काळ आला होता पण …..

बुधवार, २१ जुलै, २०१०

रामनाम सत्य है…
हरि का नाम सत्य है…
पक्या एक सिगरेट दे ना बे !
हल बे, एकच पाकीट राहिलंय आता, उद्याचा सगळा दिवस काढायचाय तेवढ्यावर…!
याला कुणी आणला रे इथे, कंजुस मारवाडी साला…..
भुसनाळीचांनो, मघापासुन दोन तासात माझी साडे तीन पाकिटं संपवलीत ब्रिस्टोलची आणि मलाच कंजुस म्हणताय. हुडुत..आता तर थोटुक पण देणार नाय, बसा आधाशासारखे माझ्याकडे बघत….!
बरोबर, चार दिवसांपुर्वी बादशाहीसमोरच्या कट्ट्यावर खिशात हात घालुन बसलो होतो.
हं हं हं…खिसे रिकामे आहेत हे कुणाला कळु नये म्हणुन हात घालुन खिशाला फुगीरपणा आणण्याचा केविलवाणा प्रयत्न, बाकी काही काही नाही हो ! २२ किंवा २३ तारिख असेल. काय फरक पडतो म्हणा..१० तारखेनंतर सगळ्या तारखा सारख्याच. शेजारच्या गाडीवरुन मस्त ऑम्लेटचा वास येत होता, तेवढीच नाकाची दिवाळी. गरिब बिचारी कोंबडी, जन्माला येण्याआधीच तिच्या पिल्लावर हा प्रसंग यावा. कोणी कोंबडा पोलिसात तक्रार का करत नाही. (खिशात पैसे नसले की मला परोपकार आठवतो…..? )
नजर इकडे तिकडे फिरायला लागली, कोणी बकरा सापडतोय का ! साले कुणी कडमडणार नाहीत आता..
इमानदारीत लेक्चरला बसले असतील साले..मी उगाचच स्वतःशीच करवादलो.
एकटाच काय करायला बे विशल्या……
आला, बकरा आला….ये बे राघु, मैनेला कुठं सोडला….
मैना गेली बे कावळ्याबरोबर, विशल्या, चल बे एक कटिंग तर पाज…
च्या मारी, अमावसेच्या भेटीला एकादस आली…पळ बे, पैसे असते तर इथे कशाला आलो असतो, बोट क्लबच्या कँटीनलाच नसतो का बसलो?
सी.ओ.ई.पी.चा बोट क्लब..


बोट क्लबची कँटीन? वाट बघ साल्या! तो उद्धव आधी मागचे पैसे कापुन घेइल साल्या. ४५० ची उधारी आहे आपली तिथं!
खरंय बे राघु, च्यायला यावेळी जाम हालत झालीय रे, या महिन्यात घरुन मनीऑर्डर पण नाही आली.
अजुन १०-१२ दिवस जायचेत. वेड लागायची वेळ आलीय यार. गेल्या दोन दिवसात इंद्रायणीला पण नाही भेटलो बे. चहा घ्यायला पण पैसे नाहीत, यार…माझं खरं दु:ख वेगळंच होतं.
काय कंगाल कंपनी, दोघं मिळुन वास घेताय काय ऑम्लेटचा ! चालुद्या चालुद्या !
च्यामारी पक्या, बारामती कँटीन आज बादशाहीला कसं काय?
इच्या मायचं किडमिडं….तुम्हालाच शोधत आलो यार, अपुन यारो का यार हे, काय ?अबे विशल्या, काल डबल दश्शी लावली होती…
पक्या, तुला कितीदा सांगितलंय आकडा लावायचं सोड म्हणुन..मी ओरडलो.
इच्या मायचं किडमिडं…गप बे अभि भट्टाचार्य (हा मला अभि भट्टाचार्य का म्हणतो माहितीय..त्याला जुन्या बोलपटात देवांच्या भुमिका करणारा, आणि सेटवर भकाभका सिगरेटी ओढणारा हा एकच नट माहितीये , नशीब त्याला शोभना समर्थ माहित नव्हती…!)
साल्यांनो, गपचुप उडवला असता पैसा एखाद्याने. मी दोस्ती निभवायला आलो तर शानपत्ती शिकवतो का बे?
राघु, बकराय बे…………! आम्ही खुश ……..
सॉरी यार पक्या, कितीचा लागला……
११०० रुपये, आधी उद्धवची उधारी चुकवली ४५० ची, अन तुम्हाला शोधत इथे आलो, म्हणलं चुकले फकीर मशीदीतच सापडणार. तर …. इच्या मायचं किडमिडं, तुमी लोग मलाच शानपत्ती शिकवुन राहीले.
माफ कर ना बे, पक्या…….! सॉरी बोललो ना राव.
असु दे बे, तुमी पण माझ्या भल्याचच सांगता ना…पक्या भलताच इमोशनल वगैरे झाला.
विशल्या, अजुन साडे सहाशे शिल्लक आहेत. महिन्याभरासाठी चारशे टाकले..तरी उरलेल्या अडिचशात आपला एक ट्रेक व्हायला हरकत नाही, बोला..जनमत ?
जनमत, पण जन्या कुठाय त्याला विचारायला पाहिजे ना…..ते स्कॉलर येडं, नाही म्हणलं तर…
त्याचं माझ्यावर सोडुन सोड ना भौ …, राघुने हमी भरली…पण कुठं जायचं ?
अं…लोहगड-विसापुर…..होवुन जावुद्या जनमत ?
मग आपोआपच ऑम्लेटवाल्याची दिवाळी झाली.
शनिवार – रविवार पकडुन लोहगडला जायचं ठरलं………………….!
प्रकाश कुलकर्णी…..सातार्‍याचं अस्सल , गावरान पाणी, राघवेंद्र जोशी …नागपुरचं संत्रं, जनार्दन हुमनाबादकर….अस्सल यंडुगुंडु आणि अस्मादिक…विशाल कुलकर्णी..सोलापुरचं बेणं अशी आमची चांडाळ चौकडी….मी सी.ओ. इ. पी. चा एलेक्ट्रॉनिक्सच्या तिसर्‍या वर्षाला. पक्या कृषि महाविद्यालया चा तर राघु आणि जन्या फर्ग्युसनचे . चार ठिकाणची चार पाख्ररं….एस. पी. च्या कट्ट्यावर झालेली मैत्री…बर एकाचाही एस. पी. शी दुरुन सुद्धा संबंध नाही. एकच सारखेपणा….सगळे मेरीटच्या जिवावर पुण्यात आलेलो..प्रत्येकाच्या घरात लक्ष्मी आणि सरस्वतीचं कायमचं भांडण. पण आमची नाळ जुळली, पक्की दोस्ती झाली. आताचच बघाना पैसे मिळाल्यावर पहिलं काम पक्याने केलं ते म्हणजे माझी बोट क्लबच्या कँटीनवर असलेली उधारी चुकवली.
खुप छान होते ते दिवस, जवळच्या नातेवाईकांनी तोंडं फिरवली होती..(पुण्यात माझे किमान चार ते पाच अगदी जवळचे (?) नातेवाईक होते) आणि कोण कुठली ही पोरं….जिवाला जिव लावत होती.
माफ करा, थोडंसं विषयांतर झालं..तर शनिवार – रविवार लोहगड-विसापुर.
शनीवारी सकाळी सकाळी पक्या त्याची धोकटी घेवुन माझ्या रुमवर हजर झाला. राघु शुक्रवारी रात्रीच मुक्कामाला आला होता. (त्याच्या मेसवालीनं सुट्टी घेतली होती….पोटाला सुट्टी देता येत नाय ना भौ …!) जाता जाता जन्याला उचलायचं ठरलं होतं. शुक्रवारीच मी आणि पक्याने खरेदी केली होती.
२ किलो तांदुळ, १ किलो बेसन पिठल्यासाठी आणि कांदे बटाटे…आणि थोडा मसाला, पावकिलो गोडेतेल्, चहाचं सामान आणि एक पातेलं. (हे एक पातेलं भात, पिठलं आणि बिन दुधाचा चहा तिन्हीसाठी कॉमन असायचं.) थोडंसं रॉकेल…………..आणि सहा ब्रिस्टोलची पाकिटं..एक काडेपेटी…(हे महत्वाचं ! )
सकाळी साडेआठच्या दरम्यान लोनावळ्याला जाणारी लोकल पकडली आणि (गाडीबाहेरच्या आणि गाडीतल्या निसर्गसौन्दर्याचा आनंद घेता घेता मळवली कधी आलं ते कळलंच नाही. मळवलीला उतरुन आधी भाज्याची लेणी करायची , तिथेच जेवण करुन मग दुपारी लोहगडावर स्वारी करायची असं आमचं ठरलं होतं. मळवली स्टेशन पासुन भाज्याची लेणी चालत अर्ध्या पाउण तासाच्या अंतरावर आहेत. अजुनही बर्‍यापैकी शाबुत अवस्थेत असलेली अशी ही बौद्ध लेणी आहेत. पावसाळ्यात तर इथला नजारा बघण्यासारखा असतो. डोंगरावरुन कधी तुफान वेगाने तर कधी एखाद्या अवखळ बाळासारखे थांबत थांबत जमीनीकडे झेपावणारे झरे अंगा खांद्यावर खेळवत भाज्याची ही लेणी उभी असतात. येथील चैत्यगृहे आणि त्यातील स्तुप अजुनही चांगल्या अवस्थेत आहेत.
इथे आम्ही जेवण आटपले आणि दुपारी ३.३० ते ४ च्या दरम्यान लोहगावाकडे कुच केले. भाज्याची लेणी ते लोहगाव हा टप्पा देखिल खुप सुंदर आहे..तितकाच भितीदायक ही. कारण दाट जंगल आणि डोंगराची चढण्…मध्ये मध्ये डोंगराच्या अंगा खांद्यावर खेळणारे अवखळ नाले, छोटे छोटे फुट दिड फुट उंचीचे धबधबे आणि……………………. जोडीला ब्रिस्टोलची पाकिटं…
लोहगाव कधी आलं ते कळालंच नाही. लोहगडाच्या पायथ्याशी असलेली ही एक छोटीशी वस्तीच म्हणेनात का? इथे मग पुन्हा थोडा वेळ थांबुन दम खाणं क्रमप्राप्तच होतं. तिथं एका टपरीवजा हॉटेलात मिळालेलं थंडगार ताक पिऊन वर अर्धा किलो जाडी शेव विकत घेतली. (त्यानंतर फरसाणाचे अनेक प्रकार खाल्ले असतील पण ती मेणचटलेल्या कागदात बांधुन घेतलेली शेव कुठेच नाही मिळाली…ती चव अगदी परवा हॉलंडमध्ये खाल्याला स्पेशल इटालीच्या पिझ्झ्याला सुद्धा नव्हती. (हे मात्र अती होतंय हा विशल्या…… काय करणार देवा, असं लिहावंच लागतं इंप पाडण्यासाठी..!)
जाताना आणखी एक गोष्ट अगदी फुकट मिळाली. ” देवा, रातीचा मुक्कामाला रायणार असाल तर गडावरच्या गुहंमंदी राहा. भायर रातच्याला देवचार फिरतया. बाय बी दिसती येक हत्ती टाक्यापाशी….अमावस दोन दिसावर आलीय. ततं गुहंमधी येक फकीर राह्यतो त्येच्या बरुबर र्‍हावा!”..हा मोलाचा सल्ला…!
गड मात्र खराच देखणा आणि नावाला शोभणारा आहे. लोहगड्..त्याची रचना पाहिल्यावर एके काळी हा किल्ला खरंच शत्रुला लोखंडासारखा वाटत असेल याची खात्री पटते. जिथुन आपण गडात आत शिरतो तो गणेशदरवाजा अजुनही भक्कमपणे उभा आहे…


गडाची तटबंदी बर्‍याच ठिकाणी ढासळलीय आता..पण गडाची एकंदर रचना जर बघीतली तर त्याला तटबंदीची गरजच नाही. पण आजही पावसाळ्यात ती अभेद्य तटबंदी डोळ्यांना विलक्षण सुखावुन जाते.


तिन बाजुला काळा कभिन्न उभा कडा……… एखाद्या पेरुसारखी भासणारी गडाची रचना… तर चौथ्या बाजुला विंचवाच्या नांगीसारखा दिसणारा लांबवर पसरलेला चिंचोळा सुळका..त्याला विंचु काटा असेच नाव आहे. गडाच्या उजव्या अंगाला बाहेरच्या बाजुला एक नैसर्गिकपणे पडलेले प्रचंड छिद्र आहे , ज्याला नेढे असेही म्हणले जाते. त्याचा वापर कदाचित टेहळणीसाठीही होत असेल जुन्या काळी.

असं म्हणतात की हा किल्ला सातवाहन कुलातील राजांनी बांधला होता. नंतर कधी मुस्लीम तर कधी शिलाहार तर कधी मराठे असे त्याचे मालक बदलत राहिले. असो..तर आम्ही पक्याच्या शिव्या ऐकत ऐकत गडावर पोचलो. अर्थात या शिव्या आमच्यासाठी नव्हे तर गडाच्या भिंतीवर आपल्या अमीट आणि अनमोल खुणा सोडणार्‍या अज्ञात प्रेमिकांसाठी होत्या…एक मासला…
“इच्या मायचं किडमिडं, भ्……..ला ही पण जागा कमीच पडली का आपल्या लफड्याचं मडं सजवायला !”
रात्रीचे आठ वाजले असावेत. ‘जन्या’ गुहा शोधायला लागला तसा पक्या भडकला.
“जन्या, येडा झाला का बे भुसनाळीच्या, गुहा बिहा काय नाय सांगुन ठेवतो..आपण हत्ती टाक्यापाशी तंबु टाकायचा. “
स्पॉन्सर पक्या होता त्यामुळे नो ऑर्ग्युमेंट. आम्ही हत्ती टाक्या पाशी तंबु टाकला. तंबु म्हणजे काय तर एक मोठे चादर आणली होती.. एक मोठी काठी घेवुन जमीनीत ठोकली आणि चादर त्यावर टाकुन चारी बाजुनी ताणुन बांधली की झाला तंबु. थोडा वेळ गप्पा मारुन झाल्या. जन्याला भुता खेतांची भीती वाटतेय म्हणल्यावर गप्पांचा विषय तोच असणे अपरिहार्यच होते. मग पुन्हा एकमेकांची खेचणे सुरु झाले.
“विशल्या, इंद्रायणी परवा बंडगार्डनला दिसली होती बे. एका यामाला टेकुन उभी होती…..शेजारी नव्हतं कुणी….!” पक्या महाराज…
“कदाचित जवळपास कुठेतरी गेला असंल……!” राघोबादादा कर्नाटकी
पक्या चेष्टेच्या मुडमध्ये आला की त्याला मीच सापडायचो आणि हमखास इंद्रायणी आठवायची. खरंतर माझी तिची ओळख फक्त अभ्यासाच्या वह्या एक्स्चेंज करण्यापरतीच होती..पण मी कशाला बोलु..? एवढी चिकणी पोरगी विशल्याशी तासनतास बोलते एवढंच आमच्या गँगला जळवण्यासाठी पुरेसे होते. ……..! Wink
गप्पांच्या नादात ११.३० कधी वाजले ते कळलेच नाही. मग स्वयंपाकाला सुरुवात झाली. आमचा ट्रेकचा नेहेमीचा शिरस्ता होता. जिथे जागा मिळेल तिथे तीन दगड लावायचे..आधी भात शिजवुन घ्यायचा आणि मग नंतर तो पेपरावर किंवा जवळच्या एका फडक्यावर काढुन त्याच पातेल्यात पिटलं लावायचं. त्यानंतर बटाटे कापायचे, त्याला तेल, मीठ, तिखट लावुन कच्चेच पिठलं भाता बरोबर हाणायचे..मजा होती सगळीच…!
आम्ही बरोबर एक ६ वोल्ट्ची बॅटरी घेतली होती आणि एक होम मेड डेक. सोलापुरात मंगळवार बाजार म्हणुन एक बाजार भरतो..आता कुठल्या वारी ते विचारु नका ! तिथे सगळ्या जुन्या, कंडम मध्ये जमा झालेल्या वस्तु मिळतात. मी तिथुन एक बंद पडलेला (फेकुन दिलेला) टेप आतल्या सामानासकट चक्क चाळीस रुपयांना विकत घेतला होता. आणि त्यातील सामान वापरुन काही नवीन कंपोनंटस टाकुन एक छोटासा टेप तयार केला होता. हे सगळं सर्किट मी एका लाकडी खोक्यामध्ये बसवलं होतं…रुम वर असताना रुमवरच्या फुटक्या डेर्‍यावर एक स्पिकर उपडा टाकुन तो टेपला जोडला की आवाज मस्त घुमायचा…इथे तर काय मोकळे आकाश …! त्यामुळे फुल्ल धिंगाणा…!
आणि एक – दिडच्या दरम्यान आमच्या जवळच्या बॅटरीने राम म्हणला……….
इतका वेळ एक छोटा बल्ब (जो लाईटच्या माळेत वापरतात) आणि आमचा डेक (?) यांना जिवंत ठेवायचं काम बॅटरीने इमानाने केलं होतं. तिने निरोप घेतला आणि आमच्या लक्षात आलं किं अमावस्या दोन दिवसावर आली होती.
पक्या, विशल्या मी चाललो त्या गुहेत. तुम्हाला राहायचं असेल तर खुशाल राहा इथं…जन्याचा आता मात्र पुर्णपणे धीर खचला होता….राघुपण ..जावुया बे, जावुया बे करत होता…
(खरं सांगायचं तर आमची पण तंतरली होती..पण कमीपणा कोण घेणार..)
विचार करा..संपुर्ण काळोख, कुठेतरी एखादी चांदणी…
गडमाथ्यावर असल्याने भयाण आवाज करत सुसाट वाहणारा वारा..
संपुर्ण गडावर आम्ही चौघे..असलाच तर तो गुहेमधला फकीर…
शेवटी तंबु उखडला गेला………………………….!
त्या तंबुच्या चादरीतच सगळं सामान ठेवलं, अगदी नुकत्याच शिजवलेल्या अन्नासकट. चादर चौघांनी खांद्यावर घेतली…आणि….
रामनाम सत्य है…
हरि का नाम सत्य है…
पक्या एक सिगरेट दे ना बे !
हल बे, एकच पाकीट राहिलंय आता, उद्याचा सगळा दिवस काढायचाय तेवढ्यावर…!
याला कुणी आणला रे इथे, कंजुस मारवाडी साला…..
भुसनाळीचांनो, मघापासुन दोन तासात माझी साडे तीन पाकिटं संपवलीत ब्रिस्टोलची, पुण्यापासुन मळवलीला येइपर्यंत एक ते वेगळंच आणि मलाच कंजुस म्हणताय. हुडुत..आता तर थोटुक पण देणार नाय, बसा आधाशासारखे माझ्याकडे बघत….!
या ओरडण्यामागे एकच हेतू होता की गडावर तो साधु की फकीर खरंच असेल तर ऐन मध्य रात्री अशा प्रकारे मनोभावे (?) घेतलेलं देवाचं नाव ऐकुन तरी आम्हाला शोधत येइल आणि गुहेपर्यंत घेवुन जाईल. कारण मघाशी जन्याची थट्टा करण्याच्या नादात गुहा कुठे आहे हे शोधायचे राहुन गेले होते आणि लोहगडाच्या विस्तीर्ण माथ्यावर रात्री दोन वाजता ती गुहा शोधणं म्हणजे दिव्यच होतं. पण आमची ट्रिक यशस्वी ठरली.आणि तो आम्हाला शोधत आलाच्..लांबुन एक बॅटरी दिसली..आणि मागुन एक जोराची हाळी आली.
” ए XXX , वही रुको , एक कदमभी मत हिलना अपनी जगहसे…..!”
“मला उगाचच हिंदी बोलपटांनधल्या खलनायकाची आठवण झाली..एक कदम भी हिले तो गोली मार दुंगा… नाच XXX ! (इथे कुठलेही नाव चालु शकेल्..डायलॉग काय तोच असतो..)
तर हातात बॅटरी घेवुन फकीरबाबा आमच्या जवळ पोचले. आल्या आल्या आव देखा ना ताव ज्या ठेवणीतल्या सुरु झाल्या की ……
पक्या पिसाळला, “च्यामारी हाणतोच याला..!”
कसाबसा त्याला आवरला,” पक्या, तो आपल्याला गुहेचा रस्ता दाखवणार आहे, गप्प बस. सकाळी बघु. एकतर आपण त्याची झोपंमोड केली आहे..तेव्हा गप ऐकुन घे.”
“बाबाजी वो गुफातक जाने का रस्ता मालुम नही था, इसलिये…
म्हातार्‍याचा राग थोडासा कमी झाल्यावर पुढची ऑर्डर आली..
“सबलोग मेरे पिछे आओ..एक लाईनमे..समझे एक लाईनमे….!”
लेफ्ट-राईट करत त्याच्या मागे गुहेत पोहोचलो. त्याला इमानदारीत (मनातुन शिव्या देत) शुक्रिया बाबाजी ही म्हणलो..म्हातार्‍याने एकले न ऐकले..त्याच्या जागेवर आडवा झाला आणि लगेच चक्क घोरायला लागला. मला खरंच त्याचा हेवा वाटला..किती सुखी प्राणी आहे.
मग आम्ही जेवायला बसलो. रात्री कि पहाटे, तीन- साडे तीन वाजता जेवणारे आम्हीच असु बहुधा.
रात्री बराच वेळ जागे होतो..कधीतरी चारच्या दरम्यान झोप लागली असावी.
सकाळी जाग आली तेव्हा आठ वाजुन गेले होते. फकीर बाबा काहीतरी करत बसले होते. आम्ही चहा केला. थोडा बाबांनाही दिला….
मग इमानदारीत विचारलं..
“बाबाजी, माना के कल हमने आपको बहोत परेशान किया..आपकी निंद खराब की, लेकिन फिरभी इतनी गंदी गंदी गालिया..आप तो खुदाके बंदे हो, और ऐसी गालिया…..”
तर म्हातारा एवढा गोड, एखाद्या लहान बाळासारखा हसला..किं आम्ही क्षणभर विसरुन गेलो की रात्री याला मारायला निघालो होतो.
“चलो बताता हु और कुछ दिखाना भी है तुम लोगोंको!”
मग कुठुन आला, काय करता..घरी कोण कोण आहे..वगैरे माहीती विचारुन झाली. त्या दिवशी दुपारपर्यंत बाबांनी आम्हाला सगळा गड फिरवुन दाखवला अगदी त्याच्या ऐतिहासिक खाणा खुणांसकट. सोबत बाबांच्या तोंडुन लोहगडाचा इतिहासही ऐकायला मिळाला. विंचु काट्यावर ही घेवुन गेले..ती चढण उतरताना आणि परत चढताना वरचा देवच आठवला..पण मझा आला.
शेवटी बाबाजी आम्हाला एका जागी घेवुन आले.
“बेटेजान्..कल तुम लोगोंको मैने यहा पे रोका था ! आप लोग सिधे चले जा रहे थे……
अब तुम बताओ..तुम्हारे मा- बाप घरमें तुम्हारा इंतजार कर रहे होंगे…. अपनी जिंदगी लगा देते है वो लोग बच्चोंकी भलाई कि खातीर और तुम लोगोको उनकी कोई फिक्र ही नही ! तुम लोग ऐसी अनजान जगहपे बिना कुछ जानकारी लिये मुँह उठाये चले आते हो, थ्रिल के नामपर..
मै गालिया ना दु तो क्या करु ……………………….! सामने देखो, कल रात अगर थोडा आगे चले गये होते ………….”
!cid_E8529E3870444A64ADAF5EEA09832B59@fugronl

0 प्रतिसाद:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय पोस्ट