देवभूमी ...., अहं केरळ नव्हे कोकण !

बुधवार, १६ फेब्रुवारी, २०११

दरवर्षीप्रमाणे मुंबईत दिवाळी न करता यावर्षी सोलापूरी घरी आई-आण्णांकडे दिवाळी करायची असा बायकोचा हुकूम होता. आई-आण्णा म्हणजे तिचे लाडके सासु-सासरे (आणि आता पार्टी बदलुन मुलाच्या पक्षातुन सुनेच्या पक्षात स्थलांतर केलेले माझे आई-वडील) एकंदरीत काय तर खिशाला भक्कम बांबु लागला, पण ते चार्-पाच दिवस एवढे सुरेख होते की विचारु नका. ८ तारखेला अचानक आईने तिच्या सुनेला म्हणजे आमच्या शत्रुपक्षाला विचारले...

"काय गं, तुम्ह्मी कोकणात जाणार होता ना?"

हा हन्त हन्त (असंच काहीतरी म्हणतात ना?)! खिशाला लागलेली गळती अजुन संपलेली नव्हती तर. परमपुज्य सासुबाईंची आज्ञा शिरोधार्य मानत सौ. नी आमच्याकडे एक प्रेमळ दृष्टीक्षेप टाकला, खरेतर अजुन चार दिवस घरीच तंगड्या पसरून आराम करण्याची खुप इच्छा होती, पण आईसाहेब आणि सौ. अशी घातक युती झाल्याने मला मान डोलवावीच लागली.

"हो का नाही जावु या ना."

"अरे पण आता इथुन हॉटेल बुकींग , तिकीटे मिळतील का?" इति आईसाहेब. माझ्या आशा पल्लवीत झाल्या.

"त्यात काय आहे, त्या तुझ्या सुन्याला फोन कर ना, तो करेल हॉटेल बुकींग. तो आंबोलीचाच आहे ना. आणि इथुन कोल्हापूरला जावु मिळेल ती गाडी पकडुन, मी लालडब्ब्याने पण यायला तयार आहे."

सौ. ने शेवटचा बाँबगोळा टाकला आणि अस्मादिकांनी शस्त्रे टाकली.

"ओक्के, बघतो, कसे जमते ते?"

तो नालायक सुन्या , माझा मित्र ! पण तो देखील शत्रुपक्षाला फितुर असल्यासारख्या लगेच चौकशी करुन अरे हॉटेल सायली मध्ये जागा आहेत, मी सांगुन ठेवतो त्यांना, म्हणुन मोकळा झाला. (बघुन घेइन साल्या तुला).

एकंदरीत काय तर 'होम स्वीट होम्'चा ५-६ दिवसाचा सुखद मुक्काम सोडून आम्ही कोकणाकडे प्रस्थान केलं.

१. माझं सोलापूरातील घर......२. सोलापूरात असताना मी जिथे कायम पसरलेला असतो ती माझी हक्काची, आवडती (छतावरची) बदामाच्या थंड सावलीतली जागा....९ नोव्हेंबरच्या रात्री १०.१५ वाजता गाडीने सोलापूर सोडले आणि बायकोने कचकचीत चिमटा काढला.

"नाही रे, बघतेय्...आपण खरेच कोकणात चाललोय की अजुनी मी स्वप्नच बघतेय!"

"अगं पण मग तुझा तुला काढुन बघ की चिमटा, मला कशाला त्याचा त्रास?" मी वैतागलो.

"तसं नाही रे, तुझी कातडी गेंड्याची आहे ना, म्हणुन तुझ्यावर आजमावुन बघितले."

"च्यामारी मला राजकारणात स्वारस्य आहे पण याचा अर्थ असा नाही की पण त्यांच्यासारखाच होइन आणि मुळातच स्वर्ग असलेल्या कोकणाला कॅलिफोर्निया बनवायचे आश्वासन देवुन मतांचा जोगवा मागत फिरेन. कै च्या कैच लॉजिक यार तुझं."

माझ्या कुरकुरीकडे सोयिस्कर आणि यशस्वी दुर्लक्ष करुन मॅडम झोपेची आराधना करायला लागल्या. दुसर्‍या दिवशी सकाळी (पहाटे) कोल्हापूर आणि तिथुन आंबोली असा प्रवास करत मुक्कामी येवुन पोहोचली. पहिला दिवस आंबोलीतच काढला. पहिल्या दिवसात काय काय दिवे लावले ते इथे पाहायला मिळेल.....

मला भावलेली आंबोली....

दुसर्‍या दिवशी सकाळी-सकाळीच अनिल, तिथला आमचा स्थानिक ड्रायव्हर कम गाईड आणि पुढे पक्का दोस्त गाडी घेवुन हजर राहीला. आज आमचा कार्यक्रम होता मालवण, सिंधुदुर्ग किल्ला, रॉक गार्डन, तारकर्ली, सावंतवाडी आणि देवबाग.....! देवबागला डॉल्फिन्स पाहायचे आणि वेळ मिळाल्यास तारकर्लीला स्नॉर्कलींग करायचे असा बेतही पक्का झाला. पण ऐनवेळी सिंधुदुर्ग किल्ला आम्ही यादीतुन रद्द केला. या आधीही एकदा पाहीला होता. मग रॉक गार्डन आणि जयंत साळगावकरांचे गणेश मंदीर बघून पुढे प्रस्थान करायचे असा बेत ठरला.

या बागेला रॉक गार्डन का म्हणतात कळले नाही. मान्य आहे बागेला तीन बाजुंनी समुद्री खडकांनी वेढले आहे, पण बागेतली नितांत सुंदर फुले पाहताना मला तरी त्या बागेला रॉक गार्डन म्हणणे अगदीच रुक्षपणाचे लक्षण वाटले.हे थोडं गुलमोहरासारखं दिसणारं फ़ुल नक्की कशाचं होतं कुणास ठाऊक?

पांढरा जास्वंद....कॉसमॉसची पिवळी फुले आणि त्यावर बागडणारी फुलपाखरे हे चित्र तर कोकणात नित्याचेच आहे. पण इथे मात्र हे बिचारं दमुन एका फुलाला चिकटून बसलं होतं.सिंधुदुर्ग येथील इतर ठिकाणांबरोबर श्री. जयंत साळगावकर (कालनिर्णयवाले) यांनी उभारलेल्या श्री गणेशाचे दर्शन घेतले. हे पांढरे शुभ्र मंदीर खुप सुंदर आहे, अगदी एखाद्या सुंदर चित्रासारखे. इथली श्री गणेशाची मुर्ती पंचधातुंची असुन त्यावर निखळ सोन्याचा मुलामा दिलेला आहे. आम्ही दर्शन घेतले आणि लगेचच नैवेद्यासाठी म्हणुन गाभारा बंद करण्यात आला त्यामुळे श्रीमुर्तीचा फोटो नाही घेता आला, मग मी मंदीराच्या बाह्य रुपावरच समाधान मानले.

मंदीराच्या अंगणातल्या छोट्याशा जलकुंडात फुललेले हे कमळ टिपायला मी विसरलो नाही.तिथुन निघालो ते थेट देवांच्या बागेत, देवबागमध्ये जाऊन धडकलो. भारतात खरेतर केरळप्रांताला देवभूमी म्हणुन संबोधले जाते. पण माझ्या मागच्या भेटीत ते बॅक वॉटरचे गढूळ, घाणेरडे पाणी पाहुन मी मनोमन त्याची कोकणातल्या निळ्याशार पाण्याशी आणि स्वच्छ पांढर्‍या रेतीच्या समुद्रकिनार्‍यांशी तुलना करुन बघितली होती. तेव्हाच मी माझ्यापुरते ठरवून टाकले होते....कोकण तो कोकणच. त्याची सर केरळच काय त्या तथाकथीत सुंदर कॅलिफोर्नियालासुद्धा येणार नाही. या जागेला देवबाग हे नाव का दिलं असेल माहीत नाही, पण मला विचाराल तर पुराण काळी ती खरोखर देवांचीच बाग असावी. (नाही म्हणायला आता मानवाच्या व्यवहारी वृत्तीचे ग्रहण लागलेय तिलाही, पण ते चालायचेच) सर्वप्रथम नजरेत भरतो तो दुरपर्यंत पसरलेला पांढर्‍या शुभ्र रेतीचा स्वच्छ समुद्र किनारा...

हिरवेगार उंचच उंच , आकाशाशी स्पर्धा करणारे माड आणि निळेशार आकाश...अनिलने आम्हाला एक बोट स्वस्तात ठरवून दिली. मजा वाटत होती, बाकी बोटीतून किमान १०-१५ माणसे आणि आमच्या बोटीत फक्त आम्ही दोघेच.....!

सगळ्यात पहिला कार्यक्रम होता तो म्हणजे डॉल्फिन्सचे दर्शन. पण बहुदा मासे न खाणार्‍या माझ्या शाकाहारी बायकोचा निषेध करायचा (याला म्हणतात सुड उगवणे!) असे ठरवून त्या दिवशी डॉल्फीन्स फिरकलेच नाहीत पाण्याच्या वरच्या पातळीवर.. अर्धा तास वाट पाहून आम्ही डॉल्फीन्सचा नाद सोडला.जाम कंटाळलो होतो....एक वेळ तर मला त्या ’अजुबा’ मधल्या बच्चनप्रमाणे जोरात "माँ SSSSSSS" म्हणुन साद घालायची अनावर इच्छा झाली. पण मोठ्या संयमाने मी मनाला आवर घातला आणि होडी वळवायला सांगितली.आजुबाजुला जिकडे नजर टाकाल तिकडे नारळीची झाडे, निळे आकाश आणि समुद्र....

बोट खाडीच्या पाण्यात मध्यावर गेली, आता तिथुन दिसणारा किनारा वेड लावत होता. डाव्या हाताला समुद्रात डोंगरातून बाहेर आल्यासारखे दिसणारे भोगवे बीच आणि ऐन समुद्रात लांबवर दिसणारे लाईट हाऊस मोठे मनोरम दिसत होते. हे लाईट हाऊस लांबुन पाण्यात मान खाली घालुन बसलेल्या गाईसारखेच दिसते.

भोगवे बीच....

सगळीकडे निळ्या समुद्राचे अफाट पसरलेले पाणी आणि अथांग आकाश! कशाचे फोटो घेवु, किती घेवु आणि कशाचे नको घेऊ असे झाले होते अगदी...

या देखण्या पाहुण्यांनाही सोडलं नाही. पण यांचा फोटो लांबुनच घ्यावा लागला, जरा जवळ गेलं की भुर्र उडुन जायचे. मग लांबुनच शक्य होइल तेवढा झुम करुन हा फोटो काढला, पण मुळातच कॅमेरा अगदीच साधा असल्याने तेवढासा नाही नीट आला.

इथे देवबागच्या समुद्रकिनार्‍यापासुन जवळव मध्येच एक छोटेसे वाळुचे बेट निर्माण झाले आहे. आम्ही होडकं तिकडे वळीवलं. थोडा वेळ पांढर्‍या शुभ्र रेतीत हुंदडल्यावर मग परत निघालो. निघण्यापुर्वी सागरलाटांनी रेतीशी मस्ती करत रेखाटलेल्या या रांगोळ्या टिपायला विसरलो नाही.त्याबरोबरच स्वतःचाच असा एक आगळा फोटोही काढण्याचा मोह काही आवरला नाही...देवबागहुन परत फिरताना पुन्हा तेच सोलापूरचे घर सोडुन निघतानाचे फिलींग. इथुन निघालो आणि जवळच असलेल्या तारकर्ली बीचवर येवुन ठेपलो. पण देवबागवर जो हरवलो होतो त्या नादात संध्याकाळ होत आलेली होती, त्यामुळे स्नॊर्कलींगचा विचार डोक्यातून काढुन टाकावा लागला.

तारकर्ली बीच मला फ़ारसा नाही आवडला. पण या बीचच्या जवळ असलेले बांबुचे बन मात्र मला खुप आवडले. (मला तरी ते बांबुचेच वाटले इथेच एम.टी.डि.सी.चे रिसोर्ट पण आहे)

परत फ़िरायची इच्छाच होत नव्हती. पण पुन्हा आंबोली घाटातला तो दरड कोसळलेला आणि अर्धाच राहीलेला रस्ता आठवला आणि जड अंत:करणाने तारकर्ली - देवबागचा निरोप घेवुन परत फ़िरलो. परत फ़िरताना सहज मागे वळुन पाहीले मागे दिसणारा हिरव्यागार माडांच्या सावलीतून जाणारा वळणावळणांचा रस्ता आठवण करुन देत होता एका आवडत्या गाण्याची.

हि वाट दूर जाते......, स्वप्नामधील गावा...................बा परमेश्वरा, पुढचा जन्म कोकणातच दे रे बाबा, मग तो कोकणातला एखादा माड म्हणुन असला तरी चालेल.

सद्ध्या इथेच एक अर्धविराम घेवु, बाकीची सफर नंतर..... :)

मीमराठी.नेट वर पुर्वप्रकाशित

विशाल

3 प्रतिसाद:

सिद्धार्थ म्हणाले...

कोकणाबद्दल प्रश्नच नाही. देवबागदेखील छान आहे. आम्ही नुकतेच डिसेंबरमध्ये देवबागला जाऊन आलो. आम्हाला संद्याकाळी डॉल्फिन पाहायला मिळाले. डिसेंबर-जानेवारी दरम्यान तिथे हमखास डॉल्फिन दिसतात म्हणे. बाकी मी रत्नागिरीला समुद्रकिनारी लहानाचा मोठा झालो तरी देवबागने मलाही भुरळ घातली. तिथला बीच खूपच सुंदर आणि स्वच्छा आहे.

देवबागबद्दलची माझी पोस्ट इथे आहे.

सुहास झेले म्हणाले...

मस्तच...कोकण फिरायचा आहे..
योग जुळून येत नाय तेव्हा फोटोतूनच बघतोय :)

alka katdare म्हणाले...

khup sundar photo. varnan hi sundar. tethe jaun alyacha anand milato.

टिप्पणी पोस्ट करा

उल्लेखनीय ब्लॉग्स...

Kay Vatel te!sahajachBhunga- the social insect!Mazi Sahyabhramanti!Maratha Histoy Calendar!
Man Udhan Varyache!मोगरा फुललाNetbhet.comsaurabh