ओळखीचे रस्ते.....

शुक्रवार, २७ मे, २०११

कंटाळा आला की बाईक काढायची आणि कंटाळा येइपर्यंत भटकायचं हे आमचं ब्रीद असल्याकारणे आम्हाला मधूनच हुक्की येते. तशी आम्हाला कंटाळा यायला कुठलीही खास कारणे लागत नाहीत. कंटाळा आला म्हणुनही कंटाळा येवु शकतो आणि बाईकवरून उंडगायला जायचेय म्हणूनही कंटाळा येवु शकतो. अर्थात सौं. ना आमच्या या सवयी माहीत असल्यामुळे त्यांची मुक्ताफळे ऐकण्याचा प्रसंग वारंवार येतो. बरं या बायका पण विचित्र असतात. पावसाळ्यात तुम्ही कुठे निघालात की त्यांना लगेच तुमच्या बरोबर यायचे असते. खरेतर आम्हाला अशा वेळी एकट्यानेच बाहेर पडायची सुरसुरी आलेली असते, कारण सौभाग्यवती बरोबर असल्या की हजार बंधने येतात. जसे ४० च्या वर स्पीड गेला मागुन पाठीत कोपराने ढोसणे सुरू होते. दिसला धाबा बसलो हादडायला असे होत नाही. त्यांच्यासाठी एखादे हायजिनीक हॉटेल शोधावे लागते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे रस्त्यात मध्येच कुठेतरी दिसलेल्या गाडीवर तळली जाणारी गरमागरम भजी पोटाला तड लागेतो हाणता येत नाहीत. म्हणुन आम्ही कायम संधीच्या शोधात असतो. मॅडम माहेरी गेल्या (जर गेल्याच कधी) रे गेल्या की आमची सखी प्रिया आणि आम्ही निघालोच उंडगायला.

गेल्या पावसाळ्यातली गोष्ट. कुलकर्णीबाईंना आधीच एकदा खंडाळ्याच्या घाटातून फिरवून आणलेले होते. त्यानंतर खुशीने त्या पुण्याला आपल्या बहिणीकडे राहायला म्हणून गेल्या होत्या. चक्क चार दिवस ! तिसर्‍या दिवशी ठरल्याप्रमाणे मॅडमचा फोन आला. "उद्या ये रे न्यायला !"
(इतर ठिकाणी ती एकटी फिरते, तिच्या मैत्रीणींबरोबर ट्रेक्स वगैरे करते. पण माहेरी गेली असली की मात्र परत आणायला आम्ही जातीनं यावं अशी तिची इच्छा (पक्षी: ऑर्डर) असते. यावेळेस मी जरा कडक शब्दात सुनावले...

"येइन मी (तुझा काका पण जाइल, न जावुन सांगतो कुणाला) पण बाईकवर येइन, बसने येणार नाही. कारण ती परत येणार तो वार होता रवीवार आणि रवीवारी संध्याकाळी स्वारगेटहून मुंबईसाठी बस पकडणे म्हणजे मोठे दिव्य असते. सुदैवाने पावसाचे दिवस असल्यानुळे तीने मान्य केले. मी पटकन फोन बंद करून टाकला. न जाणो पुन्हा तिचा बेत बदलायचा आणि नको, बसनेच ये म्हणायची. तो दुसर्‍या दिवशी सकाळीच चालू केला.  :evil:

खरेतर मला भटकायला आवडतं आणि पावसात खास करून धबधबे, नद्या बघत बसण्यापेक्षा त्या पावसाने ओलेचिंब झालेले रस्ते न्याहाळणं, त्या रस्त्यावरून ८०-९० च्या वेगाने बाईक चालवणं हे खास आवडतं. त्यामुळे ठरवल्याप्रमाणे पहाटे पहाटे साडे आठ वाजता घर सोडलं. पण आज अजुनही आकाश कोरडंच होतं. पनवेलच्या थोडं पुढं आल्यावर एका धाब्यावर पोटोबाला नैवेद्य दाखवला. खिशातला रुमाल काढून डोक्याला बांधला आणि घोड्यावर टांग टाकली. मनात धाक धुक होती "पाऊस नाहीच आला तर.....?"



पण धाब्यावरून पुढे निघालो आणि हळू हळू पावसाने आपल्या गाण्याला सुरूवात केली. पाऊस जर फार मोठा नसेल ना तर त्या पावसाची एक वेगळीच गंमत असते. मातीला एक जीवघेणा , वेड लावणारा गंध सुटलेला असतो. वाईट अवस्था होते. गाडी चालवू? क्लच-अ‍ॅक्सेलरेटरकडे लक्ष देवु? की हेल्मेटच्या काचेवरून ओघळणारे पाणी टिपत बसू..... काही कळेनासे होते. अशा वेळी आजुबाजुने सुसाटत जाणार्‍या कार्सचा हेवा वाटतो, त्यांना काचेवर ओघळणारे पाणी पुसणारे वायपर्स असतात ना. पण पुढच्याच क्षणी एखादा थेंब कॉलरच्या मागून अलगद तुमच्या बनियनचे आवरण भेदून आतल्या उघड्या पाठीवर उतरतो आणि एक भन्नाट शहारा सगळ्या अंगावर उमटतो. मग लक्षात येतं.., "अरे हे सुख त्या कारमध्ये बसणार्‍यांच्या नशिबात कुठलं असायला?"  मग आपोआपच आपलाही वेग मंदावतो आणि आपण त्या रिमझिमत्या पावसाला उपभोगत ती धुंदी जगायला लागतो.

पनवेल ते पुणे हा रस्ता पावसाळ्याच्या दिवसात खरंच वेड लावण्याइतका देखणा असतो. इथुन तिथून चिंब भिजलेला रस्ता, रस्त्याच्या कडेने पावसाचे मोती अंगा-खांद्यावर मिरवत उभी असलेली हिरवीगार झाडे आपलं लक्ष वेधून घ्यायला लागतात.





रस्ते..., हे रस्ते मला खुप आवडतात. मुळात मुक्कामाच्या ठिकाणी पोचण्यापेक्षा तिथे पोचण्यासाठी बघावी लागणारी वाट ती मोठी मस्त असते. डेस्टिनेशनपर्यंत पोहोचेपर्यंत मधला जो काळ असतो ना तो खरा आनंद देणारा असतो. तिथे पोहोचण्यापेक्षा तिथे पोहोचण्यासाठी केलेले प्रयत्न जास्त आनंद देणारे असतात. ती असते एक धुंदी, एक कैफ ......! हा आनंद मला रस्ते देतात. मी बाईक चालवताना दर दहा मिनीटांनी मागे बघतो आणि मग लक्षात येते अरे आपण एकटेच नाही आहोत. हा रस्ता आहे ना आपल्या सोबतीला आणि तो शेवटपर्यंत असणारच आहे.



मग पुढे लांबपर्यंत पसरलेला रस्ता कापायला अजुन हुरूप येतो. अमित बोसच्या 'अभिलाषा' मधलं संजय खान आणि नंदावर चित्रीत झालेलं एक गाणं मला खुप आवडतं. रुसून चाललेल्या प्रेयसीला चिडवताना प्रियकर खोडकरपणे म्हणतो..
"वादीयां मेरा दाssमन, राssस्ते मेरी बाहे......., जावो मेरे सिवा तूम कहा जाओगे?"
कै. रफीसाहेब आणि लतादीदींनी गायलेलं हे मजरुहचं गीत आर.डी. ने असं काही सजवलय की पुछो मत !

सॉरी , थोडं विषयांतर झालं. पण रस्त्यांबद्दल बोलायला लागलो की असं भरकटायला होतं मला. आजुबाजुची हिरवाई अनुभवण्याच्या नादात कधी खोपोली क्रॉस केली कळालेच नाही. बाईक असल्याने एक्सप्रेस वे वर प्रवेष नव्हताच. तसेही बाईक असेल तर एक्सप्रेस वे च्या नादी लागुच नये माणसाने. जी मजा जुन्या हायवेवर येते ती ती एक्सप्रेस वे वर येत नाही. घाट चढता चढता सहज मागे लक्ष टाकले आणि.....

झाडांमधुनी नागमोडी
वाट जशी कुणी नार अटकर...
हे रान हिरवे लाजले
कोवळी जणु नववधु नवथर...



मागच्या उतारावर हिरव्यागार झाडांच्या दाटीतून पाठलाग करणार्‍या रस्त्याची नागमोडी वळणे असली खल्लास दिसत होती की क्षणभर मनात आले आपल्या कर्व्हसचा अभिमान बाळगणार्‍या एखाद्या रुपगर्वितेला इथे आणून उभी करावी आणि म्हणावे ,"आता बोल?"

खंडाळ्याचा घाट एरव्हीदेखील वेड लावतो. इथले नागमोडी रस्ते, डोंगराच्या कुशीत मधुनच गायब होणारी त्याची वळणे मनाला विलक्षण आनंद देत असतात. वाटतं हा प्रवास कधी संपूच नये. त्यातही ऋतु पावसाळ्याचा असेल तर....! मग नकळत तुमचा राजेश खन्ना होवून जातो....

जिंदगी एक सफर है सुहाना.., यहा कल क्या हों किसने जाना........



अर्थात राजेश खन्ना होताना आपली खरोखरच अंदाजमधल्या राजेश सारखी अवस्था होवू नये याची काळजी प्रत्येकाने आपली आपणच घ्यायची असते. निदान मी तरी घेतो. घाटात ६० च्या वर जायचा मोह मी महत्प्रयासाने टाळतो. क्षणभर त्या मादक कर्व्ह्ज कडे एक घायाळ नजर टाकून पुढे निघालो. घाट आता कुठे सुरू झाला होता. सगळीकडे हिरव्या रंगाचे साम्राज्य पसरलेले. जिकडे पाहाल तिकडे सृष्टीने हिरव्या रंगाची मनमुरादपणे उधळण केलेली होती. आता पावसाचा सडाका प्रचंड वाढला होता. त्यामुळे गाडी सरळ रस्त्याच्या कडेला लावली आणि पावसाचे उन्मुक्त नर्तन बघत तिथेच एका झाडाखाली बैठक घातली. पाऊस मनमुरादपणे बरसत होता. तिरक्या येणार्‍या पावसाने प्रचंड भिजवले तर होतेच. पण त्याच बरोबर झाडाच्या पागोळ्यावरून ओघळणारे पाणी एक वेगळाच अनुभव देत होते. थोडा वेळ थांबून पुढे निघालो. जायच्या आधी पुन्हा एकदा खाली घाटात दिसणार्‍या रस्त्याला हॅलो करायला विसरलो नाही.



इथून थोड्या वेळातच घाट संपणार. कारण अमृतांजन पॉईंट जवळाच आलेला होता. खरेतर इथुन निघायची इच्छाच होत नव्हती पण जाणे मस्ट होते. (नाहीतर सौभाग्यवतींची मुक्ताफळे ऐकावी लागली असती फुकट). नाईलाजानेच गाडीला कीक मारली आणि निघालो. अमृतांजन पॉईंट क्रॉस केला आणि बोगद्याकडे नजर टाकताना सहज वर ल़क्ष गेले. आणि मनात विचार आला यावेळी राजमाची पॉईंटवरुन हा रस्ता कसा दिसत असेल? यावेळेस मात्र मोह आवरला नाही आणि लोनावळा बायपासवरून गाडी आत घेतली व फिरून पुन्हा राजमाची पॉईंट गाठला. तिथून खालचा रस्ता, अमृतांजन पॉईंट सगळंच कसं झ्याक दिसत होतं.



हा जुना रस्ता पुढे खाली उतरून एका ठिकाणी मेन हाय वेला परत जोडला जातो. ते दृष्यही खुपच सुंदर होते.

इथे ओलावला वसंत
पालवी गाते हिरवाई निरंतर
सभोवार सौंदर्य फाकले
क्षणात मिटले स्वर्गाचे अंतर



इथे अर्धातास थांबलो आणि मग पुढे पुण्याच्या मार्गाने निघालो. आत्तापर्यंत रमत गमत आल्याने ११.३० वाजुन गेले होते. म्हणलं 'कुलकर्णी, आता टंगळ-मंगळ' बंद करा, नाहीतर फुलं पडतील. गपचुप कॅमेरा सॅकमध्ये टाकला आणि सुसाट पुण्याकडे निघालो.

पुण्यात आल्यावर शिवाजी नगरच्या इंजीनीअरींग कॉलेजच्या टर्नला एका टपरीवर चहा प्यायला म्हणून थांबलो. तिथेच रस्त्याच्या कडेला असलेल्या एका पुरातन वटवृक्षाखाली बाईक पार्क केली आणि चहाच्या टपरीसमोर असलेल्या बाकड्यावर ठाण मांडले.



वरून रिमझिम पाऊस पडतो आहे. हातातल्या ग्लासातील गरमागरम कडक चहामध्ये मधूनच पावसाचा एखादा चुकार थेंब टपकन उडी मारतो....! शेजारी बाकड्यावर ठेवलेल्या कागदी डिशमधली भजी पावसाने भिजायच्या आत पटापट पोटात टाकत वर ग्लासमधला चहादेखील संपवायचा ही कसरत केलीय कधी? पावसाळा सुरू होतोय....

इच्छा असेल तर सांगा !

विशाल.


उन्हाळी वर्षाविहार : उल्हास व्हॅली / कॅनियॉन व्हॅली ट्रेक

बुधवार, १८ मे, २०११

सर्वप्रथम मनःपूर्वक आभार : एक उत्साही मायबोलीकर यो रॉक्स उर्फ योगेश कानडे, ज्याने या ट्रेकचा वृत्तांत माबोवर टाकला आहे. मी त्याच्या अनुमतीने त्या वृत्तांतातील काही वाक्ये जशीच्या तशी उचलून इथे टाकली आहेत, लिहीण्याचा कंटाळा दुसरे काय ;-) त्या 'यो'चे आणि अर्थातच सुनील गावडे उर्फ सुन्या ज्याच्या मदतीशिवाय हा ट्रेक शक्यच झाला नसता अगदी मन:पूर्वक आभार ! 
(कृपया मुळ साईझमधले प्रकाशचित्र पाहण्यासाठी त्यावर एक टिचकी मारा :) )

एप्रिल उजाडला नि सुर्य अधिक प्रसन्नतेने तळपु लागला.. घामाच्या धारा वाहु लागल्या.. अशा गरमीचा वैताग कोणाला नाही येणार.. नि अशा नकोश्या उकाड्यात जर कोणी विचारले "चल ट्रेकला येतोस का ? " तर नक्कीच नकारार्थी उत्तर मिळेल.. त्यातच 'अरे चल ना, मस्त धबधब्याखाली डुंबून येवु ' म्हटले तर वेड्यातच काढतील.. कोण्या पाणीटंचाईग्रस्त नवी मुंबईकराला विचारले तर तो आपल्याकडच्या बादल्या पाठवुन देईल.. पण ह्या उकाड्यात अशी एक जागा आहे जिथे तुम्हाला नक्कीच गारवा मिळतो.. धबधब्याच्या पाण्यात भिजण्याचा आनंद मनमुराद लुटता येतो.. त्या जागेचे नाव.. उल्हास व्हॅली ! ज्यालाच कॅनियॉन व्हॅली असेही म्हणतात....!

या जागेची माहिती द्यायची म्हटली तर ह्या व्हॅलीचे वास्तव्य लोणावळा-खंडाळा घाटात उल्हास नदीच्या सान्निध्यात वसलेले आहे.. ज्याची लांबी म्हणाल तर लोणावळ्यापासुन कर्जत डोंगररांगेपर्यंत विस्तारीत आहे.. ह्यालाच टायगर व्हॅली असेही संबोधतात (का ते माहीत नाही).. एकमेकांना समांतर अशा दोन पहाडांच्या भिंतीमध्ये खोल नि अरुंद असणारी नि नागमोडी वळणाचा आकार घेत डोंगररांगातुन जाणारी दरी म्हणुनच हिला कॅनियॉन व्हॅली असे म्हणतात.. या व्हॅलीचे मुख्य आकर्षण म्हणजे इथे असलेले दोन धबधबे.. तसे पाण्याचे छोटेखानी झरे नि धबधबे वाटेत बरेच लागतात पण हेच दोन धबधबे प्रमुख आहेत.. त्यातील एका धबधबा केवळ वरुन(दरीच्या टोकावरुन) न्याहाळता येतो.. तिथे जाणे अशक्य.. तर दुसरा धबधबा आमच्यासारख्या हौशी मंडळींसाठी खुला आहे..

आम्ही सात मायबोलीकर सम्या रानडे, झकासराव, राज्या, विन्या भिडे, सुन्या, अस्मादिक आणि दस्तुरखुद्द श्री श्री यो रॉक्स या वेळी गनीम धूळीस मिळवायचाच या आवेशाने व्हॅलीवर चालून गेलो. प्रत्यक्षात तो देखणा, रौद्र निसर्गपुरूष पाहिल्यावर एका क्षणात गारद, नतमस्तक होवून गेलो ही बाब अलाहिदा.


साधी सरळ वाट, बरोबर झुळ झुळ वाहणार्‍या पाण्याची सोबत.. सुदैवाने व्हॅलीत सुर्यदेवाची कृपा असल्याने उन्हे पोहचत नव्हती. त्यामुळे सुखैनैव प्रवास चालू होता. वाट तर एवढी सोपी होती...एवढी सोपी होती.... की झक्यासुद्धा खुश झाला. >:)


हा ट्रेक म्हणावा तसा सोप्पा ! पण सवय नसेल तर अवघडच ! नि उकाड्यात चढ्-उतार पार करायचे म्हणजे कसरतच ! इथे जाण्याचा मार्ग नेहमीच्या ट्रेकच्या अगदी उलटे ! कारण दरी म्हटले तर पहिले उतरावे लागणार होते नि ट्रेकचा शेवट चढण पार करुन होणार होता.. एका पहाडावरुन उतरायचे नि दुसर्‍या पहाडावरुन चढायचे.. वाट अर्थातच खडकाळ ! त्यामुळे उड्या मारत मार्गक्रमण करणे भाग होते..

आपले पुर्वज माकड होते याचा आनंद वाटावा अशीच आणि इतकी सोपी वाट होती अगदी ~X(


खडकाळ वाट पार करत असतानाच काही अंतराने एक अंदाजे १० फुटाचा पॅच लागला.. तो पाहिला नि झक्या दचकला नाही तर नवलच ! त्याच्यासोबत सम्यालाही प्रश्न्न पडला 'इकडुन एकवेळ उतरु पण चढणार कसे ?' पण आपली परतीची वाट वेगळी असल्याचे सुन्याने सांगितले नि त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.. पण परतीची वाट काय आहे ते वर चढतानाच कळणार होते ! इकडुनच मग एकेक करुन खाली उतरलो....! धन्स टू सुन्या आणि योग्या... त्यांच्यासारखे पट्टीचे ट्रेकर्स बरोबर होते म्हणून ठिक नाहीतर आमची हालतच होती...

मी आणि विन्या जीव मुठीत धरून उतरताना ...


आमच्या मागे मात्र सगळे मग एकमेकाचा आधार घेत, देत साखळी करूनच उतरले.



हा रॉकपॅच कसाबसा पार केला तर पुढे दुसरा वाटच बघत होता. सम्या आपले कौशल्य आजमावताना...


शेवटी धडपडत उड्या मारत कसेबसे मध्यावर येवून पोचलो. इथे पोचल्यावर सुन्याने सम्याची फिरकी घेतली. इथुन सरळ खाली उतरायचे आहे असे सांगितल्यावर राज्याने लगेचच मी ढिस्स म्हणून जाहीर केले तर सम्याने बस्स झाला ट्रेक आता खायचे सामान काढा अशी फरमाईश केली. आम्ही उगाचच जातीवंत ट्रेकर्सच्या आवेशात तिथे फोटोही काढून घेतले, जणुकाही तिथुनच चढून वर आलो होतो. ;-)


तिथुन पुढे अजुन साधारण अर्धा तास उड्या मारत चालल्यावर शेवटी एकदाचे मुळ धबधब्यापाशी पोचलो.... जे काही समोर उभं होतं तो सौंदर्याचा उत्तुंग आविष्कार होता. नेहमी डेस्टीनेशनला पोहोचलो की आनंदाने आरोळ्या मारल्या जातात. पण आज सगळेच नि:शब्द झालो होतो. तोंडातून शब्दच फुटत नव्हते. ती देखणेपणाची परिसीमा होती, भान हरपले होते. थोड्या वेळाने भानावर आलो आणि कॅमेरा सरसावला.


बरेच फोटो काढून झाल्यावर मग अर्थातच जलविहार...
च्यायला जलविहार कसला... पाण्यात उच्छाद मांडला आम्ही !


त्यानंतर अर्थातच खादाडी.. :D


त्यानंतर काही ग्रुप फोटो काढून मग परतीची वाट धरली.



परतीची वाट धरण्यापुर्वी सम्याने आणलेल्या पुरणपोळ्यांवर ताव मारला. मायबोली कॅलेंडरसाठी एक स्पेशल फोटो शुट केले (ते फोटो सेन्सॉर्ड असल्याने इथे टाकलेले नाहीत. रिक्वेस्ट आल्यास मेलने पाठवले जातील ;-) )

परतीची वाटपण सोपी नव्हती, त्यात आत पोट भरलेले असल्याने अजुनच अंगावर येत होती. त्यात दोन तीन जरा अवघड वाटणारे (आम्हाला) रॉक पॅचेस होते. पण एकमेकांच्या मदतीने ते पार केले आणि शेवटी एका ठिकाणी थोडावेळ विश्रांती घेतली.


थोडा वेळ विश्रांती घेवून पुन्हा वर चढायला सुरूवात केली. उतरताना लोणावळ्याकडून उतरलो होतो, आता पुन्हा वर चढताना मात्र खंडाळ्यात पोहोचलो. वर पोहोचल्यावर एक नजर खालच्या वाटेकडे टाकली..दुरवर पसरलेली उल्हास व्हॅली दिसत होती. पुन्हा एकदा कॅमेरा सरसावला.



शेवटी नेहमीप्रमाणे एक स्टायलीश फोटो काढलाच. नेहमी उडी मारुन फोटो घेण्याचा कार्यक्रम असतो म्हणे ट्रेकर्सचा, पण यावेळी माझ्या अंगात तरी ताकदच नव्हती त्यामुळे शांतपणे एका दगडावर बसुन फोटो काढून घेतला. आणि पुढच्या ट्रेकची आखणी लवकरच करायची असे ठरवून पाखरे आपापल्या घराकडे परत निघाली.


(मीमराठी.नेट वर पुर्वप्रकाशित)
{ टिचक्या मारून दमलात का? जावू द्या, होतं असं कधी कधी... :) }

विशाल कुलकर्णी

समाप्त.

नाथांचा नाथ जगन्नाथ !!

मंगळवार, १७ मे, २०११


मागच्या वेळी जेव्हा जगन्नाथ पुरीला गेलो होतो तेव्हा दर्शन घेवून परतताना मनात एक खंत राहून गेली होती की पुरी च्या भव्य जगन्नाथ मंदीराची छायाचित्रे घेता आली नव्हती. तिथे कॅमेरा घेवून जाण्याची वा छायाचित्रे घेण्याची परवानगी नाहीये. कालच्या जानेवारी महिन्यात एका कॉन्फरन्सच्या निमीत्ताने हैदराबादला जाण्याचा योग आला. तेव्हा तेथील बंजारा हिल्सवर असलेले देखणे जगन्नाथ मंदीर पाहण्यात आले. अगदी हुबेहुब जगन्नाथ पुरीच्या मंदीराप्रमाणे नसले तरी जवळ जवळ त्याची प्रतिकृतीच असलेले हे देखणे मंदीर कॅमेर्‍यात कोंबण्याचा मोह आवरला नाही. अर्थात ज्याची भव्यता डोळ्यात मावत नाही ती कॅमेर्‍याच्या लेन्समध्ये काय मावणार म्हणा? 

बाहेरून दिसणारे जगन्नाथ मंदीराचे प्रथम दर्शन
 मंदीराचे देखणे प्रवेशद्वार
 
 प्रवेशद्वारातून आत शिरल्या शिरल्या समोर दिसणारी जगन्नाथ मंदीराची कोरीव नक्षीकाम केलेली बाजु . ती भव्य वास्तू कॅमेर्‍याच्या लेन्समध्ये बसवण्याचा तोकडा प्रयास 
(सोबत तिथले सद्ध्याचे केअर टेकर श्री. मोहोपात्रा )
 मंदीराच्या पायाच्या भिंतीवर कोरलेल्या यक्ष्-किन्नरींची रेखीव शिल्पे लक्ष वेधल्याशिवाय राहात नाहीत.


दर्शन  घेवून बाहेर आलो. गाभार्‍यात आत फोटो काढायचे मी शक्यतो टाळतो. का कोण जाणे पण मला ते मंदीराच्या पावित्र्यावर घाला घातल्यासारखे वाटते. पण बाहेर आल्यावर मात्र समोर दिसणार्‍या भव्य कळसाचे फोटो टिपण्यापासून मी स्वतःला रोखु शकलो नाही.

 भिंतीवरील नक्षीकाम : कालियामर्दन करणारा कन्हैय्या आणि देवाधिदेव इंद्र
 मंदीराच्या परिसरात असलेले अजुन एक छोटेसे मंदीर
  एका कळसावरीला देवी शारदेची ही सुंदर मुर्ती
 जगन्नाथ पुरीचे मंदीर तसेच कोनार्कचे सुर्यमंदीर उभे करणार्‍या गंग साम्राज्याचे एक चिन्ह
 मुख्य मंदीराचा गाभार्‍याचा कळस

  भिंतीवरील सुबक कलाकृती
 जाता जाता शेवटी पुन्हा एकदा ओडीसी शिल्पकलेचे देखणे प्रतिक आणि वैषिष्ठ्य असलेला मंदीराचा कळस
 काळाचे प्रतिक मानले गेलेले कोनार्कचे रथचक्र
मी जगन्नाथ पुरीच्या मंदीरालादेखील भेट दिलेली आहे. पण जेवढी शांतता, जेवढी मनःशांती मला इथे मिळाली तेवढी तिथे नव्हती मिळु शकली. कदाचित जगन्नाथ पुरीच्या मंदीराचे आज घडीचे बाजारीकरण त्याचे कारण असु शकेल. पण हैद्राबादमधील या मंदीराने मात्र मला खरोखर जगन्नाथाच्या दर्शनाचा आनंद मिळवून दिला.

विशाल कुलकर्णी.

हिरवाई

बुधवार, ४ मे, २०११

प्रचि १ : भर पावसाळ्यात टिपलेली हिरवीगार उल्हास व्हॅली (हिला कॅनिओन व्हॅली असेही म्हणतात)
 प्रचि २ : आणि उल्हास व्हॅलीतला हा रौद्रपुरूष


 विशाल कुलकर्णी


उल्लेखनीय ब्लॉग्स...

Kay Vatel te!sahajachBhunga- the social insect!Mazi Sahyabhramanti!Maratha Histoy Calendar!
Man Udhan Varyache!मोगरा फुललाNetbhet.comsaurabh