माझा हॉलंड दौरा : मडुरोडम – बोन्साय हॉलंडचे ……!!!

मंगळवार, ३ ऑगस्ट, २०१०

पण कंडक्टर मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं किं मी इथे नविन आहे, तेव्हा स्टॉप आल्यावर मला तसे कळवा. तुम्ही का नाही सांगितलं?
मी अगदी तावातावाने बस कंडक्टरशी भांडत होतो. झालं असं कि बसमध्ये बसताना मी चव्हाणनगरचं तिकीट काढलं होतं. स्टॉपची माहीती नसल्याने कंडक्टरला सांगितलं की स्टॉप आल्यावर मला कळवा. या शहाण्याने मला सांगितलच नाही. मध्येच शंका येवुन त्याला विचारायला गेलो, चव्हाणनगर आलं का म्हणुन तर तो पर्यंत बस एन.सी.एल.ला पोचली होती. तो शहाणा माझ्यावरच आरोप करायला लागला की मी कमी पल्ल्याचं तिकीट काढुन जास्त प्रवास करतोय आणि सरकारला फसवतोय.
माझं टाळकं सटकलं, “पगार कशाचा घेता मग? नव्या माणसाने काय प्रवास करायचाच नाही काय?”
“ओ, आम्हाला काय तेवढंच काम आहे का?” सौजन्यशील बसवाहक.
“अहो ते तुमचं कामच आहे ना ? नविन माणसाला थोडंच माहित असणार आहे कुठलं ठिकाण कुठे आहे ते? तो तुम्हालाच विचारणार ना? आणि पैशाचं मला सांगु नका…!”
मी रागारागात खिशात हात घातला आणि हाताला आली ती नोट बाहेर काढली. त्याच्या हातावर टेकवली आणि खेकसलो.
“हे घ्या यातुन माझ्या जादाच्या प्रवासाचे पैसे कापुन घ्या आणि राहीलेल्या पैशाचे तुमच्या लेकरांना खाऊ घेवुन जा.”
(अरे देवा, ती चुकुन वीसची निघाली, आता सुटे परतही मागता येत नव्हते.)
आणि मी रागारागाने तणतणतच (मनातल्या मनात हळहळत) बसमधुन उतरलो…..! ट्रिंग ट्रिंग ..बहुतेक कंडक्टरने बेल दिली आणि बस धाडधाड करीत पुढे निघुन गेली.
“XXXXX….., साले !” रागा रागाने मी शिवी हासडली…………..
………………
“व्हॉट डु यु सेड सर? आय एम सॉरी, बट द बस इज वेइंग फॉ यु! इट्स युवर डेस्टिनेशन सर ! “
मी एकदम दचकुन जागा झालो, त्या वातानुकुलीत बसचा चालक (ड्रायव्हर) अगदी नम्रपणे माझ्यापुढे उभा राहुन काहीतरी विचारत होता. मी गोंधळल्यासारखा त्याच्याकडे पाहायला लागलो. तसा तो हळुच हसला आणि म्हणाला..
“सॉरी फॉर डिस्टर्बींग युवर पीस बट इट’स युवर डेस्टिनेशन, इट्स मडुरोडम !”
मला मेल्याहुन मेल्यासारखे झाले, सॉलीड शरमलो. नकळत हात जोडले गेले आणि मी त्याच्या सकट बसमधील सर्वांचीच क्षमा मागितली.
“आय एम सॉरी लेडीज अँड जंटलमेन, एक्स्ट्रिमली सॉरी फॉ द ट्रबल! ” मी भरदिशी बसमधुन उतरलो. उतरताना मागुन आवाज आला..
“थँक यु सर अँड सी यु अगेन अँड वन्स अगेन सॉरी फॉर डिस्टर्बींग युवर पीस.”
मला उगाचच माझ्या डोक्यावर त्या नंदाच्या कार्ट्यासारखी मोरपीसे असल्याचा भास झाला.
तसा मी मागे वळलो आणि ड्रायव्हरसकट बसमधल्या सर्वांनाच मनापासुन अभिवादन केले आणि खाली उतरलो. बस सुळकन पुढे निघुन गेली.

इथे कुठेही तुलना करण्याचा हेतु नाहीये, किंवा कुणालाही नावे ठेवण्याचाही हेतु नाही पण हा फरक मला जाणवला तिथे आणि मी स्वत:शीच हसलो. अर्थात तिथल्या ग्रामीण भागातून फ़िरताना पुणे मुंबई बरी म्हणावी असेही बसचालकांचे अनुभव आले म्हणा तिथेही. असो…स्वप्न आणि सत्य किती वेगवेगळं असतं नाही. पण ते असं सुखदही असु शकतं?
झालं होतं असं की ट्रेनिंगसाठी म्हणुन नेदरलँड ला आलेलो. विकांताला कुठेतरी जायचं म्हणुन योलांडाला कुठुनतरी हॉलंडचा मॅप मिळवायला सांगितला.
योलांडा (Jolanda Klaver), आमची ऑफीस मॅनेजर …. खरेतर तिचे नाव Jolanda Clever असायला हवे होते. She is so smart and clever.

योलांडा क्लेव्हर
मी तिला जेव्हा जवळपासच्या प्रेक्षणीय स्थळांबद्दल विचारले तेव्हा तिचा पहिला प्रश्न होता…
ओह फिशाल, (ती नक्की काय म्हणते कुणास ठाउक, पण ते मला फिशाल असंच ऐकु येतं) यु वान्ना गो साईट सीइंग? शॅल आय अरेंज अ टॅक्सी फॉ यु? नो वरी, कंपनी विल पे दॅट!
ओह थँक्स योलांडा, बट आय वुड प्रिफर सम पब्लिक ट्रान्सपोर्ट. इट विल अलोव मी टू इंटरॅक्ट विथ पिपल ओव्हर हिअर. आय वॊंट टू टॉक टू देम!
ओह, दॅट्स फाईन, आय विल अरेंज सम बस टोकन्स फोर यु !!
आमच्या दोघात एकच साम्य आहे. ते म्हणजे ती डच आणि मी मराठी, (हे साम्य नाहीय काही .. लगेच भुवया उंचावु नका ;-) तर त्यामुळे आम्हा दोघांचेही इंग्रजी ब्रिटिश साहेबाने फाड फाड तोंडात मारुन घ्यावे असे आहे. कदाचित म्हणुनच आमचे जास्त जमते. नाहीतर ५८ वर्षाची योलांडा आणि बत्तीशीतला मी आमची दोस्ती जुळणे कठिणच होते. पण नंतर काही दिवसातच माझ्या लक्षात आलं की ही बाई एवढी गोड आहे की कुणीही तिच्या प्रेमात पडावं. माझं लग्न झालेलं नसतं तर वयाचा फरक विसरुन मीही तिच्या प्रेमात पडलो असतो. (तसा पडलोच होतो म्हणा पण जरा वेगळ्या अर्थाने :-) ).
शुक्रवारी संध्याकाळी ऑफीस सुटायच्या आधी मॅप, बसची टोकन्स, मिनरल वॉटरच्या दोन बाटल्या आणि कोकचे दोन कॅन माझ्या टेबलावर हजर होते.
तर पहिली भेट होती मडुरोडम…. इथे हॉलंडमधील बहुतेक सर्व ऐतिहासिक तसेच आधुनिक प्रेक्षणीय स्थळांच्या छोट्या प्रतिकृती बघायला मिळतात किंबहुना हॉलंड बघायचे असल्यास एका मडुरोडमला भेट देणे पुरेसे असते. इथेही अर्थातच मी गाईड घेण्याचे टाळले, कंपनी देतेय म्हणुन लुटायचेच काय? त्याचे तोटे आता समजताहेत. आत बरंच काही बघण्यासारखे होते..फक्त त्या ठिकाणांची नावे काही कळाली नाहीत. नाही म्हणायला तिथले एक माहितीपत्रक होते मिळालेले पण पुन्हा इंग्रजी वाचायचे म्हणजे …?
प्रवेशद्वार..

आत शिरल्या शिरल्या समोर दिसतो तो समुद्र, कदाचित पोर्ट ऑफ रोटरडॅम किंवा अ‍ॅमस्टरडॅम (हे ही मिनिएचरच बरं का!)

रोटरडम पोर्ट




हे सगळंच डोळ्याचं पारणं फेडणारं असतं. तिथुन मग मी मनात नसतानाही हळुच पुढे सरकतो. इथेच मला एक आनंदाचा धक्का बसला (जो नंतर चांगलाच धक्का देवुन गेला :-( ) थोडे पुढे आल्यावर काही महाराष्ट्रीयन जोडपी भेटली. त्यांच्याकडुन कळाले कि ते केसरीच्या टुरबरोबर आले होते. दोन तीन कोल्हापुरकर होते, एक मुंबईचे कुटंब होते आणि बरीचशी पुणेकर मंडळी. मुंबईकरांबरोबर दोन अतिषय सुंदर कन्या असल्यामुळे माझा भिडस्तपणा नडला, फारसे बोलणेच झाले नाही. पुणेकरांची बोलण्याची इच्छाच दिसली नाही. ;-) कोल्हापुरचे बोराडे काका-काकु मात्र बराच वेळ गप्पा मारत होते.
तिथुन पुढे सरकलो आणि बघतच राहीलो. हिरव्यागार झाडीने वेढलेला कुठल्याशा डचेसचा तो देखणा कॅसल मला पुढे सरकुच देइना.

डचेस कॆसल
काही असो या डचांना बहुदा हिरवाईचे, फुलांचे प्रचंड आकर्षण असावे. इथे फिरताना मला प्रत्येक घरासमोर छोटीशी का होइना पण छानशी बाग आढळली ज्यात मला माहीती असलेला गुलाबापासुन अनेकविध सुंदर फुले पाहायला मिळाली.
पुढे मग एकाहुन एक सुंदर अशा प्रतिकृतींची रेलचेलच होती. सगळ्यांची नावे माहीत नाहीत मला पण फोटो इथे टाकतोय…
अ‍ॅमस्टरडॅम येथील दुसर्‍या महायुद्धाचे स्मारक आणि त्यासमोरील राणीचा राजवाडा…शेजारीच तांबड्या रंगात बांधलेले ऑपेरा थिएटर..

राणीचा ’राज’वाडा (मजेशीर वाटतं ना ऐकताना)

अ‍ॅमस्टरडॅम येथील दुसर्‍या महायुद्धाचे स्मारक (वर्ल्ड वॉर २ मेमोरिअल)
आणि हा खरोखरचा राजवाडा ..

ओरिजिनल राजवाडा
अ‍ॅमस्टरडॅमच्या भेटीत इथेच मला शेरलॉक होम्सची आठवण करुन देणारी विक्टोरिया बघायला मिळाली, मी संधी सोडली नाही, राउंड मारायची !!

व्हिक्टोरिया राईड
या राजवाड्याच्या उजव्या बाजुलाच मादाम तुसादचे वॅक्स म्युझियम आहे.
पुढे अजुनही काही देखणी मिनिएचर्स वाट पाहात होती. त्यातली बरीचशी मला अज्ञात अशीच होती…

क्षणभर मला प्रश्न पडला, कशाचा फ़ोटो टिपू? ते सुंदर मिनीएचर की त्याकडे उत्सुकतेने बघणारं हे पाठमोरं गोड पिल्लू :-)


लायडनची देखणी पवनचक्की
ओरिजिनल वन


याला नक्की काय म्हणतात ते आठवत नाही. पण कालव्यांतून रांगेने बोटी सोडण्यासाठी वापरली जाणारी यंत्रणा आहे ही बहुदा.


फ़िशींग लेक
इथेच मला अ‍ॅमस्टरडॅमच्या शिफॉल विमानतळाची प्रतिकृतीही पाहायला मिळाली..

शिफॉल विमानतळ

शिफॉल विमानतळ २

शिफॉल विमानतळ ३

शिफॉल विमानतळ – कंट्रोल टावर
परवा ऑफीसमध्ये विषय निघाला होता. अर्चना म्हणत होती विशालसर आता तुम्ही पण कार घेवुन टाका. कार घेणे अवघड नाही पण जेथे मी राहतो तिथे ठेवायची कुठे आणि मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये माझी बाईक चालवणे कठीण जाते तिथे कार चालवायची म्हणजे महाकठिण काम? त्यामुळे मला नेहेमीच परदेशातील या शिस्तबद्ध ट्रॅफिकचा जाम हेवा वाटतो, त्या लोकांना त्याचे कौतुक वाटले तर त्यात नवल ते काय ….

शिस्तीत चालणारी वाहतूक आणि स्वच्छ रस्ते

शेवेनिंगेन बीचजवळचा ५० मिटरवर समुद्र असुनही स्वच्छ असलेला खराखुरा रस्ता
जवळ जवळ दोन अडिच तास मडुरॉडममध्ये फिरत होतो. निघता निघता स्वतःचेच काही फोटो काढायचा एक प्रयत्न केला.

अस्मादिक : समोरच्या काचेतील स्वत:च्या प्रतिबिंबाचा फ़ोटो काढताना

साला पण इथे माझा थोबडा दिसतच नाय :-(

शेवटी एका ड्च सुंदरीला पटवले आणि स्वत:चा फ़ोटो काढून घेतला.
शेवटी बाहेर पडायची वेळ आली. म्हणजे तसे तिथे काही बंधन नाही. तुम्ही तिथे दिवसभर वेळ घालवु शकता (अर्थात तिकीट काढुनच , त्यावेळी १३.५ युरो आणि मुलांसाठी ८.५ युरो होते, आता बहुदा वाढले आहे) पण मलाच पुढे स्केवेनिंगेन (तिथे याचा उच्चार शेवेनिअन की कायसा करतात) जायचे होते. म्हणुन तिथेच एका फुडस्टॉलवर पिज्झा हाणला. काही सोवेनिअर्स खरेदी केली आणि पुन्हा एकदा ते सगळे मिनी विश्व डोळ्यात भरुन घेत भारलेल्या आणि न भरलेल्या मनाने बाहेर पडलो, ते पुढच्या वेळी पुन्हा एकदा भेट द्यायचे असे मनाशी ठरवतच.
जाता जाता पुन्हा एकदा दर्शनी प्रवेशद्वारावरचा एक देखणा फ़ोटो. फ़ोटोत लॊनमधील गवताला पाणी देणारा माळी आहे बहुदा, पण चित्र काही वेगळेच दिसते ;-)

आता स्केवेनिंगेन किं शेवेनिअनच्या भेटीचा वृत्तांत आता पुढे कधी तरी.
जाता जाता सद्ध्या फ़क्त एक झलक..,  पुढील भागाची कल्पना येण्यासाठी…

शेवेनिंगेन अथवा स्केवेनिंगेन……, समुद्रकिनारा…….!
विशाल कुलकर्णी

0 प्रतिसाद:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय पोस्ट