विठ्ठल आवडी प्रेमभावो......

गुरुवार, १७ फेब्रुवारी, २०११

काही महिन्यापुर्वी सहज वाईला जायचा योग आला. खरेतर आमचा वाईला जायचा अजिबात मानस नव्हता. आम्ही मजा करायला महाबळेश्वरला गेलो होतो. दोन दिवस तिथे मस्त एंजॉय केले आणि तिसर्‍या दिवशी संध्याकाळच्या वेळी सातार्‍याला जाणारी एस.टी. पकडली. महाबळेश्वरला जाताना त्या धुंदीत मध्येच लागलेले वाई लक्षातच आले नव्हते. पण येताना गाडी वाईला थांबली आणि सौ. ने विचारले उतरायचे का? इथले श्री गणेशाचे दैवत जागृत आहे म्हणतात.

तसे बाप्पाकडे मागायचे काहीच नव्हते. न मागताच त्याने भरभरुन दिलेय, पण योगायोगाने डोक्यात आलेच आहे तर दर्शन घेवुन जावु या उद्देशाने उतरलो वाईला. तिर्थक्षेत्र म्हणले की मला तिथल्या रिक्षावाल्यांची जाम भीती वाटते. कायच्या काय दर सांगतात....! आणि वाई तर दक्षीण काशी म्हणून ओळखले जाते. त्यात तिथल्या बाप्पांनी आपल्या नावाचा डंका त्रिलोकात वाजवलेला. म्हणलं आता हा रिक्षावाला सांगणार १००-१५० रुपये. पहिला धक्का बसला तो म्हणजे तो मिटरने जायला तयार झाला आणि कळस म्हणजे मंदिरापर्यंत रिक्षाचे भाडे फक्त १४ रुपये. मी अवाक ! बाप्पा तू खरोखरच आहेस रे बाबा इथे ....

असो. पाल्हाळ पुरे. वाईचा श्री गजानन जागृत आहे, नवसाला पावतो म्हणुन कुलकर्णी बाईंना त्याचे दर्शन घ्यायचे होते. तिने नक्कीच त्याच्याकडे मागितले असेल...

"पुढचा जन्म असेल तर त्यात हा असला तिरसट नवरा नको रे बाबा !"

वाईच्या श्री गजाननाबद्दल किंवा वाईच्या एकंदर धार्मिक, भौगोलिक माहात्म्याबद्दल मी बोलणार नाहीये. कारण वाई मंदिरांचे गाव म्हणुन ओळखले जाते. मला आता नावेही आठवत नाहीत एवढी मंदिरे आहेत तिथे. तर त्या सर्व गोष्टी टाळुन या पोस्टच्या मुख्य उद्देश्याकडे वळुया.

तर कृष्णेकाठच्या श्री गजाननाचे दर्शन घेतल्यावर साहजिकच मोर्चा तिथे लागुनच असलेल्या श्री काशी विश्वेश्वराच्या मंदिराकडे वळवला. हेमाडपंथी बांधकाम असलेले हे पुरातन मंदीर विलक्षण देखणे आहे. कॅमेरा हातात होताच....



गाभार्‍याच्या समोर उभ्या असलेल्या प्रचंड नंदीमहाराजांचे दर्शन घेवुन तिथेच बाजुला असलेली देखणी दिपमाळ कॅमेर्‍यात कैद केली आणि कॅमेरा खांद्याच्या झोळीत टाकला आणि गाभार्‍यात शिरलो.


एक मात्र खरे की श्री शंकराच्या कुठल्याही मंदिराच्या गाभार्‍यात जा. मन लगेच शांत होवुन जाते. सगळी अस्वस्थता, बेचैनी कुठल्याकुठे पळून जाते. इथेही मला तोच अनुभव आला. मी तिथेच एका कोपर्‍यात मस्त पद्मासन घातले आणि जवळ जवळ अर्धातास खणखणीत सुरात ओंकार जागवला. चित्तवृत्ती एकदम उल्हसित झाल्या होत्या. एकच चुक केली. मी पंढरीच्या विठुमाऊलीचा भक्त आहे. मनात विचार आला जसे या काशी विश्वेश्वराचे दर्शन झाले तसेच माझ्या विठुचेही झाले असते तर....!


दिवसभराचा थकवा कुठल्या कुठे पळून गेला होता. थोड्या वेळाने बाहेर आलो आणि पुन्हा कॅमेरा सरसावला. मंदीराचे काही फोटो काढल्यावर सहजच लक्ष कळसाकडे गेले आणि कळसाच्या मागे लालसर होवु लागलेले आकाश दिसले. त्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर काशी विश्वेश्वराच्या मंदिराच्या कळसाचा एक फोटो काढला. फोटो व्यवस्थित आलाय की नाही हे चेक करताना जाणवले.


आपण नेहमी म्हणतो ना परमेश्वर एकच आहे. रुपे वेगवेगळी, आपण त्यांना फक्त वेगवेगळी रुपे आणि नावे दिली आहेत. पण आहे तो एकच. चराचरात भरलेला दिनदयाळू परम परमेश्वर. असं म्हणतात ना तुमच्या मनात ज्याबद्दल श्रद्धा असते तो तुम्हाला जळी स्थली काष्ठी पाषाणी दिसतो. मला या गोष्टीचा त्यावेळी एक विलक्षण अनुभव आला. त्या काशी विश्वेश्वराचा तो कळस बघताना मला त्यात माझ्या विठुमाऊलीचा भास झाला. तूम्ही देखील बघा. तुम्हालाही जाणवेल.


मनात भाव असेल, श्रद्धा असेल तर तो सगळीकडे, अगदी कुठेही दर्शन देतोच.

विठ्ठल नामाचा रे टाहो....
विठ्ठल नामाचा रे टाहो..!
विठ्ठला आवडी...प्रेमभावो....!
विठ्ठल..,विठ्ठल..,विठ्ठल..,विठ्ठल..,विठ्ठल..!

विशाल.

4 प्रतिसाद:

Anand Kale म्हणाले...

पांडुरंग...पांडुरंग...

Suhas Diwakar Zele म्हणाले...

मस्तच...

ऊर्जस्वल म्हणाले...

चराचरात विठ्ठल दिसू लागायला, भक्तीही तशीच लागते!

भक्तिः अव्यभिचारिणि ॥

विश्वेश्वराचे मंदिर सुरेखच असावे. प्रकाशचित्रेही सुंदर निवडलेली आहेत.

कळसाचे निकटदर्शन आणि दीपमाळ प्रदर्शनीय!

विशाल विजय कुलकर्णी म्हणाले...

मन:पूर्वक आभार काका :)

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय पोस्ट