माझा हॉलंड दौरा : पहिला दिवस

शुक्रवार, २३ जुलै, २०१०

सेल्स आणि मार्केटिंगची नोकरी असल्याने तसा भारतभर फिरलो आहे. अगदी काश्मिरपासुन कन्याकुमारीपर्यंत, आणि कच्छपासुन ते अन्दमानपर्यंत. स्वा. सावरकरांनी सांगितल्याप्रमाणे..

"आसिंधु सिंधु पर्यंतः
यस्य भारत भुमिका
पित्रुभु: पुण्य भुश्चैव
सवै हिन्दु रिति स्मृतः !"
(बरोबर लिहिलेय ना?) असं काही टाकलं की लिखाणाला जरा वजन येतं.


अर्थात सिंधु नदीपासुन सिंधु (समुद्र) पर्यंत पसरलेली भुमी ही हिंदुभुमी आहे, आणि तिला पित्रुभू मानुन तिच्यावर प्रेम करणारा प्रत्येकजण हिंदु आहे. या उक्तीप्रमाणे मीही एक हिंदु आहे. त्यामुळे भारतभुमीतील कुठलाही प्रांत मग तो बिहार असो वा महाराष्ट्र तो मला तितकाच प्रिय आहे. म्हणुन माझी सदैव भटकंती चालुच असते.

यावेळेस कंपनीच्या कामाच्या आणि प्रशिक्षणाच्या निमित्ताने परदेशगमनाचा योग आला. आमचे हेड ऑफीस हॉलंडला लायशेनडॅम इथे आहे. आमची तयारी पासपोर्ट पासुन होती. पुरेसा वेळ हाती नसल्याने मग तत्काल पासपोर्ट्साठी अर्ज, मग ते पोलिस व्हेरीफिकेशन, मग त्यानंतर व्हिसासाठी केलेल्या अनंत खटपटी. (बाळंतपणाचा त्रास जणु!) .

मग त्यानंतर कपडेपट. तिथल्या थंडीबद्दल ऐकुन होतो त्यामुळे ओव्हरकोट, स्वेटर पासुन सर्व तयारी.सुदैवाने हॉटेल बुकींग कंपनीनेच केले असल्याने ती काळजी नव्हती.

२१ मे २००७ रोजी रात्री १२.५५ वाजता मुंबई ते अ‍ॅमस्टरडॅमच्या थेट फ्लाईटने एकदाचे उडालो. रात्र कशी गेली ते निद्रादेवीलाच माहीत. फक्त एकाच गोष्टीची आठवण आहे ती म्हणजे रात्री १.३० वाजता ती स्टिवार्डेस वेज, वेज म्हणुन ओरडत आली. चेहेर्‍यावर असे भाव की "ईssssssssssssssss हा बघ वेजिटेरियन ! " जणु काही शाकाहारी असणं हा फार मोठा गुन्हा आहे. (नंतर तिथे खुप शाकाहारी भेटले, पण शाकाहारी असणं हा हॉलंडमध्ये खरोखर गुन्हा आहे याची मात्र तिथे मिळणार्‍या सलादने जाणीव करुन दिली)


सकाळी ६.०० वा. च्या दरम्यान (तेथील स्थानिक वेळेनुसार) विमानाच्या कप्तानाने ३० मिनिटात आपण शिफॉल विमानतळावर उतरत असल्याचे जाहीर केले अन साहजिकच लक्ष बाहेर लागले. मुंबईला उतरताना नेहेमी धारावीचे दर्शन घेण्याची सवय असलेला मी, इथे जे काही बाहेर दिसत होते ते पाहुन थक्कच होवुन गेलो. दुरपर्यंत पसरलेली हिरवीगार शेते, त्यातुन वाहणारे (आणि चक्क पाण्याने भरलेले) निळेशार नजर पोचेल तिथपर्यंत दिसणारे पाण्याचे कालवे आणि या सर्वात दिमाखाने उभ्या असलेल्या पवनचक्क्या! (windmills)
कारमधून टिपलेली पवनचक्की














लांबलचक पसरलेली शेते


आणि मग शिफॉलचा स्वच्छ आणि नीटनेटका विमानतळ. इथे मात्र धक्क्यावर धक्के बसत होते. इमिग्रेशनमधुन फक्त दोन मिनिटात सुटका....सगळंच कसं अनपेक्षित !आधीच ठरवलेली टॅक्सी वेळेच्या आधी वाहकासहित हजर, सुटा बुटातला ड्रायव्हर, आयला त्याचा सुट माझ्या कपड्यांपेक्षाही चांगला होता. पण त्याचं इंग्रजी मात्र माझ्या इंग्रजीपेक्षाही खराब निघालं, माझ्या....? इतकं...?
शिफ़ॊल विमानतळ



मी त्या टॅक्सी (कॅब) चालकाला गाडीतला एसी बंद करुन खिडक्या उघडायला सांगितल्या तर तो माझ्याकडे पहायलाच लागला. त्याला कशाला मी मुंबईच्या शुद्ध हवेबद्दल (?) सांगु? मी बापडा गुमान बाहेरच्या हिरवाईत गुंगुन गेलो. सकाळची वेळ असल्याने रस्त्यावर फारशी रहदारी नव्हतीच आणि जी काही वाहने होती ती बापडी अगदी शिस्तीत आपल्या वाटेने चालली होती. मला उगाचच एक चाक जाण्याइतकी जागा दिसली की नाक खुपसणारा मुम्बईचा रिक्षावाला आणि बेगुमानपणे धावणार्‍या बेस्टच्या बसेस आठवल्या.

कंपनीने माझ्यासाठी विचकॉटन कि वुरशॉटन (woorcshotton) नामक एका उपनगरात एका हॉटेलात जागा बुक करुन ठेवली होती. आमचे (म्हणजे फुग्रोचे) हेडक्वार्टर लायशेंडॅमला आहे. तिथुन हे उपनगर सहासात किमी अंतरावर आहे. हॉटेल डी गौडेन ली (कदाचीत लीव) असं काहीसं अवघड नाव असलेल्या त्या हॉटेलचा रुममध्ये मला पुढचे दोन महिने काढायचे होते. मनात एक धाकधुक होती, जागा कशी असेल? माणसं कशी असतील? कारण हॉलंडला आणि एकंदरच पहिलाच विदेशदौरा होता माझा. त्यानंतर एक दोन वेळा लंडन, एकदा पर्थ (ऑस्ट्रेलिया), एकदा बर्लीन (जर्मनी) आणि एकदा कँडी (श्रीलंका) झालं. अ‍ॅमस्टरडॅमच्या विमानतळापासुन हॉटेलपर्यंत जायचा रस्ता मात्र जादुई होता. नुकतीच बहुदा पावसाची सर पडून गेलेली असावी त्यामुळे रस्त्यावर पाणी दिसत होते. (आपल्या अंधेरीच्या मिलन सबवे मध्ये साचते तसे नव्हे, तर रस्ता नुकताच न्हाणं आटपून केस वाळवायला बसलेल्या एखाद्या नवयुवतीसारखा वाटत होता.

ओलेते रस्ते














ओलेते रस्ते

मजल दरमजल करीत एकदाचा होटेलवर पोचलो. प्रथमदर्शनीच मी हॉटेलच्या प्रेमात पडलो. खरंच हो.. आम्हाला नाहीतर सांताकृझ विमानतळावरून येताना किंवा जाताना नुसते बाहेरुनच तशी हॉटेलं बघण्याची सवय. हे हॉटेल साधं थ्री स्टारदेखील नव्हतं पण तरीही खुप छान होतं. हॉटेलच्या दारातच दोन मोठे सिंह (पुतळे) स्वागत करायला हजर होते.

स्वागतोत्सुक वनराज

आमी रायलो व्हतो ते हाटील
गार्डन रेस्टोरंट

दर्शनी भागातला पार्किंग एरिया

दर्शनी भाग
रिसेप्शन काऊंटर
 रिसेप्शनला एक गौरांगना (चक्क सकाळी सहाची वेळ असुनही) हजर होती. मी आधी मनातल्या मनात घोटून आणि मग उघडपणे तिच्याशी माझ्या महान इंग्रजीत बोलून रुमची चावी (चावी कसली एक प्लॅस्टिकचं की कार्ड) ताब्यात घेतली आणि तिला विचारलं..

which floor....?

तिने लगेच तत्परतेने उत्तर दिलं.

Nyo sir, there is a apartment booked for you by OmniSTAR. Just 2 minutes away from here, on another side of the road. It's called as 'De Boerderie Appartementen'.

अपार्टमेंट म्हणल्यावर माझ्या डोळ्यासमोर एकदम आमचं शिवकृपा अपार्टमेंटच उभं राहीलं...

Aprtment...?

माझा नवखेपणा ओळखुन की काय पण तिने तिथलीच एक सेविका माझ्याबरोबर दिली. झक मारत मी बॅग स्वतःच उचलून तिच्या मागून निघालो. अर्थात निघायच्या आधी त्या गौरांगनेला दात दाखवून आभार मानायला विसरलो नाही. मनात विचार आला कंपनीने हॉटेलच्या नावाखाली बहुतेक कुठल्याशा एखाद्या बिल्डिंगमध्ये आमची योजना केलेली दिसते. त्या देखण्या हॉटेलकडे एक उदास नजर टाकत त्या दुसर्‍या गौरांगनेच्या मागे निघालो. मनातल्या मनात कंपनीच्या नावाने बोटे मोडण्याचा कार्यक्रम अगदी मनापासुन चालू होता.

"This is your apartmentan, Sir."

अरे, पोचलो पण? मी विचारांच्या गर्तेतून बाहेर आलो. शिव्यांचा कोश मध्येच बंद झाला. तिच्या बोटाच्या दिशेने पाहीले आणि पाहतच राहीलो. क्षणभर वाटलं दिलेल्या सगळ्या शिव्या रिवाईंड करून परत घेता आल्या असत्या तर किती छान झालं असतं.समोर एक छोटंसंच, नितांत देखणं, एकमजली घरकुल उभं होतं. मी कित्येक वर्षं माझं स्वप्नातलं घर म्हणुन ज्याची स्वप्नं पाहीली होती, तेच मुर्त रुप घेवून समोर उभं असल्यासारखं वाटलं.
स्वप्नातलं घर ...
कंपनीने तिथल्या वास्तव्यादरम्यान वापरण्यासाठी दिलेली गाडी

माझ्या या तात्पुरत्या घराचे परसदारदेखील तितकेच देखणे होते.






मी मनातल्या मनात का होइना पण कंपनीला दिलेल्या सगळ्या शिव्या भराभर परत घेतल्या. त्या अपार्टमेंटमध्ये एकुण चार रुम्स होत्या. बाकीच्या तिन्हीमध्ये आधीच कोणीतरी (दोनमध्ये तर चक्क दोन एकट्याने (?) उतरलेल्या माझ्या दृष्टीने खुपच सुंदर असलेल्या मुली होत्या हे मला नंतरच्या काही दिवसात कळलं) थोडा वेळ त्या दाराशी (आणि हातातल्या की कार्डशी) झटापट केल्यानंतर दार उघडण्यात मला यश आलं. आत शिरलो, बॅग एका कोपर्‍यात टाकली, खेटरं दुसर्‍या कोपर्‍यात भिरकावली आणि बेडवर झोकून दिलं.








बेडवर पसरलो आणि रुममधला फ़ोन बोंबलला, फ़ोनवर माझी ५८ वर्षाची गर्लफ्रेंड होती.
योलांडा.... (Jolanda Klaver), आमची ऑफीस मॅनेजर, खरेतर तिचे नाव Jolanda Clever असायला हवे होते. She is so smart and clever.

योलांडा-माझी ५८ वर्षांची गर्लफ़्रेंड


"You may need some rest v(f)ishal. Enjoy the sunday in holland."

आत्ता माझ्या लक्षात आलं, तो दिवस रवीवार होता. आल्या आल्या मला ऑफीसला यायचा त्रास नको म्हणून माझ्या ५८ वर्षाच्या गर्लफ्रेंडने माझं शनिवारच्या फ्लाईटचं बुकिंग केलं होतं. So sweet of you Jolanda...!
जी ताणून दिली ती संध्याकाळी ५-५.३० च्या दरम्यानच उठलो. बाहेर एक चक्कर टाकून यावी म्हणुन तयार झालो. तेव्हा जाणवलं की बाहेर जाताना स्वेटर घालणं मस्ट आहे. दोन वर्षापुर्वी मुंबईत घेतलेला स्वेटर आज इथे उपयोगात आला.
 
Thanks to Mr. Timer of my camera.
















हॉलंडमधल्या वास्तव्याचा माझा पहिला दिवस अशा रितीने सुरू झाला. हा रवीवार मी लोळण्यातच घालवला, पण पुढचा प्रत्येक शनीवार-रवीवार फुल्टू धमाल होता. पुढच्या लेखात हॉलंडच्या स्केवेनिंगेनच्या समुद्रकिनार्‍याच्या भेटीबद्दल.........

तोपर्यंत वाट बघा,सद्ध्या इथेच एक स्वल्प-विराम ;-)

विशाल कुलकर्णी

0 प्रतिसाद:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय पोस्ट