उन्हाळी वर्षाविहार : उल्हास व्हॅली / कॅनियॉन व्हॅली ट्रेक

बुधवार, १८ मे, २०११

सर्वप्रथम मनःपूर्वक आभार : एक उत्साही मायबोलीकर यो रॉक्स उर्फ योगेश कानडे, ज्याने या ट्रेकचा वृत्तांत माबोवर टाकला आहे. मी त्याच्या अनुमतीने त्या वृत्तांतातील काही वाक्ये जशीच्या तशी उचलून इथे टाकली आहेत, लिहीण्याचा कंटाळा दुसरे काय ;-) त्या 'यो'चे आणि अर्थातच सुनील गावडे उर्फ सुन्या ज्याच्या मदतीशिवाय हा ट्रेक शक्यच झाला नसता अगदी मन:पूर्वक आभार ! 
(कृपया मुळ साईझमधले प्रकाशचित्र पाहण्यासाठी त्यावर एक टिचकी मारा :) )

एप्रिल उजाडला नि सुर्य अधिक प्रसन्नतेने तळपु लागला.. घामाच्या धारा वाहु लागल्या.. अशा गरमीचा वैताग कोणाला नाही येणार.. नि अशा नकोश्या उकाड्यात जर कोणी विचारले "चल ट्रेकला येतोस का ? " तर नक्कीच नकारार्थी उत्तर मिळेल.. त्यातच 'अरे चल ना, मस्त धबधब्याखाली डुंबून येवु ' म्हटले तर वेड्यातच काढतील.. कोण्या पाणीटंचाईग्रस्त नवी मुंबईकराला विचारले तर तो आपल्याकडच्या बादल्या पाठवुन देईल.. पण ह्या उकाड्यात अशी एक जागा आहे जिथे तुम्हाला नक्कीच गारवा मिळतो.. धबधब्याच्या पाण्यात भिजण्याचा आनंद मनमुराद लुटता येतो.. त्या जागेचे नाव.. उल्हास व्हॅली ! ज्यालाच कॅनियॉन व्हॅली असेही म्हणतात....!

या जागेची माहिती द्यायची म्हटली तर ह्या व्हॅलीचे वास्तव्य लोणावळा-खंडाळा घाटात उल्हास नदीच्या सान्निध्यात वसलेले आहे.. ज्याची लांबी म्हणाल तर लोणावळ्यापासुन कर्जत डोंगररांगेपर्यंत विस्तारीत आहे.. ह्यालाच टायगर व्हॅली असेही संबोधतात (का ते माहीत नाही).. एकमेकांना समांतर अशा दोन पहाडांच्या भिंतीमध्ये खोल नि अरुंद असणारी नि नागमोडी वळणाचा आकार घेत डोंगररांगातुन जाणारी दरी म्हणुनच हिला कॅनियॉन व्हॅली असे म्हणतात.. या व्हॅलीचे मुख्य आकर्षण म्हणजे इथे असलेले दोन धबधबे.. तसे पाण्याचे छोटेखानी झरे नि धबधबे वाटेत बरेच लागतात पण हेच दोन धबधबे प्रमुख आहेत.. त्यातील एका धबधबा केवळ वरुन(दरीच्या टोकावरुन) न्याहाळता येतो.. तिथे जाणे अशक्य.. तर दुसरा धबधबा आमच्यासारख्या हौशी मंडळींसाठी खुला आहे..

आम्ही सात मायबोलीकर सम्या रानडे, झकासराव, राज्या, विन्या भिडे, सुन्या, अस्मादिक आणि दस्तुरखुद्द श्री श्री यो रॉक्स या वेळी गनीम धूळीस मिळवायचाच या आवेशाने व्हॅलीवर चालून गेलो. प्रत्यक्षात तो देखणा, रौद्र निसर्गपुरूष पाहिल्यावर एका क्षणात गारद, नतमस्तक होवून गेलो ही बाब अलाहिदा.


साधी सरळ वाट, बरोबर झुळ झुळ वाहणार्‍या पाण्याची सोबत.. सुदैवाने व्हॅलीत सुर्यदेवाची कृपा असल्याने उन्हे पोहचत नव्हती. त्यामुळे सुखैनैव प्रवास चालू होता. वाट तर एवढी सोपी होती...एवढी सोपी होती.... की झक्यासुद्धा खुश झाला. >:)


हा ट्रेक म्हणावा तसा सोप्पा ! पण सवय नसेल तर अवघडच ! नि उकाड्यात चढ्-उतार पार करायचे म्हणजे कसरतच ! इथे जाण्याचा मार्ग नेहमीच्या ट्रेकच्या अगदी उलटे ! कारण दरी म्हटले तर पहिले उतरावे लागणार होते नि ट्रेकचा शेवट चढण पार करुन होणार होता.. एका पहाडावरुन उतरायचे नि दुसर्‍या पहाडावरुन चढायचे.. वाट अर्थातच खडकाळ ! त्यामुळे उड्या मारत मार्गक्रमण करणे भाग होते..

आपले पुर्वज माकड होते याचा आनंद वाटावा अशीच आणि इतकी सोपी वाट होती अगदी ~X(


खडकाळ वाट पार करत असतानाच काही अंतराने एक अंदाजे १० फुटाचा पॅच लागला.. तो पाहिला नि झक्या दचकला नाही तर नवलच ! त्याच्यासोबत सम्यालाही प्रश्न्न पडला 'इकडुन एकवेळ उतरु पण चढणार कसे ?' पण आपली परतीची वाट वेगळी असल्याचे सुन्याने सांगितले नि त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.. पण परतीची वाट काय आहे ते वर चढतानाच कळणार होते ! इकडुनच मग एकेक करुन खाली उतरलो....! धन्स टू सुन्या आणि योग्या... त्यांच्यासारखे पट्टीचे ट्रेकर्स बरोबर होते म्हणून ठिक नाहीतर आमची हालतच होती...

मी आणि विन्या जीव मुठीत धरून उतरताना ...


आमच्या मागे मात्र सगळे मग एकमेकाचा आधार घेत, देत साखळी करूनच उतरले.हा रॉकपॅच कसाबसा पार केला तर पुढे दुसरा वाटच बघत होता. सम्या आपले कौशल्य आजमावताना...


शेवटी धडपडत उड्या मारत कसेबसे मध्यावर येवून पोचलो. इथे पोचल्यावर सुन्याने सम्याची फिरकी घेतली. इथुन सरळ खाली उतरायचे आहे असे सांगितल्यावर राज्याने लगेचच मी ढिस्स म्हणून जाहीर केले तर सम्याने बस्स झाला ट्रेक आता खायचे सामान काढा अशी फरमाईश केली. आम्ही उगाचच जातीवंत ट्रेकर्सच्या आवेशात तिथे फोटोही काढून घेतले, जणुकाही तिथुनच चढून वर आलो होतो. ;-)


तिथुन पुढे अजुन साधारण अर्धा तास उड्या मारत चालल्यावर शेवटी एकदाचे मुळ धबधब्यापाशी पोचलो.... जे काही समोर उभं होतं तो सौंदर्याचा उत्तुंग आविष्कार होता. नेहमी डेस्टीनेशनला पोहोचलो की आनंदाने आरोळ्या मारल्या जातात. पण आज सगळेच नि:शब्द झालो होतो. तोंडातून शब्दच फुटत नव्हते. ती देखणेपणाची परिसीमा होती, भान हरपले होते. थोड्या वेळाने भानावर आलो आणि कॅमेरा सरसावला.


बरेच फोटो काढून झाल्यावर मग अर्थातच जलविहार...
च्यायला जलविहार कसला... पाण्यात उच्छाद मांडला आम्ही !


त्यानंतर अर्थातच खादाडी.. :D


त्यानंतर काही ग्रुप फोटो काढून मग परतीची वाट धरली.परतीची वाट धरण्यापुर्वी सम्याने आणलेल्या पुरणपोळ्यांवर ताव मारला. मायबोली कॅलेंडरसाठी एक स्पेशल फोटो शुट केले (ते फोटो सेन्सॉर्ड असल्याने इथे टाकलेले नाहीत. रिक्वेस्ट आल्यास मेलने पाठवले जातील ;-) )

परतीची वाटपण सोपी नव्हती, त्यात आत पोट भरलेले असल्याने अजुनच अंगावर येत होती. त्यात दोन तीन जरा अवघड वाटणारे (आम्हाला) रॉक पॅचेस होते. पण एकमेकांच्या मदतीने ते पार केले आणि शेवटी एका ठिकाणी थोडावेळ विश्रांती घेतली.


थोडा वेळ विश्रांती घेवून पुन्हा वर चढायला सुरूवात केली. उतरताना लोणावळ्याकडून उतरलो होतो, आता पुन्हा वर चढताना मात्र खंडाळ्यात पोहोचलो. वर पोहोचल्यावर एक नजर खालच्या वाटेकडे टाकली..दुरवर पसरलेली उल्हास व्हॅली दिसत होती. पुन्हा एकदा कॅमेरा सरसावला.शेवटी नेहमीप्रमाणे एक स्टायलीश फोटो काढलाच. नेहमी उडी मारुन फोटो घेण्याचा कार्यक्रम असतो म्हणे ट्रेकर्सचा, पण यावेळी माझ्या अंगात तरी ताकदच नव्हती त्यामुळे शांतपणे एका दगडावर बसुन फोटो काढून घेतला. आणि पुढच्या ट्रेकची आखणी लवकरच करायची असे ठरवून पाखरे आपापल्या घराकडे परत निघाली.


(मीमराठी.नेट वर पुर्वप्रकाशित)
{ टिचक्या मारून दमलात का? जावू द्या, होतं असं कधी कधी... :) }

विशाल कुलकर्णी

समाप्त.

0 प्रतिसाद:

टिप्पणी पोस्ट करा

उल्लेखनीय ब्लॉग्स...

Kay Vatel te!sahajachBhunga- the social insect!Mazi Sahyabhramanti!Maratha Histoy Calendar!
Man Udhan Varyache!मोगरा फुललाNetbhet.comsaurabh