एक दुर्लक्षीत तिर्थक्षेत्र : मढे घाट

बुधवार, १६ फेब्रुवारी, २०११

काही स्थळे, जागा मुळातच अतिशय देखण्या असतात, सुंदर असतात. निसर्गाने आपलं सारं वैभव उदारपणे त्यांच्यावर उधळलेलं असतं. तिथे फिरताना "देता किती घेशील दो कराने...!" अशी अवस्था होते मनाची. मुळातच सह्याद्री गेली कित्येक युगे आपल्यावर अशा अमाप वैभवाची उधळण करत आलेला आहे. मग त्यात श्री शिवाजीरांजांचे किल्ले येतात. महाबळेश्वर, आंबोली, माथेरान ई.सारखी हिल स्टेशन्स येतात. सह्याद्रीच्या कुशीतील दर्‍याखोर्‍या, सह्यशिखरं गेली कित्येक वर्षे ट्रेकर्सना आकर्षित करत आलेली आहेत.

पण काही स्थळांना त्यांच्या निसर्गसौंदर्याबरोबरच एक हळवी तरीही पवित्र अशी किनार लाभलेली असते. मढे घाट हे स्थळ त्यापैकीच एक......

पुण्यापासुन साधारण ६५ किमी अंतरावर असलेल्या वेल्हे येथुन मढेघाटाची वाटचाल सुरू होते. निसर्गाचे सारे वैभव लेवुन सुसज्ज असलेला दुर्गम मढेघाट ट्रेकर्ससाठी एक मस्त अनुभव असतो. पण इथे मी मढेघाटाच्या ट्रेकबद्दल लिहीणार नाहीये. मढेघाटाचा ट्रेक करणारे बरेच जण आहेत. इथले पाण्याचे धबधबे, दर्‍या, घाटातले दुर्गम रस्ते याबद्दल आजपर्यंत खुप काही लिहीले गेलेय. त्यामुळे मला पुन्हा त्याबद्दल लिहायचे नाहीये. मला आकर्षण आहे ते मढेघाटातील एका अतिशय पवित्र स्थळाचे....!

"आधी लगिन कोंढाण्याचे मग रायबाचे..!"

पोटच्या पोराच्या रायबाच्या, तोंडावर आलेल्या लग्नाचे आमंत्रण घेवुन आपल्या शिवबाकडे गेलेले सुभेदार आपल्या मुलाचे लग्न एका बाजुला ठेवुन आधी कोंढाणा स्वराज्यात आणण्याची जबाबदारी शिरावर घेवुन महालाबाहेर पडले तेव्हा श्री शिवाजीमहाराजांचे डोळे नक्कीच पाणावले असतील. क्षणभर त्यांना स्वतःच्याच भाग्याचा हेवा वाटला असेल. तो काळच तसा होता. कित्येक मराठा सरदार तेव्हा मुघलांच्या कच्छपी लागलेले. मुघलांनी फेकलेल्या वतनांच्या तुकड्यासाठी स्वत्व विकायला तयार असलेले. अशा काळात स्वतःच्या मुलाचे लग्न बाजुला ठेवुन स्वराज्याच्या कार्याला प्राधान्य देणारा सुभेदार तानाजी मालुसरेंसारखा निष्ठावंत सहकारी लाभणे ही भाग्याची परिसीमाच होती.

आपला शब्द सुभेदारांनी खरा केला. कोंढाणा जिंकून स्वराज्याला आणखी एक बलाढ्य दुर्ग मिळवून दिला. पण स्वराज्याचे दुर्दैव म्हणजे हा दुर्ग 'कोंढाणा' जिंकताना सुभेदार तानाजी मालुसरेंना आपले प्राण गमवावे लागले. मुलाचे लग्न तोंडावर आलेले आणि सुभेदार स्वराज्याच्या उत्कर्षासाठी त्या परम परमेश्वराकडे सामर्थ्य, आशीर्वाद मागायला निघून गेले. किल्लेदार उदेभानाशी लढत देताना सुभेदारांना आपले प्राण गमवावे लागले. धन्य त्या सुर्याजीरावांची.....! मोठे बंधू गतप्राण होवून रणांगणावर पडलेले असतानाही त्यांना आपल्या कर्तव्याची जाणीव होती. सुभेदारांच्या मृत्युनंतर गोंधळलेल्या, सैरावैरा झालेल्या मावळ्यांना उत्तेजीत करत त्या वीराने सुनावले.....!

"पळता काय भ्याडासारखे, गडाचे परतीचे दोर मी केव्हाच कापून टाकले आहेत. आता एकच ध्येय "कोंढाणा स्वराज्यात आलाच पाहीजे. सुभेदारांची बलिदान वाया जाता कामा नये." त्या ललकारीने मावळे पुन्हा पेटून उठले आणि मग इतिहास घडला. अवघ्या तिनशे मावळ्यांच्या साह्याने सुभेदारांनी कोंढाण्यासारखा बलाढ्य दुर्ग स्वराज्याच्या झोळीत टाकला. महाराजांना जेव्हा सुभेदारांच्या बलिदानाबाबत कळले तेव्हा दु:खावेगाने त्यांच्या तोंडुन शब्द निघून गेले...

"गड आला पण सिंह गेला............!" तेव्हापासुन कोंढाणा सिंहगड झाला. आपल्या निष्ठावंत सहकार्‍याच्या बलिदानाची अखंड स्मृती म्हणुन राजांनी कोंढाण्याचे 'सिंहगड' असे बारसे केले. नंतर सिंहगडावरून मोठ्या इतमामाने सुभेदारांचे पार्थिव पालखीतून कोकणातील त्यांच्या गावी "उमरठ" इथे नेण्यात आले. त्यांचे शव ज्या मार्गाने सिंहगडावरून उमरठला नेण्यात आले तो मार्ग म्हणजे मढेघाट !

मी म्हटले ना, मढेघाटाच्या सौंदर्याला एक हळवी पण तरीही पवित्र अशी किनार लाभलेली आहे ती अशी ! मध्ये मढेघाटातून जाताना सुभेदारांचे पार्थिव एका ठिकाणी विश्रांतीसाठी म्हणुन काही काळ ठेवण्यात आले होते. त्या जागी एक छोटीशी छत्री बांधण्यात आली.


आजकाल ही छत्री दुर्लक्षीत अवस्थेत आहे. गडगंज बिल्डर्सना अधिकाअधिक सुविधा प्राप्त करुन देणार्‍या आपल्या सरकारला या पवित्र वास्तुबद्दल काहीच देणेघेणे नाही हे आपले सगळ्यात मोठे दुर्दैव आहे. त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट म्हणजे मढेघाटात ट्रेकला जाणार्‍या ट्रेकर्सपैकी काही शिवभक्त आपापल्या परीने या छत्रीची काळजी घेत असतात. पण अन्यथा इतरवेळी हे पवित्र तिर्थस्थळ दुर्लक्षित अवस्थेतच असते. दुर्दैवाने महाराष्ट्रात आज हि शोकांतिका बहुतेक ९५% इतिहासकालीन स्थळांच्या बाबतीत अनुभवायला मिळते. आपण त्याचे ऋण इतक्या लवकर कसे काय विसरू शकतो?

सुभेदारांची समाधी
नाही म्हणायला सिंहगडावर आता सुभेदार तानाजी मालुसरेंची समाधी बांधण्यात आली आहे. पण मढेघाटातील त्यांचे शेवटचे विश्रांतीस्थळ मात्र दुर्लक्षीत अवस्थेतच आहे.



सुभेदारांचा पोवाडा ऐकण्यासाठी इथे टिचकी मारा.

सुभेदार तानाजी मालुसरेंच्या निष्ठेला, त्यांच्या बलिदानाला लाखो प्रंणाम. सरकार भलेही दुर्लक्ष करो पण सुभेदार तुमची बहादुरी, तुमची निष्ठा आणि तुमचे बलिदान मराठी माणुस कधीही विसरणार नाही. तुमच्या बलिदानाची गाथा आम्हाला कायम स्फ़ुर्ती देत राहील, आमच्या कर्तव्याची जाणिव करुन देत राहील.

जय भवानी, जय शिवराय....!

(छायाचित्रे : आंतरजालावरुन साभार)

विशाल कुलकर्णी

4 प्रतिसाद:

Suhas Diwakar Zele म्हणाले...

ओह्ह्ह... हे मला माहीत नव्हत विशालदा... :(
सरकारकडून अश्या गोष्टींची अपेक्षा करणे कधीच सोडून दिल आहे. निनादराव बेडेकर जेव्हा आमच्यासाही गप्पा मारत असताना म्हणाले होते की आम्ही सरकारला अशी विनंती केली होती की सगळे दुर्ग आणि ऐतेहासिक वास्तू परत जश्याच्या तश्या उभारायच्या, पण त्यांच्या ह्या विनंतीला केराची टोपलीच मिळाली...
राजे, माफ करा आम्हाला आम्ही तुमचा इतिहास जपण्याच्या लायकीचे नाहीत :(

विशाल विजय कुलकर्णी म्हणाले...

खरय मित्रा, आपण दिवसें दिवस नालायकच होत चाललो आहोत :(

Yogesh म्हणाले...

विशाल दा....हे माहित नव्हत....ह्या महत्वपुर्ण माहितीबद्दल खुप खुप धन्यवाद......अप्सरा फ़ेम सोनाली कुलकर्णी ला निवारा मिळाव म्हणून सरकार कष्ट घेत....ते किती तरी महत्वाच काम आहे..या अशा न्युन कामांना सरकारला वेळ नाही...

insearchoutdoors म्हणाले...

तानाजींच्या बलिदानानंतर महाराजांनी गडाचं नाव बदललं ही दंतकथा आहे. सिंहगड हे नाव या फार पूर्वीपासून प्रचलित आहे आणि कागदपत्रांमधे तसे उल्लेखही आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय पोस्ट