठी त्या परम परमेश्वराकडे सामर्थ्य, आशीर्वाद मागायला निघून गेले. किल्लेदार उदेभानाशी लढत देताना सुभेदारांना आपले प्राण गमवावे लागले. धन्य त्या सुर्याजीरावांची.....! मोठे बंधू गतप्राण होवून रणांगणावर पडलेले असतानाही त्यांना आपल्या कर्तव्याची जाणीव होती. सुभेदारांच्या मृत्युनंतर गोंधळलेल्या, सैरावैरा झालेल्या मावळ्यांना उत्तेजीत करत त्या वीराने सुनावले.....!

"पळता काय भ्याडासारखे, गडाचे परतीचे दोर मी केव्हाच कापून टाकले आहेत. आता एकच ध्येय "कोंढाणा स्वराज्यात आलाच पाहीजे. सुभेदारांची बलिदान वाया जाता कामा नये." त्या ललकारीने मावळे पुन्हा पेटून उठले आणि मग इतिहास घडला. अवघ्या तिनशे मावळ्यांच्या साह्याने सुभेदारांनी कोंढाण्यासारखा बलाढ्य दुर्ग स्वराज्याच्या झोळीत टाकला. महाराजांना जेव्हा सुभेदारांच्या बलिदानाबाबत कळले तेव्हा दु:खावेगाने त्यांच्या तोंडुन शब्द निघून गेले...

"गड आला पण सिंह गेला............!" तेव्हापासुन कोंढाणा सिंहगड झाला. आपल्या निष्ठावंत सहकार्‍याच्या बलिदानाची अखंड स्मृती म्हणुन राजांनी कोंढाण्याचे 'सिंहगड' असे बारसे केले. नंतर सिंहगडावरून मोठ्या इतमामाने सुभेदारांचे पार्थिव पालखीतून कोकणातील त्यांच्या गावी "उमरठ" इथे नेण्यात आले. त्यांचे शव ज्या मार्गाने सिंहगडावरून उमरठला नेण्यात आले तो मार्ग म्हणजे मढेघाट !

मी म्हटले ना, मढेघाटाच्या सौंदर्याला एक हळवी पण तरीही पवित्र अशी किनार लाभलेली आहे ती अशी ! मध्ये मढेघाटातून जाताना सुभेदारांचे पार्थिव एका ठिकाणी विश्रांतीसाठी म्हणुन काही काळ ठेवण्यात आले होते. त्या जागी एक छोटीशी छत्री बांधण्यात आली.


आजकाल ही छत्री दुर्लक्षीत अवस्थेत आहे. गडगंज बिल्डर्सना अधिकाअधिक सुविधा प्राप्त करुन देणार्‍या आपल्या सरकारला या पवित्र वास्तुबद्दल काहीच देणेघेणे नाही हे आपले सगळ्यात मोठे दुर्दैव आहे. त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट म्हणजे मढेघाटात ट्रेकला जाणार्‍या ट्रेकर्सपैकी काही शिवभक्त आपापल्या परीने या छत्रीची काळजी घेत असतात. पण अन्यथा इतरवेळी हे पवित्र तिर्थस्थळ दुर्लक्षित अवस्थेतच असते. दुर्दैवाने महाराष्ट्रात आज हि शोकांतिका बहुतेक ९५% इतिहासकालीन स्थळांच्या बाबतीत अनुभवायला मिळते. आपण त्याचे ऋण इतक्या लवकर कसे काय विसरू शकतो?

सुभेदारांची समाधी
नाही म्हणायला सिंहगडावर आता सुभेदार तानाजी मालुसरेंची समाधी बांधण्यात आली आहे. पण मढेघाटातील त्यांचे शेवटचे विश्रांतीस्थळ मात्र दुर्लक्षीत अवस्थेतच आहे.सुभेदारांचा पोवाडा ऐकण्यासाठी इथे टिचकी मारा.

सुभेदार तानाजी मालुसरेंच्या निष्ठेला, त्यांच्या बलिदानाला लाखो प्रंणाम. सरकार भलेही दुर्लक्ष करो पण सुभेदार तुमची बहादुरी, तुमची निष्ठा आणि तुमचे बलिदान मराठी माणुस कधीही विसरणार नाही. तुमच्या बलिदानाची गाथा आम्हाला कायम स्फ़ुर्ती देत राहील, आमच्या कर्तव्याची जाणिव करुन देत राहील.

जय भवानी, जय शिवराय....!

(छायाचित्रे : आंतरजालावरुन साभार)

विशाल कुलकर्णी

विशाल .....

मंगळवार, १५ फेब्रुवारी, २०११

जायंट वुड स्पायडर(Nephila maculata) याला मराठीत काय म्हणायचे? विशाल जंगली कोळी...? ;)
परवा कर्नाळ्याच्या जंगलात फ़िरताना मला या प्रजातीतले कोळी आढळले. त्यांना आपल्या कॅमेरात टिपायचा मोह मला आवरला नाही.


हे मुख्यत्वेकरुन जपान,ऑस्ट्रेलिया आणि पश्चिम भारतात आढळतात. पापुआ न्यू गिनी आदिवासी प्रजातीमध्ये या विशाल कोळ्यांचा स्वादिष्ट भोजन म्हणुन उपयोग केला जातो.


जपानमध्ये त्यांना "ओ ज्योरौ गुमो" (O-jyorou gumo)या नावाने संबोधले जाते.बहुदा "gumo" म्हणजे कोळी आणि jyorou म्हणजे प्रचंड,विशाल!हे कोळी अतिशय घातक असतात. यांचे खास वैशिष्ठ्य म्हणजे पायावर खालच्या बाजुला पिवळ्या रंगाचे मोठे ठिपके असतात.यांचे जाळे किमान एक मिटर आणि कमाल ३-४ मीटर लांबीचेही असु शकते.


हे कोळी golden orb weaver प्रजातीमध्ये मोडतात, कारण यांचे जाळे (रेशिम(?))पिवळसर सोनेरी रंगाचे असते. जगातल्या इतर कुठल्याही कोळ्याच्या जाळ्यापेक्षा याचे जाळे जास्त मजबुत आणि चिवट असते. यां कोळ्यांची एकुण लांबी एक फ़ुटापासुन ४ फ़ुटापर्यंत असु शकते. (एका पायाच्या टोकापासुन दुसर्या पायाच्या टोकापर्यंत). त्यामुळे खुप वेळा छोटे पक्षी तसेच वटवाघळेसुद्धा या जाळ्यात अडकतात.

गंमत म्हणजे काही अंशी विषारी असली तरी ही प्रजाती अतिशय शांत आणि संकोची समजली जाते. बर्याचदा इतर छोटे-छोटे कोळी या विशाल वुड स्पायडरची अंडी, तसेच रेशिम (जाळे) चोरुन त्यावर आपला उदरनिर्वाह करतात. आहे की नाही गंमत !

मग, यायचं कर्नाळ्याला? जायंट वुड स्पायडर बघायला.....

(चित्र मोठे करायला कृपया चित्रावर टिचकी मारा)

विशाल कुलकर्णी.

उल्लेखनीय ब्लॉग्स...

Kay Vatel te!sahajachBhunga- the social insect!Mazi Sahyabhramanti!Maratha Histoy Calendar!
Man Udhan Varyache!मोगरा फुललाNetbhet.comsaurabh