एक अविस्मरणीय विकांत : सगुणाबाग अर्थात निसर्ग निकेतन नेरळ

गुरुवार, ५ ऑगस्ट, २०१०

२ मेच्या सकाळी मुंबईला सिद्धेश्वर एक्सप्रेसमधुन उतरलो आणि तिथेच बायकोने पहिला प्रश्न विचारला...
"विशु आज शनिवार, उद्या रविवार... दोन दिवस सुटी, सोमवारपासुन पुन्हा आपलं रुटीन चालु. दोन दिवस घरीच आराम करायचा? की ..........."
खरेतर हे शेवटचे दोन दिवस दिवे आगारला जायचं असं ठरलं होतं पण ऐन वेळी एकाही हॉटेलमध्ये बुकिंग न मिळाल्याने आम्ही तो बेत कॅन्सल केला होता. त्यामुळेच हे दोन दिवस काय करायचं हा मोठाच प्रश्न होता. दहा पंधरा दिवस लग्नाच्या धामधूमीत प्रचंड थकवा आलेला, आता दोन दिवस पुर्ण विश्रांतीची गरज होती....
पण घरी ...............
घरी विश्रांती मिळणं अशक्यच होतं निदान सायाला तरी, पुन्हा साफसफाई, स्वयंपाक यात गुरफटणं आलं. तिला म्हणालो आधी घरी तरी जावू गेल्यावर बघू नेटवर अजुन काही जवळची ठिकाणं मिळताहेत का ते बघु आणि ठरवु! घरी येवुन स्नान केले आणि लॅपटॉप उघडला........ जवळची ठिकाणं शोधताना करताना एक नवीन नाव आढळलं........
"सगुणाबाग : निसर्ग निकेतन"

लगेच त्यांच्या वेबसाईटवर गेलो www.sagunabaug.com
आणि लगेच निर्णय घेतला. त्यांना फोन केला आणि सुदैवाने बुकिंग मिळालं.
कर्जतला जाताना नेरळला उतरलो कि तिथुन साधारण ५ किमी अंतरावर श्री. शेखर भडसावळे या निसर्गवेड्याने आपल्या शेतीचं रुपांतर एका जगावेगळ्या इकोफ्रेंडली रिसोर्टमध्ये केलं आहे.
रिसोर्ट कसलं गावाकडची शेतीच. पण ट्रेनने जात बसलो असतो तर वेळ गेला असता खुप म्हणुन ठरवलं की बाईकवर जायचं, बाय रोड. खारघरपासुन दोन तासाचा रस्ता आहे बाय रोड. बाईकवरुन जायचं म्हणलं आणि कुलकर्णीबाईंनी तोंड वाकडं केलं खरं पण वेळेचा फॅक्टर नीट समजावल्यानंतर ती तयार झाली.
मुंबईवरुन बाय रोड सगुणाबागला जाण्याचा मार्ग .....
Mumbai-sion --> Vashi Bridge(Thane --> Airoli bridge) --> Konkan Bhavan --> kalamboli --> Take Express way --> Exit at shedung/khopoli(within 10 mins) --> किंवा Old highway --> Towards khopoli --> about 10 mins(aprox 12 KM) --> Karjat Phata --> Turn left(8 KM to Karjat) --> Left turn(14 KM)to neral --> Enter Neral --> right turn at Ambika Naka-Railway crossing-Kalamb road --> (4 KM)-Pass small bridge then big bridge --> (Aprox 200 Meters after big bridge)-Sign board to the left- Saguna Baug/Malegoan --> Turn left --> (aprox 1 KM)Nisarg Niketan(Saguna Baug).
शनिवारी दुपारी २ वाजता घर सोडले आणि डेस्टिनेशन सगुणाबाग. पनवेलनंतर साधारण १४ किमी वर कर्जत फाटा लागतो (जुना हायवे : बाईक असल्याने एक्सप्रेस वे वर प्रवेश नव्हता) तिथुन कर्जतला जायला आत वळलो आणि वळताना शिवशंभोचे भव्य दर्शन झाले.
Saguna_Baug_01001.jpg
प्रभुंचे दर्शन घेवून पुढे निघालो तर वळणावर आग्र्याचा किल्ला दिसला, त्याच्या मागे बोरीबंदरचे रेल्वे स्टेशन......... किल्ल्यावर पाटी मात्र सेंट्रल जेलची. हे काय गौडबंगाल आहे म्हणुन त्या गेटपाशी गाडी थांबवली तर तो नितीन देसाईचा स्टुडीयो निघाला. गेटवर आणखी एक पाटी होती.
NOT FOR VISITORS, ONLY FOR SHUTTING PURPOSE.

त्याच्या नावाने बोटे मोडत तसेच पुढे निघालो. तिथुन एक ८ किमी वर कर्जत आहे. चार फाटा म्हणुन विख्यात (?) असलेल्या कर्जतच्या चौकातुन पुन्हा एक डावे वळण घेतले आणि नेरळकडे निघालो. इथुन आता सह्याद्रीचे जवळुन दर्शन होण्यास सुरुवात झाली. इथे पुन्हा शिवशंभोचे दर्शन झाले मंदीरासमोरच असलेली निसर्गाची करामत पाहुन पुढे निघालो. इथे पिंपळ आणि एक नारळाचे झाड यांचे बुंधे इतके एकजीव झाले आहेत की जणु एकाच बुंध्यातून दोन वेगवेगळी झाडे उगवली असावीत.
Saguna_Baug_01092.jpg Saguna_Baug_01091.jpg
मध्येच एका ठिकाणी गरमागरम भजी हाणली, मस्त गार गार ताक प्यालो आणि साधारण ३० मिनीटांनी नेरळला पोहोचलो. (कर्जतपासुन १४ किमी) नेरळमध्ये शिरताना एका ठिकाणी रोडला दोन फाटे फुटतात. एक रोड माथेरानला जातो आणि दुसरा नेरळकडे. तिथेच ठरवलं, उद्या जर सगुणाबागेतुन लवकर निघणं जमलं तर एक चक्कर माथेरानला टाकायची. अवघं दहा किमी आहे माथेरान इथुन.
असो, सगुणाबागेत पोचलो. मला जी जागा मिळाली होती ती अजुन आधीच्या कुटुंबाने सोडली नव्हती, म्हणुन तिथेच त्यांच्या ऑफीसपाशीच थांबलो थोडावेळ. खरेतर शेखरकाकांचे घरच आहे ते पण त्याचाच वापर ऑफीस कम रिसेप्शन असाही केला जातो.
तिथे मस्तपैकी घरच्या दुधाचा चहा मिळाला. शेखरकाकांनी स्वतःची मोठी गोशाळा उभी केली आहे इथे. थोड्याच वेळात त्यांचा एक तिथे काम करणारा मुलगा जागा रिकामी झाल्याचे सांगत आला. आणि आम्ही तिकडे निघालो. जाता जाता त्या मुलाने सगुणाबागेची माहीती दिली. इथे येणार्‍याला शक्यतो पुर्णपणे निसर्गाचा सहवास मिळावा अशी व्यवस्था केलेली आहे. इथे तुम्हाला टि.व्ही. सारख्या गोष्टी दिसणार नाहीत. विजेचा वापरही अगदी आवश्यक तिथेच केलेला असल्याने खर्‍या अर्थाने गावात, शेतात आल्याचा अनुभव येतो. इथे शेखरकाकांनी पाण्याची कृत्रीम तळी बांधुन त्यात मत्स्यशेतीचा उपक्रम राबवलेला आहे.
त्यापैकीच एका तळ्यात एक छोटेसे पाँड हाऊस बांधलेले आहे, पाहुण्यांना राहण्यासाठी.
आश्चर्य वाटलं ना, पण मी योग्य तोच शब्द वापरलाय. आपण इथे शेखरकाकांचे पाहुणेच असतो. इथल्या कुठल्याही कर्मचार्‍याच्या वागण्यात तुम्ही त्यांचे कस्टमर असल्याचा भाव व्यक्त होत नाही. तुम्ही त्यांचे पाहुणेच असता. या पॉन्डस मधुनच तुम्हाला बोटिंग तसेच फिशिंगही करता येते. सर्व साधने पुरवली जातात आणि तेही कुठलाही अतिरिक्त चार्ज न लावता. असो आम्ही सगुणाबागेच्या अंतरंगात शिरलो आणि जणु काही स्वर्गात आल्याचा भास झाला.
Saguna_Baug_01109.jpg
Saguna_Baug_01111.jpg
थोडे पुढे आलो आणि त्या मुलाने, अमरने सांगितले... दादा, ते तुमचं पाँडहाऊस. त्याच्या बोटाच्या दिशेने पाहीले आणि आनंदाने वेडे व्हायचेच बाकी राहीलो आम्ही दोघेही.....
Saguna_Baug_01007.jpg
वळणावरुन वळुन पाँडहाऊसच्या दारापाशी आलो तर इथे शाळा भरलेली होती. काळे पांढरे कपडे कपडे घातलेले विद्यार्थी वेगवेगळ्या कसरती करत होते. मला तर सगळे विद्यार्थी अगदीच बेशिस्त वाटले.
Saguna_Baug_01038.jpg
Saguna_Baug_01044.jpg
Saguna_Baug_01041.jpg
Saguna_Baug_01046.jpg
Saguna_Baug_01045.jpg
Saguna_Baug_01049.jpg
पंतोजी त्यांच्या मधुन त्यांच्यावर नजर ठेवत फिरत होते.
Saguna_Baug_01086.jpg
आमची चाहूल लागली आणि चक्क शाळा सुटल्यासारखे सगळे पळुनच गेले.
Saguna_Baug_01095.jpg
आम्ही आमच्या घरापाशी आलो होतो, आमच्या घरापाशी .....
Saguna_Baug_01166.jpg
आमचं हे दिड दिवसाचं घर मात्र खरोखर सुरेखच होतं. इथे भिंतीवर मधुबाला किंवा गेलाबाजार ऐश्वर्याचेदेखील फोटो नव्हते. इथे होती अतिशय सुरेख वारली पद्धतीची चित्रे ....
Saguna_Baug_01028.jpg
Saguna_Baug_01029.jpg
Saguna_Baug_01167.jpg
संध्याकाळ झाली होती. व्यवस्थित ताजेतवाने होवुन बाहेर पडेपर्यंत भास्कररावांनी एक्झीट घेतली होती, सगळ्या आसमंतात एक सुरेख लालीमा पसरायला लागला होता. मोकळं रानच असल्याने दिवसभर चारा गोळा करुन घराकडे परतणार्‍या पक्ष्यांची सुरेल किलबिल वेडावुन टाकत होती. जेवायला अजुन वेळ होता म्हणुन आम्ही सगुणाबागेचा फेरफटका मारायला थोडे बाहेर पडलो. दिवस मावळतीकडे झुकला होता.
Saguna_Baug_01100.jpg
Saguna_Baug_01101.jpg
Saguna_Baug_01145.jpg
Saguna_Baug_01150.jpg
रात्री ९ - ९.३० च्या दरम्यान छान जेवण झाले. दरम्यान मी एक नवीन पराक्रम केला. चक्क गळ टाकुन एक मासा पकडला. इथे शेखरकाकांनी इझरायलच्या तिलापी माशाचं बीज वाढवलं आहे.
(बायकोने डोळे वटारल्यावर नंतर सोडुनही दिला)
Saguna_Baug_01078.jpg
जेवण करुन मस्त ताणुन दिली.
पहाटे पाच - साडे पाचच्या दरम्यान सायलीने उठवले.
"विशु, चल सुर्योदय पाहू !"
तसाच आळसावलेल्या अवस्थेत फिरायला बाहेर पडलो. मोकळी शुद्ध हवा, हवेत किंचीत गारवा. अजुन तसा थोडा अंधारच होता. पण छान वाटत होते फिरताना. त्याच क्षणी ठरवले दर दोन -तीन महिन्यातुन एकदा का होईना इथे यायचेच. मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात आपण निसर्गाच्या सान्निध्याला किती मुकतो आणि काय गमावतो ते आत्ता कळत होते. कुठल्यातरी एका बेसावध क्षणी अलगद भास्कररावांनी हजेरी लावली. आपल्या जवळ डिजीकॅम असल्याचा कधी नव्हे तो प्रचंड आनंद होत होता. किती पाहिजे तेवढे फोटो घ्या.
Saguna_Baug_01148.jpg
Saguna_Baug_01114.jpg
Saguna_Baug_01115.jpg
Saguna_Baug_01116.jpg
थोडेसे उजाडल्यानंतर परत घरी येवुन स्नान वगैरे केले आणि न्याहारी करुन परत राउंड मारायला बाहेर पडलो. न्याहारीला गरम गरम उपमा, चक्क मिसळ आणि उकडलेली मक्याची कणसं असा बेत होता.
आता सगुणाबाग खासच दिसत होती. विशेष म्हणजे पायाखालच्या रस्त्यावर कुठेही जा फक्त वाळलेल्या पाला पाचोळ्याचाच कचरा होता. कुठेही इथे तिथे फेकलेले कागद नाहीत की इतर कसला कचरा नाही.
आजुबाजुच्या शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारची लागवड केलेली होती. इथे शेखरकाकांनी जगभरातुन वेगवेगळी झाडे आणुन लावलेली आहेत आणि प्रत्येक झाडावर त्यांच्या नावाचा टॅग आहे. त्यांच्या कर्मचार्‍यांनी सर्व फार्म फिरून दाखवला. लहान मुलांसाठीही खेळण्याची वेगवेगळी साधने होती.
Saguna_Baug_01016.jpg
Saguna_Baug_01082.jpg
Saguna_Baug_01110.jpg
इथे राहण्यासाठी पाँड हाऊस व्यतिरिक्त थोड्या कमी दरात आणखीही काही कॉटेजेस आहेत.
Saguna_Baug_01127.jpg
Saguna_Baug_01130.jpg
सगळीकडे सुरेख फुलांचे ताटवे मन मोहुन टाकायला तयारच असतात....
Saguna_Baug_01123.jpg
Saguna_Baug_01106.jpg
इथुन पुढे मग शेताच्या मागील बाजुने वाहात असलेल्या उल्हास नदीकडे मोर्चा वळवला. या नदीचे वैशिष्ठ्य म्हणजे या नदीला बारमाही पाणी असते. शेखरकाकांनी छान घाट बांधुन घेतलाय इथे पाहुण्यांसाठी, त्यांच्या जलक्रिडेसाठी. साया तिथे रेंगाळली नसती तरच नवल...
Saguna_Baug_01068.jpg
शेवटी १२ वाजता जेवण करुन परत निघालो. खरेतर परत फिरायची इच्छाच होत नव्हती पण शक्य झाल्यास माथेरानला भेट द्यायची असे ठरवले होते म्हणुन मन घट्ट करुन बाहेर पडलो.
Saguna_Baug_01043.jpg
या विकांताच्या अविस्मरणीय आठवणीत मोलाचा वाटा असणारी माझी सखी (माझी बायको, सायली तिला सवत म्हणते !)
Saguna_Baug_01157.jpg
पुन्हा यायचे हे मनात अगदी पक्के ठरवून दोघेही माथेरानच्या रस्त्याला लागलो. आता दहा किमी चा बेलाग घाट चढायचा होता बाईकवरुन........
Matheran_01.jpg
मग दोस्तहो कधी जायचं सगुणाबागेत. इथे गृपने गेल्यास डॉर्मेटरीचीही सोय आहे बरं का! अगदी एका दिवसाची सहल सुद्धा काढता येते.
माथेरानच्या या सहलीचा वृत्तांत आता पुढील लेखात. तोपर्यंत इथेच थांबतो ............

विशाल.

2 प्रतिसाद:

Unknown म्हणाले...

मस्त रे विशालभौ...दॅटस दि स्पिरीट...शेखरकाकांचेही आणि तुमचेही

विशाल विजय कुलकर्णी म्हणाले...

धन्यवाद यशवंतजी :)

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय पोस्ट